You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक दुर्मिळ लिंबू ज्याचं रक्षण सामुराई योद्धे करायचे, बंदिस्त किल्ल्यात व्हायची लागवड
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मी आज गोष्ट सांगणार आहे एका दुर्मिळ, गुप्त लिंबाची ज्याला अक्षरशः लपवून ठेवलं जायचं. या लिंबाचं रक्षण करायचे सामुराई योद्धे आणि याचं झाडं फक्त राजवाड्यात वाढायचं.
कोणत्याही सामान्य माणसाला हे लिंबू खायची परवानगीही नव्हती, अर्थात ते मिळणं अशक्यच होतं म्हणा. पण जर समजा कुणी खाल्लंच तर त्याची धडगत नसायची.
या लिंबाचं नाव सांकोबान. अतिशय आंबट तरीही अत्यंत चविष्ट असणारं हे लिंबू जपानच्या वाकायमा प्रदेशात आढळतं. हे लिंबू आजही दुर्मिळ आहे. फक्त जानेवारी ते मे या ठराविक काळातच याचं पीक घेता येतं.
जपानी खाणं तसं भारतीयांच्या तुलनेत सपक. जगभरात मिळणाऱ्या जपानी पदार्थांमध्ये लिंबाचा वापर फारसा केला जात नसला, तरी जपानच्या काही प्रदेशात लिंबाचे वेगवेगळे प्रकार मुक्तहस्ताने वापले जातात.
जपानचा वाकायामा भागात लिंबांच्या असंख्य व्हरायटी उगवतात. इथली संत्री, मोसंबीही प्रसिद्ध आहेत. या भागाला मुळातच जपानचं 'फळांचं साम्राज्य' असं म्हणतात. पण तरीही इथे गेलात तर नजरेत भरतं सांकोबान.
काय आहे सांकोबान?
बीबीसी ट्रॅव्हलचे टॉम शिलर आपल्या एका लेखात लिहितात, "सांकोबान नक्की काय आहे याबद्दल अभ्यासकांमध्ये एकवाक्याता नाहीये. कोणी म्हणतं हा संत्र्याचा एक प्रकार आहे, कोणी म्हणतं इडलिंबाचा तर कोणी म्हणतं लिंबाचा. काहींना वाटतं जपानच्याच युझू या लिंब प्रकारात मोडणाऱ्या सुंगधी फळाच्याच कुळातलं हे फळ आहे."
या फळाचं कुळ काही का असेना पण जपानी स्वयंपाकात याचा वापर मात्र लिंबासारखाच होतो. याची चव अत्यंत आंबट असते पण यात एक अल्प मात्रा गोडव्याचीही आहे. ती जाणवायला मात्र तुम्हाला याचा रस घातलेले पदार्थ चवीचवीने आस्वाद घेऊन, तोंडात घोळवून खावे लागतील, तरच कळेल.
या लिंबाबद्दल दंतकथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार हे लिंबू किल्ल्यात वाढणाऱ्या एका झाडापासून मिळायचं. 1867 पर्यंत ते सर्वसामान्य लोकांच्या नजरेला पडलंच नाही.
वाकायामा प्रदेशात सामुराई योद्ध्यांचं राज्य होतं. एकदिवस एका सामुराई योद्ध्याला जंगलातून जाताना एक झाडं दिसलं. त्यावर लिंबासारखी फळ लटकली होती. हा सामुराई योद्धा ते झाड उपटून आपल्या किल्ल्यात घेऊन आला.
वाकायामाच्या सामुराई राजाने या झाडाच्या लागवडीवर बंदी घातली. हे लिंबू फक्त सामुराई योद्धे आणि राजांसाठी असेल असं सांगितलं. फक्त किल्ल्यात राहाणारे याची चव घेऊ शकत होते. हे लिंबू सामुराई राजा आणि त्याचे योद्धे यांचं 'गुप्त फळ' बनलं.
बीबीसी ट्रॅव्हलचे टॉम शिलर याचा माग काढायला स्वतःच जपानच्या वाकायामा भागात गेले.
