You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनच्या सगळ्यांत मोठ्या रिअल इस्टेट कंपनीला कोट्यवधी डॉलर्सचा चुना कसा लागला?
चीनची सगळ्यांत मोठी रिअल इस्टेट (बांधकाम) कंपनी असणाऱ्या एका कंपनीला कोट्यवधी डॉलर्सचा चुना लागला आहे.
या कंपनीच्या संपत्तीचं नियोजन करणाऱ्या एका दुसऱ्या कंपनीशी त्यांचा संपर्क होऊ शकत नाहीये. या वेल्थ मॅनेजर कंपनीकडे चीनच्या कंपनीचे 313 मिलियन डॉलर्स होते.
ही वेल्थ मॅनेजर कंपनी चीनच्या कंपनीला गुंतवणुकविषयक सल्ला द्यायची. चीनच्या या कंपनीचं नाव 'चायन फॉर्च्यून लँड डेव्हलपमेंट' आहे आणि त्यांनी म्हटलं की, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स या भागात नोंदणीकृत असणारी दुसरी कंपनी 'चायना क्रिएट कॅपिटल' त्यांच्या पैशांची गुंतवणूक आणि त्याचं नियोजन करत होती.
फॉर्च्यून लँडने म्हटलं की, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. आधीच कर्जबाजारी झालेल्या या कंपनीला हा दुसरा मोठा झटका बसलेला आहे.
नक्की प्रकरण काय?
या महिन्यात 'फॉर्च्यून लँड' या कंपनीने अब्जावधी डॉलर्सचे बाँड डिफॉल्ट झाल्यामुळे (बुडल्यामुळे) आपल्या कर्जाची पुर्नबांधणी केली होती आणि याची माहिती दिली होती.
या आठवड्यात शांघाय स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर केलेल्या एका दस्ताऐवजानुसार, 2018 साली फॉर्च्यून लँड कंपनीच्या परदेशी शाखांपैकी एका शाखेने विंग्सकेंगो लिमिटेड नावाच्या दुसऱ्या कंपनीशी गुंतवणूक सेवा घेण्यासाठी करार केला होता.
या कागदपत्रांनुसार विंग्सकेंगो लिमिटेडने सांगितल्याप्रमाणे 'फॉर्च्यून लँड कंपनी'ने चायना कॅपिटल कंपनीला 313 मिलियन डॉलर्स पाठवले होते.
फॉर्च्यून लँडने म्हटलं की, त्यांना 2022 संपेपर्यंत या गुंतवणुकीतून वर्षाला 7 ते 10 टक्के व्याज मिळेल, अशी अपेक्षा होती.
कर्ज पुर्नबांधणीची योजना
फॉर्च्यून लँड कंपनीने सांगितलं की, आता ते क्रिएट कॅपिटल कंपनीशी संपर्क करू शकत नाहीयेत. त्यांचे पैसे न सापडल्यामुळे आता कंपनीच्या सध्याच्या आणि भविष्यातल्या नफ्यावर काय परिणाम होईल हे सांगता येत नसल्याचंही कंपनीने म्हटलं.
चीनचं बांधकाम क्षेत्र सध्या अगदीच संकटात सापडलं आहे. देशातल्या अनेक दुसऱ्या बांधकाम कंपन्यांसारखेच फॉर्च्यून लँड कंपनीचे शेअर्सही गडगडले आहेत.
फॉर्च्यून लँडचे जे शेअर्स शांघायमध्ये लिस्टेड आहेत त्यांना आपलं वित्तिय दायित्व पूर्ण करता न आल्यामुळे त्यांची किंमत 70 टक्क्याहून अधिक घटली आहे.
अर्थात फॉर्च्यून लँडने या महिन्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं की, घेणेकऱ्यांच्या एक गटाने कर्जाची पुर्नबांधणी करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. यामुळे कर्जबाजारी झालेल्या फॉर्च्यून लँडच्या जीवात जीव आलाय.
कर्जाचं संकट
फॉर्च्यून लँड चीनच्या कर्जबाजारी झालेल्या त्या बांधकाम कंपन्यांपैकी एक आहे, जी गेल्या वर्षी भरमसाठ कर्ज घेणाऱ्या कंपन्यांवर होणाऱ्या सरकारी कारवाईमुळे दबावाखाली आली होती.
चीनच्या बांधकाम क्षेत्रातली भलीमोठी कंपनी एव्हरग्रांडेवर जवळपास 300 अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. कर्जाच्या गाळात अडकलेली ही सगळ्यांत हाय-प्रोफाईल कंपनी आहे आणि गेल्या काही काळात काही परदेशी बाँडचं व्याज देऊ शकलेली नाही.
दरम्यान, या कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी असणाऱ्या कैसाने गेल्या आठवड्यात मॅच्युअर झालेल्या 40 कोटींच्या बॉण्डचं व्याज दिलं नाही. या कंपनीवर परदेशातल्या संस्थांचं 12 अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)