You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Priyantha Kumara: पाकिस्तानात श्रीलंकेच्या नागरिकाला ठार मारून रस्त्यावर जाळलं, जगभरातून टीका
श्रीलंकेच्या नागरिकाची ईशनिंदेच्या आरोपात मारहाण करून ठार केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली. इम्रान यांनी सदरहू घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त करताना जे घडलं ते लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे. डॉन वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे.
शुक्रवारी ही घटना घडली. श्रीलंकेच्या नागरिकाला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाला आग लावण्यात आली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा निषेध करताना जे घडलं ते अतिशय दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या घटनेसंदर्भात आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं वचन इम्रान यांनी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिलं आहे.
मारहाणीत मृत्यू झालेल्या श्रीलंकेच्या नागरिकाची पत्नी निरोश दसानिया यांनी म्हटलं आहे की, अमानुष पद्धतीने मारहाण करून माझ्या पतीला मारण्यात आलं. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांना आवाहन करते की माझे पती आणि दोन मुलांना न्याय मिळवून द्या".
दरम्यान मारहाणीत मृत्यू झालेल्या श्रीलंकेच्या नागरिकाचा मृतदेह इस्लामाबाद इथे पाठवण्यात आला आहे. 6 डिसेंबर रोजी मृतदेह श्रीलंकेला पाठवण्यात येईल.
पाकिस्तानच्या पंजाबमधील सियालकोट शहरात श्रीलंकेच्या एका नागरिकाला ईशनिंदेच्या आरोपात मारहाण करून ठार केल्यानंतर संपूर्ण जगभरातून आणि पाकिस्तानातही यावरून टीका होत आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा पाकिस्तानसाठी 'सर्वात लज्जास्पद' दिवस आहे, असं म्हटलं आहे. तर पाकिस्तानातील नागरिकही 'आपण काय बनलो आहोत?' असे प्रश्न स्वतःलाच विचारत आहेत.
शुक्रवारी सियालटकोटच्या एका कारखान्यात काम करणारे श्रीलंकेचे नागरिक प्रियांथा कुमारा यांना जमावानं ईशनिंदेच्या आरोपात प्रचंड मारहाण करून ठार केलं आणि नंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकला.
सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित व्हीडिओ आणि फोटो ट्रेंड झाल्यानंतर नेते, राजदूत सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही या घटनेवर तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केलं. तसेच देशात वाढत असलेल्या कट्टरवादाकडे सरकारनं लक्ष द्यावं असंही म्हटलं आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर आरीफ अल्वी यांनी इम्रान खान यांचं ट्वीट रिट्विट करत हा अत्यंत दुःखद दिवस असल्याचं म्हटलं आहे.
"मी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानच्या सरकारनं त्वरित केलेल्या कारवाईचं कौतुक करतो. सियालकोटची घटना खरंच अत्यंत दु:खद आणि लज्जास्पद आहे. ती कुठल्याही प्रकारे धार्मिक नाही. इस्लाम हा मॉब लिंचिंगऐवजी विचारात्मक न्यायाचा सिद्धांत स्थापित करणारा धर्म आहे," अशी पोस्ट त्यांनी केली.
'आपण काय बनलो आहोत?'
पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी ट्विट करत ही घटना भयावह आणि निंदनीय असल्याचं म्हटलं आहे.
"जमावाकडून होणारा हिंसाचार कोणत्याही स्थितीत स्वीकारला जाऊ शकत नाही. राज्याकडे सर्व गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे कायदे असताना हे मान्य नाही. पंजाब सरकारनं कठोर आणि स्पष्ट कारवाई करायला हवी," असं त्यांनी ट्विट केलं.
पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त करत पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडं उत्तर मागितलं आहे.
"लज्जास्पद!! मी अत्यंत दुःखात आणि रागात आहे!! इम्रान खान तुमच्याकडून न्याय आणि यामुळं देशाला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत उत्तर अपेक्षित आहे," असं ट्विट त्यांनी केलं.
पाकिस्तानच्या पत्रकार यूसरा असकरी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं असून, 'आपण काय बनलो आहोत?' असा सवाल उपस्थित केला आहे.
प्रसिद्ध इस्लामी स्कॉलर मौलाना तारीक जमील यांनी ट्वीट करत यावर टीका केली आहे.
"सियालकोटमध्ये रसूलच्या नावाच्या आडून विदेशी व्यक्तीला जिवंत जाळल्याचा मला प्रचंड खेद आहे. केवळ आरोपाच्या नावाखाली कायदा हाती घेणं इस्लाम धर्माच्या विरोधी आहे. इस्लाममध्ये हिंसाचार आणि कट्टरतावादाला स्थान नाही. इस्लामी अभ्यासकांनी कट्टरतावाद रोखण्यासाठी सकारात्मक भूमिका निभवावी," असं त्यांनी पोस्ट केलं आहे.
भारत आणि आरएसएसचा उल्लेख
"सरकारी अधिकाऱ्यांसह पाकिस्तानचे नागरिक आरएसएसचा धार्मिक कट्टरवाद आणि भारत सरकारशी त्यांची जवळीकता तसंच मुस्लिमांविरोधातील हिंसाचाराचा निषेध करतात. तीच अडचण पाकिस्तानात असून हा प्रकार टीएलपीला प्रोत्साहन आणि माफी दिल्याच्या सरकारी धोरणामुळं आहे," असं ट्विट पाकिस्तानचे सामाजिक कार्यकर्ते उसामा खिलजी यांनी ट्विट केलं आहे.
