You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मृत्यूआधी तुम्हाला दिसू शकतो पूर्ण आयुष्याचा फ्लॅशबॅक?
- Author, होली हाँडरीच
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
आपला मृत्यू होत असताना अखेरच्या क्षणी संपूर्ण जीवनातील क्षण आपल्या डोळ्यासमोरून जाऊ शकतात (फ्लॅशबॅक दिसू शकतो), असं शास्त्रज्ञांना एका अभ्यासात अपघातानं मिळालेल्या माहितीवरून समोर आलं आहे.
काही शास्त्रज्ञांच्या टीमने एपिलेप्सी (फेफरं येणं) झालेल्या एका 87 वर्षीय वृद्धाच्या मेंदूच्या लहरींचा अभ्यास केला. पण मेंदूच्या लहरींचं न्यूरॉलॉजिकल रेकॉर्डिंग करताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचं निधन झालं. पण त्यावेळी त्यांचा मृत्यू होत असतानाच्या क्षणातील त्यांच्या मेंदूच्या लहरींचं अनपेक्षितपणे रेकॉर्डिंग झालं.
स्वप्न पाहताना किंवा जुन्या आठवणींचं स्मरण करताना जसा मेंदूच्या लहरींचा पॅटर्न असतो, तोच पॅटर्न या व्यक्तीच्या मेंदूच्या लहरींमध्ये मृत्यू होण्याच्या 30 सेकंद आधी आणि 30 सेकंद नंतर आढळल्याचं, यात स्पष्ट झालं.
मेंदूची अशा प्रकारची क्रिया ही व्यक्तीला त्याच्या अखेरच्या क्षणी जीवनातील विविध आठवणी येऊ शकतात हे दर्शवते, असं या टीमनं अभ्यासात म्हटलं आहे. फ्रंटियर्स इन एजिंग न्यूरोसायन्समध्ये मंगळवारी हा अभ्यास प्रसिद्ध झाला.
या टीमला त्यावेळी कॅनडाच्या व्हॅन्कोव्हरमध्ये अपघातानं जे काही मिळालं ते मृत्यू होत असलेल्या व्यक्तीच्या मेंदूचं आजवरचं पहिलं वहिलं रेकॉर्डिंग होतं, असं या अभ्यासाचे सहलेखक डॉ. अजमल झेम्मार यांनी सांगितलं.
"हे सगळं काही अगदीच योगायोगानं घडलं. आम्ही असा कोणताही प्रयोग करायचं किंवा अशा प्रकारे लहरींचं रेकॉर्डिंग करायचं ठरवलं नव्हतं," असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
आपल्याला आपल्या जीवनातील प्रिय व्यक्ती किंवा आनंदी आठवणींची झलक पुन्हा पाहायला मिळू शकते का? याचं उत्तर सांगणं अशक्य असल्याचं डॉ. झेम्मार म्हणाले.
"मला तात्विक दृष्टीनंच विचार करायचा असेल, तर मी असा अंदाज लावेल की, जर मेंदूला फ्लॅशबॅक दाखवणं शक्य असेल तर तो शक्यतो तुम्हाला चांगल्या आठवणीच पुन्हा दाखवेल, वाईट आठवणी दाखवणार नाही, पण प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची संस्मरणीय आठवण वेगळी असू शकते." असंही ते म्हणाले.
डॉ झेम्मार हे सध्या लुईसविले विद्यापीठात न्यूरोसर्जन आहेत. मनुष्याचं हृदय मेंदूला रक्त पुरवठा करणं थांबवण्याच्या 30 सेकंदांपूर्वी त्यांच्या मेंदूच्या लहरी एका विशिष्ट पॅटर्नचं अनुसरण करतात. आपण अत्यंत एकाग्र चित्तानं एखादं काम करताना, स्वप्न पाहताना किंवा महत्त्वाचं काम करताना ज्या पद्धतीचा पॅटर्न मेंदूंच्या लहरींचा असतो, तसाच या फ्लॅशबॅकच्या वेळी असतो.
व्यक्तीच्या हृदयाचं कार्य थांबल्यानंतर व्यक्तीला शक्यतो मृत घोषित केलं जातं. पण त्यानंतरही 30 सेकंदांपर्यंत या लहरी म्हणजेच आठवणींचा फ्लॅशबॅक सुरू असतो.
"व्यक्तीनं आयुष्यात अनुभवलेल्या गोष्टींची ही कदाचित अखेरची आठवण असू शकते, मृत्यूपूर्वी काही सेंकदांमध्ये आपल्या मेंदूद्वारे आपण त्या आठवणी पुन्हा अनुभवतो."
या अभ्यासामुळं आणखी काही प्रश्नही उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे, माणसाचा मृत्यू नेमका केव्हा होतो? जेव्हा हृदय काम करणं थांबतं तेव्हा की मेंदूचं कार्य बंद होतं तेव्हा?
पण एका व्यक्तीच्या अभ्यासावरून अशा प्रकारचे व्यापक निष्कर्ष काढणं शक्य नसल्याचं झेम्मार यांच्या टीमनं म्हटलं आहे. या रुग्णाला एपिलेप्सीचा त्रास होता आणि रक्तस्त्राव तसंच मेंदूला सूज आल्यानं यात अधिक गुंतागुंत होती, असंही डॉ. झेम्मार म्हणाले.
"मला एका प्रकरणाच्या अभ्यासावरून निष्कर्ष काढणं कधीही योग्य वाटलं नाही," असंही डॉ. झेम्मार म्हणाले. 2016 मध्ये सुरुवातीला अशा प्रकारे मेंदूच्या लहरींचं रेकॉर्डिंग केल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारची प्रकरणं शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही.
पण 2013 मध्ये निरोगी उंदरांवर केलेल्या एका अभ्यासातून याबाबत काही संकेत मिळू शकतात.
या अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये अमेरिकेतील संशोधकांनी उंदरांच्या हृदयाचं कार्य थांबल्यानंतर 30 सेकंदांपर्यंत त्यांच्या मेंदूच्या लहरींमध्ये उच्च स्तरावरील हालचालींची नोंद केली होती. डॉ. झेम्मार यांच्या रुग्णाच्या प्रकरणातही असेच संकेत आढळून आले होते.
या दोन्ही अभ्यासांमध्ये असलेलं साम्य हे आश्चर्यकारक असल्याचंही डॉ. झेम्मार म्हणाले.
एका मानवाच्या अभ्यासाचे निष्कर्ष समोर आल्यामुळं आता मानवाच्या जीवनाच्या अखेरच्या क्षणांचा अभ्यास करण्यासाठीचा दरवाजा खुला होईल, अशी आशाही त्यांना आहे.
"मृत्यूच्या क्षणाच्या संदर्भातील या प्रयोगामध्ये काहीतरी गूढ आणि अध्यात्मिक आहे, असं मला वाटतं," असं डॉ. झेम्मार म्हणाले. "असा निष्कर्ष म्हणजे असा क्षण असतो, ज्यासाठी शास्त्रज्ञ हे जगत असतात."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)