You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सीरिया : अमेरिकेच्या विशेष लष्करी पथकाकडून इस्लामिक स्टेट संघटनेचा प्रमुख ठार
अमेरिकेच्या विशेष सैन्याने उत्तर-पश्चिम सीरियामध्ये जिहादी गट इस्लामिक स्टेटचा (IS) नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशीला ठार केले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही माहिती जाहीर केली आहे.
"आमच्या लष्करी सैन्याचे कौशल्य आणि शौर्यासाठी आभार. अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशी याचा युद्धभूमीत पराभव केला आहे." असं निवेदनात म्हटलं आहे. या मोहिमेत सहभागी झालेले सर्व सैनिक सुखरुप परतले आहेत असं बायडन यांनी स्पष्ट केलं.
गुरुवारी रात्री टर्कीच्या सीमेजवळच्या इडलिब प्रांतात अमेरिकेच्या विशेष पथकाची हेलिकॉप्टर्सी उतरली. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या विशेष पथकाला प्रचंड गोळीबाराला सामोरं जावं लागलं. वाहनावर बसवण्यात आलेल्या अँटी एअरक्राफ्ट गन्समधून अमेरिकेच्या पथकावर आक्रमण करण्यात आलं. सुमारे दोन तास गोळीबाराचे आवाज ऐकू येत होते.
ऑक्टोबर 2019 मध्ये अबू बक्र अल-बगदादीच्या मृत्यूनंतरची अमेरिकेच्या लष्कराची ही सगळ्यात मोठी मोहीम मानली जात आहे.
जिहादी गट आणि टर्कीचा पाठिंबा असलेले बंडखोर यांचा हा भाग बालेकिल्ला मानला जातो. हे दोन्हीही अमेरिकेचे कडवे शत्रू आहेत.
सीरियातून मिळालेल्या माहितीनुसार, अटमेह शहरात 13 जणांचा मृत्यू झाला. यात सहा लहान मुलांचाही समावेश आहे.
घटनास्थळावर काय परिस्थिती?
AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या एका प्रतिनिधीने दोन मजली इमारतीचा दौरा केला होता. अमेरिकन मोहिमेत या इमारतीला लक्ष्य करण्यात आलं होतं. याठिकाणी हल्ल्याच्या खाणा-खुणा पाहता येऊ शकतात.
येथील भिंतींवर रक्ताचे डाग आहेत. खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. छत खाली पडलेलं आहे तसंच इमारत कमकुवत झाली आहे.
व्हाईट हेल्मेट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिव्हील डिफेन्सने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं. त्यानुसार, त्यांचे सैनिक जवान दुपारी सव्वातीन वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी 13 मृतांना बाहेर काढले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)