टेस्ट द टीव्ही : टीव्ही स्क्रीनवर चाटून घ्या पदार्थांची चव, पाहा किती रुपयांना असेल हा टीव्ही

टीव्ही टेस्ट

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

टीव्ही आधी कृष्णधवल म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट होता. कालांतराने कलर टीव्ही बाजारात आला. त्यानंतर कधी 3डी तर कधी HD टीव्ही बाजारात दाखल झाले. सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हींची लोकप्रियता आहे.

याच दरम्यान टीव्ही संदर्भात एका आगळ्यावेगळ्या बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लिकेबल टीव्ही म्हणून या नव्या टीव्हीला संबोधण्यात येत आहे. म्हणजेच या टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्ही चाटूही शकता.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जपानमधील एका प्राध्यापकांनी एक लिकेबल टीव्ही स्क्रीन बनवली आहे. ती चाटल्यास खाद्यपदार्थांच्या चवीचा आनंद घेता येऊ शकतो.

टीव्ही टेस्ट

फोटो स्रोत, Reuters

या टीव्हीला टेस्ट-द-टीव्ही असंही म्हटलं जात आहे. यामध्ये 10 कॅनिस्टर लावण्यात आलेले आहेत. एका हायजेनिक फिल्मवर ते फ्लेवर स्प्रे करतात. ही फिल्म टीव्ही स्क्रीनवर रोल करत राहते. दर्शक ते चाटूही शकतात.

हा टीव्ही बनवणारे मेईजी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक होमेई मियाशिता म्हणतात, "या टीव्हीच्या माध्यमातून शेफचं काम करणारे किंवा खाण्याच्या व्यवसायातील लोकांना लांबूनच ट्रेनिंग देता येऊ शकते.

त्यांच्या मते, बाजारपेठेत हा टीव्ही आणल्यास त्याची किंमत 875 डॉलर म्हणजेच सुमारे 73 हजार रुपये असू शकते.

प्रा. होमेई मियाशिता रॉयटर्सशी बोलताना म्हणाले, "लोक आपल्या घरातूनच जगातील इतर भागातल्या रेस्टॉरंटमध्ये बनवण्यात येणाऱ्या डिशचा आनंद यामुळे घेऊ शकतात."

याव्यतिरिक्त प्राध्यापक होमेई हे इतर कंपन्यांशीही या टीव्हीसंदर्भात चर्चा करत आहेत.

टीव्हीमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने विविध चवी कशा घालता येऊ शकतील, याबाबतही ते विचार करत आहेत.

टीव्ही टेस्ट

फोटो स्रोत, Reuters

त्यांच्या मते, एके दिवशी अशी एक यादी तयार होईल, त्यामध्ये वेगवेगळे स्वाद डाऊनलोड करून ठेवता येऊ शकतील.

प्रा. मियाशिता म्हणतात, कोरोना साथीच्या काळात जग ठप्प झालं होतं. पण अशा नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक इतर ठिकाणांशी कोणत्याही वेळी संपर्कात राहू शकतात."

सोशल मीडियावर या टीव्हीची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं.

यावरून लोक आश्चर्य व्यक्त करत असून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा टीव्ही लाँच करण्याची ही योग्य वेळ आहे का, असंही काहीजण विचारत आहेत.

एका युझरने म्हटलं, "कोरोना साथीच्या काळात हा टीव्ही यशस्वी होण्याची जास्तच शक्यता आहे, नाही का?"

प्रा. मियाशिता यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत मिळून नवनव्या पद्धतीचे उपकरण यापूर्वीही बनवले आहेत.

एकदा त्यांनी असा एक चमचा बनवला, ज्याच्या मदतीने जेवणाचा घास घेतला तर जेवण आणखी स्वादिष्ट लागतं.

त्यांच्या चवीच्या टीव्हीची एक झलक पत्रकारांना दाखवण्यात आली.

यामध्ये एका विद्यार्थिनीने मशीनला म्हटलं, "मला चॉकलेट हवंय." काही वेळाने तिची ऑर्डर स्क्रीनवर स्प्रे झाली. त्यांनी ते चाटून पाहिलं.

बातमीनुसार, त्यावेळी विद्यार्थिनीने त्याची चव चॉकलेटसारखीच लागली, असं म्हटलं होतं, हे विशेष.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)