You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मॅग्डालेना अॅंडरसन: मित्र पक्षांनी साथ सोडल्यानंतर काही तासांतच पंतप्रधानांचा राजीनामा
स्वीडनमध्ये पहिल्या महिला पंतप्रधानांना पद मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच राजीनामा द्यावा लागला आहे.
मॅग्डालेना अँडरसन यांच्या नावाची बुधवारीच नेत्या म्हणून घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या सहकारी पक्षानं साथ सोडल्यामुळं त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळं त्यांनी मांडलेला अर्थसंकल्पही मंजूर होऊ शकला नाही.
त्याऐवजी संसदेनं विरोधी पक्षानं मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या बाजूने मतदान केलं. त्यात स्थलांतराला विरोध असलेल्या उजव्या (कट्टर) विचारसणीशी संबंधित बाबींचा समावेश होता.
"मी राजीनामा द्यायची इच्छा असल्याचं सभापतींना सांगितलं," असं अँडरसन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
प्रथमच तयार करण्यात आलेला आणि एका बाजूला झुकलेला अर्थसंकल्प मान्य करू शकत नाही, असं त्यांच्याबरोबर आघाडी असलेल्या ग्रीन्स पार्टीनं म्हटलं.
एकहाती सत्ता मिळवून पुन्हा पंतप्रधानपद मिळवण्याची आशा मला आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं अँडरसन म्हणाल्या.
"स्वीडनच्या घटनेतील तरतुदीनुसार आघाडी सरकारमधील एखाद्या पक्षानं बाहेर पडल्यानंतर सरकारला राजीनामा द्यावा लागतो," असं त्यांनी सांगितलं. वैधतेवर प्रश्नचिन्हं निर्माण होईल अशा सरकारचं नेतृत्व करायचं नाही असं त्या म्हणाल्या.
याबाबत पुढचं धोरण ठरवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधणार असल्याचं, संसदेच्या सभापतींनी सांगितलं.
त्यापूर्वी, बुधवारीच अँडरसन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. स्वीडनच्या कायद्यानुसार विरोध करणाऱ्या खासदारांची मते बहुमतापेक्षा कमी असली, तरी अशा व्यक्ताची निवड होते.
स्वीडनमध्ये महिलांनी मतदान केल्यानंतर जवळपास 100 वर्षांनी एका 54 वर्षीय सोशल डेमोक्रॅट महिला नेत्यांचं संसदेनं अशा प्रकारे उभं राहून स्वागत केलं होतं.
अगदी अखेरच्या क्षणी विरोधी पक्षांबरोबरच्या करारानुसार त्यांची नेत्या म्हणून निवड करण्यात आली. स्वीडनच्या बहुतांश नागरिकांना जास्तीत जास्त पेन्शनच्या अटीवर हा निर्णय झाला होता. त्यांना आघाडीतील मित्र ग्रीन्स पक्षाचा पाठिंबाही मिळाला होता.
स्वीडनच्या संसदेतील 349 सदस्यांपैकी 174 सदस्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. तर त्यांना पाठिंबा दिलेल्या 117 खासदारांशिवाय इतर 57 सदस्यांनी तटस्थ राहत त्यांना केवळ एका मतानं विजय मिळवून दिला.
अँडरसन या सिटी ऑफ उप्पसला सिटीमधील माजी स्विमिंग चॅम्पियन राहिलेल्या आहेत. त्यांनी 1996 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तत्कालीन पंतप्रधान गोरान पर्सन यांच्या त्या सल्लागार होत्या. गेली सात वर्ष त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम सांभाळलं होतं.
खासदारांनी मॅग्डालेना अँडरसन यांना पाठिंबा देण्यापूर्वीपर्यंत स्वीडन हा महिला पंतप्रधान नसलेला एकमेव नॉर्डिक देश होता.
स्टॉकहोम येथील बीबीसी प्रतिनिधी मॅडी सॅवेज यांचं विश्लेषण
स्वीडनच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान बनण्याचा जल्लोष करण्यापूर्वीच, सूर्य मावळण्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला.
मात्र, स्वीडनच्या राजकाराणातील गुंतागुंत पाहता, त्यांना पंतप्रधानपदी पुन्हा पाहता येणार नाही, असंही काही नाही. जर पुन्हा पंतप्रधानपदासाठी मतदान झालं, तर त्यांना पुन्हा निवडलं जाईल.
त्याचं कारण म्हणजे ग्रीन पार्टीनं सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला, तरी अँडरसन यांना पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
मात्र त्या अल्पमतील सरकारच्या एका विचित्र स्थितीत अडकतील. शिवाय त्यांना आधीच मंजूर झालेल्या उजव्या विचारणसरणीच्या अर्थसंकल्पाचा स्वीकार करावा लागेल.
या सर्व राजकीय घडामोडींवरून स्वीडनमधील राजकारणात किती मतभेदाचं वातावरण आहे, हे स्पष्ट होतं. आता मतदार पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मतदार उजव्या किंवा डाव्या विचारसरणीकडे सत्ता देतात की नाही, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)