You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Tesla : टेस्लाचं अॅप बंद पडलं आणि अनेकांना आपली गाडी सुरूच करता आली नाही
टेस्ला कारचं अॅप अचानक क्रॅश झाल्यानंतर गाड्या लॉकच असल्यानं अनेकांना कारमध्ये प्रवेशच करता आला नसल्याचं अनेक कार चालकांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
टेस्ला कार वापरणाऱ्या अनेकांनी सोशल मीडियावर कारच्या मोबाईल अॅपमध्ये आलेल्या एरर मेसेजबाबत पोस्ट केली. या एररमुळं त्यांचा कारबरोबरचा संपर्क तुटल्यानं त्यांना कारबाहेरच ताटकळत रहावं लागलं.
या प्रकरणानंतर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी स्वतः एका यूझरला सोशल मीडियावर प्रतिसाद दिला. दक्षिण कोरियातील या व्यक्तीला मस्क यांनी ट्विटरवर "Checking" म्हणजेच तपासत आहोत असं उत्तर दिलं.
त्यानंतर मस्क यांनी अॅप लवकरच पुन्हा सुरू होत असल्याचीही माहिती दिली.
अॅपमध्ये एररच्या 500 तक्रारी
टेस्लाची कार चालवण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी टेस्लाच्या अॅपचा किल्लीसारखा वापर केला जातो. मात्र, टेस्लाच्या कार वापरताच येत नसल्याच्या अनेक ऑनलाईन तक्रारी मालकांनी केल्या.
"मी शक्यतो कार सुरू करण्यासाठी फोनमधील अॅपचाच वापर करतो. त्यामुळं मी घरापासून एका तासाच्या अंतरावर अडकलो आहे," असं ट्विट एकानं केलं.
शुक्रवारी युरोपातील प्रमाणवेळेनुसार 16.40 वाजता जवळपास 500 यूझर्सने अॅपमध्ये एरर आल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पाच तासांनी केवळ 60 जणांना असा एरर आल्याची माहिती मिळाली आहे.
मस्क यांनी ट्विट करत या प्रकरणी माफी मागितली. "असं पुन्हा घडणार नाही, यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहोत," असं मस्क म्हणाले.
भारतात चाचणी सुरू
टेस्ला ही जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. इलॉन मस्क यांच्यासारखा स्टार CEO असलेली ही कंपनी अनेकदा गाड्यांची निर्मिती नियोजित वेळेनुसार न करू शकल्यामुळे सुरुवातीच्या अनेक वर्षांमध्ये वादात राहिली.
गेल्या काही वर्षांत टेस्लाच्या गाड्या जगभरात लोकप्रिय होत आहेत. इतकंच नव्हे तर टेस्ला गाड्यांच्या मागणी आणि यशानंतरच टोयोटा, फोक्सवॅगन, फोर्ड आणि जनरल मोटर्ससारखे जागतिक कार निर्माते इलेक्ट्रिक कार निर्मितीकडे वळले.
अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या टेस्ला कार भारतातही येणार असल्याची गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू आहे. या कंपनीच्या गाड्यांची चाचणीसुद्धा भारतात सध्या सुरू आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)