सांकोबानचा मागोवा
त्यांना तिथे दिसला वाकायामा किल्ला. वाकायामा शहराच्या मध्यभागी एका टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे.
हा किल्ला म्हणजे 1603 ते 1867 या काळात जपानवर राज्य करणाऱ्या टोकुगावा शोगुनाटे राज्यकर्त्यांचं शेवटं सैन्य ठाणं होतं.
टोकुगावा म्हणजे सामुराई राजे. हा किल्ला 16 व्या शतकात बांधला गेला होता आणि किशू-टोकुगावा कुटुंबांचं घर होतं. हे कुटुंब म्हणजेच जपानवर राज्य करणाऱ्या तीन सामुराई घराण्यांपैकी एक घराणं.
जपानची होंशू बेटं आणि नवीन राजधानी एडो टोक्याचं दक्षिणेकडून होणाऱ्या आक्रमणांपासून रक्षण करणं ही या सामुराई कुटुंबाची जबाबदारी होती.
किशू टोकुगावा राजांनी सांकोबानच्या लागवडीवर बंदी घातली होती. याची लागवड फक्त त्यांच्या किल्ल्यात व्हायची, आणि किल्ल्यातल्या सांकोबानच्या झाडाचं रक्षण सामुराई योद्धे करायचे. 19 व्या शतकापर्यंत सांकोबान किशू टोकुगावा राजांच्या किल्ल्यातच बंदिस्त राहिलं. पण त्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी याची लागवड करायला सुरुवात केली.
योशिनोरी कोडामा अशाच एका शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचं कुटुंब गेल्या 110 वर्षांपासून वाकायामा भागात लिंबाच्या वेगवेगळ्या प्रजातींचं, संत्र्याच्या प्रजातींच उत्पादन घेतं. गेल्या चार पाच वर्षांपासून वाढती मागणी पाहाता त्यांनी सांकोबानचंही उत्पादन घ्यायला सुरुवात केलीये.
कोडामांनी टॉम शिलर यांच्याशी बोलताना सांगितलं की. "सांकोबानची लागवड करणं सर्वात सोपं आहे कारण हे झाड जुनं आहे. इतकी वर्षं बंदिस्त होतं त्यामुळे याचं हायब्रीड झालं नाही, त्यामुळे या लिंबावर रोग पडत नाहीत."
याच्या चवीचं वर्णन करताना कोडामा म्हणतात, "एकदम लिंबासारखं आंबट, पण हे लिंबू साधंसुधं नाही तर राजाच्या जीभेला रूचेल असं."
म्हणजे काय तर रसरशीत, उच्चभ्रू, आंबट आणि हलकीशी गोड चव. कोडामा म्हणतात की आजही सांकोबान विकत घेणारे म्हणजे अत्यंत उत्तम स्वयंपाक करणाऱ्या, खाणाऱ्या व्यक्ती, किंवा महागड्या रेस्टॉरंटचे शेफ असतात.
सांकोबान फळ म्हणूनही खाल्लं जातं आणि त्याचा रस स्वयंपाकातही वापरतात. जपानचे काही शेफ माशांच्या काही रेसिपीमध्ये सांकोबानचा रस आवर्जून वापरतात.
सांकोबान तसं नेहमीच्या लिंबापेक्षा मोठं असतं. मग ते अर्धं कापून त्याच्यातला सगळा रस काढून घेतला जातो. मग त्याच्या वाटीसारख्या सालीत सीफुड भरतात आणि सर्व्ह करतात.
सांकोबानची चव एखाद्या सामुराई योद्ध्याला आवडेल अशीच आहे असं म्हणतात. उत्साहवर्धक तरी हलकेच जीभेवर पसरणारी, खूप अंगावर न येणारी, आत्माला थंडावा देईल अशी तृप्त.
वाकायामाच्या सामुराई योद्ध्यांनी ही चव शोधली आणि आपल्यापुरतीच मर्यादित ठेवली. आता कुठे ती जपानला परिचयाची होतेय. अखेर सांकोबानची चव घेण्यासाठी तुम्हाला लपूनछपून किल्ल्याची भिंत ओलांडून जायची गरज नाही.