ICC T20 World Cup: अबूधाबी क्रिकेट स्टेडियमचे पिच क्युरेटर मोहन सिंग यांचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

संयुक्त अरब अमिरात येथील (UAE) अबूधाबी क्रिकेट स्टेडियमचे पिच क्यूरेटर मोहन सिंग यांचं निधन झालं आहे.

UAE मध्ये सध्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. पण याचदरम्यान या आलेल्या या दुःखद बातमीमुळे क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मोहन सिंग यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून यासंदर्भात पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती क्रिकबझ या वेबसाईटने दिली.

आज (रविवार, 7 नोव्हेंबर 2021) सकाळी मोहन हे त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले होते. दुपारी न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) यासंदर्भात ट्विट करून सर्वांना माहिती दिली.

अबू धाबी क्रिकेटच्या अधिकाऱ्यांनीही एक प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकाराची माहिती दिली आहे.

मोहन सिंग यांनी सुरुवातीची काही वर्षे चंदीगड येथील मोहाली क्रिकेट स्टेडियमवर काम केलं होतं. त्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून ते अबू धाबी येथे पिच क्युरेटर म्हणून काम पाहत होते.

त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर अबू धाबी क्रिकेटने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं, "आमचे प्रमुख पिच क्युरेटर मोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा करताना आम्हाला अतीव दुःख होत आहे. त्यांनी 15 वर्षं अबू धाबी क्रिकेटची सेवा केली. सिंग यांनी या मैदानाच्या यशात मोठी भूमिका बजावली आहे."

रविवारचा न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा सामना नियोजित वेळापत्रकानुसार व्हावा, अशी विनंती मोहन यांच्या कुटुंबीयांनी तसंच अबू धाबी स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यामुळे हा सामना ठरल्यानुसार घेण्यात आला, असं ICC च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

ICC ने आपल्या संवेदना मोहन सिंग यांच्या कुटुंबीयांकडे व्यक्त केल्या आहेत. आगामी काळात मोहन सिंग आणि त्यांनी केलेलं कार्य यांचा गौरव करण्यात येईल.

माध्यमांनी या कठीण प्रसंगी सिंग यांच्या कुटुंबीयांच्या खासगीपणाचा आदर करावा, असंही ICC ने म्हटलं.

दरम्यान, या प्रकरणी अबूधाबीच्या स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पण या प्रकारामुळे 2007 च्या वेस्ट इंडीजमधील क्रिकेट विश्वचषकाच्या कटू आठवणी ताज्या झाल्याचं दिसून येत आहे.

त्यावेळी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचाही अशाच प्रकारे संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळून आलं होतं. त्याचाही तपास करण्यात आला, पण पुढे काहीच निष्पन्न होऊ शकलं नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)