पाकिस्तानचे माजी राजदूत आसीफ दुर्राणी यांनी ट्विट करून सियालकोटमध्ये झालेल्या प्रकारासाठी प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाची मान शरमेनं झुकली पाहिजे, असं ट्विट केलं आहे.
"धार्मिक कट्टरतावादी असं वर्तन करत असतील, तर तुम्ही नियम-कायदे विसरुन जा. हा प्रकार आरएसएसशी संबंधित भारतीय फॅसिस्टपेक्षा वेगळा नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानचे पत्रकार सय्यद तलत हुसैन यांनी ट्विट करून, 'सियालकोटच्या मॉब लिंचिंगवर जे मगरीचे अश्रू ढाळत आहेत, त्यांना लाज वाटायला हवी, असं म्हटलं आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी ते गर्दीचा वापर करायचे आणि आता, गर्दीचं सरकार देशातून विवेकवाद संपवत असल्याचं दिसत आहे, ही तर केवळ सुरुवात आहे, पुढे पुढे पाहा,' असं म्हटलं.
शान नावाच्या एका ट्विटर यूझरनं "ते 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानात आले होते आणि राजको इंडस्ट्रीमध्ये जनरल मॅनेजर होते. त्यांनी बीएससी (प्रोडक्शन इंजीनिअरिंग) केलं होतं. त्यांना पाकिस्तानची सेवा केली आणि क्षमतेनुसार सर्वोत्तम योगदान दिलं. आज त्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली, हे किती दुर्दैवी आहे. RIP प्रियांथा कुमारा," असं ट्विट केलं.
पाकिस्तानचे पत्रकार हामीद मीर यांनी या घटनेत सहभागी असलेल्या काही तथाकथिक तरुणांचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे. ते पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानाबाबत इस्लामचा हवाला देत आहेत.
"ईशनिंदेच्या आरोपींना न्यायालयाद्वारे शिक्षा देण्याऐवजी स्वतः त्यांना शिक्षा देण्याचा अभिमान असलेल्यांना कदाचित इस्लाममध्ये मृतदेहाचा अपमान आणि त्याला जाळणं याला काहीही स्थान नाही, हे माहिती नसेल," असं हामीद मीर यांनी लिहिलं आहे.
"तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानची घोषणा देत प्रियांथा कुमारा यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे," असं पत्रकार हमजा अझहर सलाम यांनी एक फोटो ट्विट करत पोस्ट केलं आहे.
सियालकोटमध्ये काय घडलं?
मृताची ओळख प्रियांथा कुमारा अशी आहे. ते सियालकोटच्या वजिराबाद रोडवरील एका खासगी कारखान्यात एक्सपोर्ट मॅनेजरच्या पदावर काम करत होते, असं सियालकोट पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.
रुग्णालयात त्यांचा पूर्णपणे जळालेला मृतदेह आणण्यात आला होता. त्यांच्या शरिराची जवळपास राख झाली होती, असं सियालकोटमधील रुग्णालयाच्या सुत्रांनी बीबीसीला सांगितलं आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हीडिओ शेअर करण्यात आले आहेत. त्यात सियालकोटच्या वजीराबादचा हा मार्ग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या व्हीडिओमध्ये एका व्यक्तीचं जळालेलं शरिर दिसू शकतं. काही व्हीडिओमध्ये एक व्यक्ती जळत असल्याचं दिसत आहे.
घटनेचे प्रत्यक्षदर्शी मोहम्मद मुबाशिर यांच्या मते, कारखान्यात सकाळपासूनच अशा अफवा उडाल्या होत्या की, प्रियांथा कुमारा यांनी ईशनिंदा केली आहे.
"ही अफवा अत्यंत वेगानं कारखान्यात पसरली. कर्मचाऱ्यांनी कारखान्याबाहेर आंदोलनही केलं होतं."
या आंदोलनादरम्यान अनेक लोक पुन्हा फॅक्टरीमध्ये शिरले आणि त्यांनी प्रियांथा कुमारा यांचा अपमान करत त्यांना मारहाण केली आणि आग लावली.
पाकिस्तानच्या रेस्क्यू सर्व्हीस 1122 च्या एका अधिकाऱ्यांनी जवळपास 11:35 वाजता वजीराबाद रस्त्यावर दंगल झाल्याबाबत फोन आला आणि त्यांचं पथक घटनास्थळी पोहोचलं, असं बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
"आम्ही त्याठिकाणी पोहोचलो तेव्हा पोलिसांचं छोटं पथक होतं आणि त्या व्यक्तीवर कारखान्याच्या आत हल्ला करण्यात आला होता," असं त्यांनी सांगितलं.
मदतीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या मते, ते गणवेशात होते आणि लोक प्रचंड संतप्त होते. "आम्हाला कोणत्याही प्रकारे पीडित व्यक्तीला मदत करणं शक्य नव्हतं. तसंच हस्तक्षेप करणंही शक्य नव्हतं. या दरम्यान ते प्रियांथा यांना मारहाण करत रस्त्यावर घेऊन आले."
रस्त्यावर आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं वाटत होतं, असं ते म्हणाले.
संतप्त लोक त्यांना रस्त्यावर घेऊन आले, आग लावली आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण गर्दीच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत कमी होती.
रेस्क्यू वर्करने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे दुपारी साडे बारा वाजता पोलिसांचं पथक मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)