बलुचिस्तानमध्ये कट्टरतावाद्यांचा हल्ला; 4 सैनिकांसह 15 हल्लेखोर ठार

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पाकिस्तानचे गृह मंत्री शेख रशीद यांनी बलुचिस्तान प्रांतातील नोशकी आणि पंजगुरमधील एफसी (फ्रंटियर कॉर्प्स) मुख्यालय या दोन ठिकाणी झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यात आतापर्यंत चार सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पंजगुरमध्ये अजूनही ऑपरेशन सुरू आहे. तसंच काही हल्लेखोरांनी सुरक्षा दलांना घेरलं आहे, असं ते म्हणाले.

गृहमंत्र्यांनी एका व्हीडिओमध्ये म्हटलं की, हल्लेखोरांनी बुधवारी रात्री उशिरा नोशकी आणि पंजगुरमध्ये एक मोठा हल्ला केला. सुरक्षा दलांनी तो उधळून लावला होता.

"नोशकीमध्ये नऊ दहशतवाद्यांना ठार केलं आहे, तर लष्करातील चार जवान शहीद झाले आहेत. तसंच पंजगुरमध्ये सहा दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे," असा दावा त्यांनी केला.

शेख रशीद यांच्या मते, पंजगुर आणि नोशकी दोन्ही ठिकाणांहून कट्टरतावाद्यांना पळवून लावलं आहे.

"पंजगुरमध्ये सुरक्षा दलांनी किमान चार किंवा पाच दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. त्यांच्यावर लष्कर नियंत्रण मिळवेल."

दूसरीकडे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्यांचा निषेध केला. "आम्ही आमच्या शूर सैनिकांना सलाम करतो. त्यांनी पंजगुर आणि नोशकीमध्ये लष्करी तळांवरील दहशतवादी हल्ले उधळून लावले आहेत," असं ते म्हणाले.

पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, लष्कर आमच्या संरक्षणासाठी जीवनाचं बलिदान देत आहेत. संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी एकजुटीनं उभा आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या लष्कराच्या जनसंपर्क विभागाच्या वतीनं बुधवारी रात्री एक निवेदन जाहीर केलं. "पंजगुरमधील दहशतवाद्यांनी दोन ठिकाणांहून एफसी कार्यालयात घुसण्याचा प्रवेश केला, पण वेळेवर करण्यात आलेल्या कारवाईनं हा कट उधळून लावला," असं त्यात म्हटलं होतं.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत निवेदन जारी केलं. त्यात संघटनेच्या मजीद ब्रिगेडनं पंजगुर आणि नोशकीमध्ये ऑपरेशन सुरू असून त्यात दोन हल्लेखोर मारले गेल्याचा दावा केला आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी हल्ल्यांचा निषेध केला आहे. "पाकिस्तानची संरक्षण पथकं कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला उधळून लावण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांचा दृढ संकल्प आणि साहस यांच्यावर हल्ला करता येणार नाही. दहशतवादी त्यांच्या उद्देशात कधीही यशस्वी होणार नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.

बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर झियाउल्लाह लांगो यांनी बुधवारी रात्री बीबीसीबरोबर बोलताना याबाबत माहिती दिली. पंजगुरमध्ये फ्रंटियर कोर कॅम्पजवळ स्फोट झाला होता. त्यात सहाजण जखमी झाले होते. तसंच नोशकीमध्ये स्फोटानंतर ऑपरेशन क्लीनअप सुरू आहे. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच नेमकं किती नुकसान झालं हे सांगता येईल, असं ते म्हणाले.

मीर झियाउल्लाह यांनी या घटनांचा निषेध केला. "आमच्या सुरक्षा दलांचे जवान दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभे आहेत तसंच दहशतवाद्यांचे सर्व इरादे उधळून लावले आहेत," असं ते म्हणाले.

नोशकीमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, हा स्फोट एवढा मोठा होता की, त्यामुळं आसपासचे पोलिस ठाणे, सरकारी रुग्णालय आणि उपायुक्त कार्यालय हादरून गेलं.

काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तानाच्या केच परिसरात 25 ते 26 जानेवारी दरम्यानच्या रात्री झालेल्या कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात लष्कराच्या 10 जवानांचा मृत्यू झाला होता.

आयएसपीआरनं हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर एका निवेदनाद्वारे हल्ल्याला दुजोरा दिला. "पाकिस्तानच्या लष्करातील 10 जवान शहीद झाले आहेत. तर प्रत्युत्तराच्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला आहे," असं ते म्हणाले.

बंदी असलेली दहशतवादी संघटना बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं ?

"दहशतवादी कॅम्पमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. तसंच गेटवरच्या सुरक्षारक्षकांनी अनेक हल्लेखोरांना ठार केलं होतं. त्यांचे मृतदेह एफसी गेटवर पडले होते," असं नोशकीमध्ये एफसीच्या एका अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या फरहत जावेद यांच्याशी बोलताना म्हटलं.

नोशकीमध्ये एका पोलिस अधिकाऱ्यानं फोनवर बीबीसीला सांगितलं की, कली शरीफ खान रोडकडून फ्रंटियर कोरच्या मुख्य द्वारावर एका जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला होता.

त्यांनी म्हटलं की, स्फोट एवढा जोरदार होता की, त्यामुळं जवळचं पोलिस ठाणं, उपायुक्त कार्यालय यांना हादरे बसले.

पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, स्फोटानंतर गोळीबार सुरू झाला होता आणि तो बराचवेळ सुरू होता.

त्यांनी म्हटलं की, एफसी मुख्यालयामधूनही फायरिंगचे आवाज ऐकू येऊ लागले आणि स्फोटानंतर मुख्यालयावर हल्ला झाला किंवा स्वसंरक्षणार्थ कर्मचाऱ्यांनी फायरिंग सुरू केली आहे, असं वाटू लागलं.

नोशकीमधील अशाप्रकारची पहिली घटना

नोशकीमधील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या स्फोटानंतर त्यांनी एफसी मुख्यालयातही एका लहान स्फोटाचा आवाज ऐकला आणि त्यानंतर लगेचच गोळीबार सुरू झाला, तो बराच वेळ सुरू होता.

एफसी मुख्यालयाच्या आतून फायरिंगचा आवाज येत राहिला, असंही प्रत्यक्षदर्शी म्हणाले.

प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं की, स्फोट आणि गोळाबार यामुळं एफसी मुख्यालयाच्या आसपासच्या परिसरात दहशत पसरली. तर स्फोटानंतर शहरातील सर्व दुकानं आणि व्यापारी केंद्र बंद झाली.

काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, त्यांनी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या काही तासांनंतर शहरावर दोन हेलिकॉप्टर उडत असल्याचंही पाहिलं होतं.

एफसी मुख्यालयातील स्फोटानंतर जिल्हा रुग्णालय आणि उपायुक्त कार्यालयातून जे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले त्यावरून लक्षात येतं की, स्फोटामुळं आसपासची कार्यालयं आणि घरांचं नुकसान झालं आहे.

कुठं आहेत नोशकी आणि पंजगुर?

नोशकी क्वेटा शहरापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर पश्चिमेला आहे. तर नोशकी जिल्ह्याची सीमा उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेला लागून आहे.

नोशकीमध्ये आधीही सुरक्षादलांवर बॉम्ब हल्ल्यांच्या घटनाना घडलेल्या आहेत. मात्र, मंगळवारी रात्री जी घटना घडली, ती नोशकी शहराच्या इतिहासातील पहिली घटना आहे.

दुसरीकडे पंजगुर या प्रांताच्या दक्षिणेला वसलेलं आहे. तिथून इराणची सीमा शंभर किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. तर हे स्थान प्रांताची राजधानी क्वेटापासून पाचशे किलोमीटर अंतरावर आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)