You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्वस्त्रांची माहिती विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्याला कसं पकडलं गेलं?
- Author, तारा मॅककेल्वे
- Role, बीबीसी न्यूज, अॅनापोलीस, मॅरीलँड
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
अण्वस्त्रांशी संबंधित अत्यंत गुप्त माहिती विकण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप अमेरिकेतील एका जोडप्यावर होत आहेत.
याप्रकरणात 42 वर्षीय जोनाथन टोएबे आणि त्यांची 45 वर्षीय पत्नी डायना यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुरू आहे.
दोषी आढळल्यास दोघांनाही जन्मठेपेच्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.
जोनाथन आणि डायना हे दोघेही अत्यंत आरामदायक, व्यावसायिक आणि सुखवस्तू आयुष्य जगत होते.
अमेरिकेच्या मेरीलँडची राजधानी अॅनापोलीस येथील उच्चभ्रू परिसरात त्यांचं घर होतं.
इथं त्यांची दोन मुलं तसंच दोन पिटबुल कुत्रे यांच्यासह त्यांचं सुखी आयुष्य सुरू होतं.
जवळचे रस्ते उंचच उंच झाडांनी वेढलेली आहेत. बाजूला एक वॉटरपार्क आहे. तिथं गवत कापणी करून ठेवलेलं आहे. या गवताच्या सुगंधाने प्रसन्न वातावरण बनलेलं आहे.
इथंच एक यॉट हार्बर आणि जवळच अमेरिकेची नेव्हल अॅकेडमीसुद्धा आहे.
पण अमेरिकेचे फेडरल एजंट 9 ऑक्टोबर रोजी टोएबे दांपत्याच्या घरी पोहोचले आणि या परिसराची शांतता भंग पावली.
या एजंट्सनी तब्बल 6 हजार किलोमीटरपर्यंत या दांपत्याचा पाठलाग केला होता. अॅनापोलीस पासून ते जेफरनस काऊंटी, वेस्ट व्हर्जिनियापर्यंत एजंट त्यांच्या मागावर होते.
हेच ते ठिकाण होतं, ज्याठिकाणी टोएबे दांपत्याने कथितरित्या हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला होता.
तिथं टोएबे दांपत्याने परकीय देशाच्या सरकारला लष्कराची गुप्त कागदपत्रे विकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे.
दोषी सिद्ध झाल्यास आपलं उर्वरित आयुष्य त्यांना तुरुंगातच घालवावं लागू शकतं.
वेस्ट व्हर्जिनियाच्या एका न्यायालयातील न्यायाधीशांनी जोनाथन यांना तुरुंगात राहण्याचा आदेश दिला आहे. तर त्यांच्या पत्नीसाठी वेगळी सुनावणी घेतली जाणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या प्रकरणात अत्यंत साध्यासुध्या दिसणाऱ्या जोडप्याचा सहभाग कसा असू शकतो, हा प्रश्न आता उभा राहिला आहे.
या माध्यामातून जोडप्याने कथितरित्या गुप्तहेर बनण्यासाठी प्रयत्न केल्याचंही म्हटलं जात आहे.
विधी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, टोएबे कुटुंबाचे यासाठीचे प्रयत्न एप्रिल 2020 मध्ये सुरू झाले.
अमेरिकेच्या नौदलाचे कर्मचारी असलेल्या जोनाथन टोएबे यांनी एका परकीय सरकारसाठी काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला मेलच्या माध्यमातून संपर्क साधला.
आपण अमेरिकेच्या आण्विक पाणबुड्यांबाबत माहिती देऊ शकतो, असं या मेलमध्ये लिहिलं होतं.
जोनाथन हे नौदलच्या कार्यकारी प्रमुखाच्या कार्यालयात सिक्युरिटी क्लिअरन्स तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पाणबुड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या न्यूक्लिअर प्रपल्शन सिस्टीमसंदर्भात माहिती असल्याचा दावा केला होता.
जोनाथन यांच्या कामाची कथित पद्धत काय होती?
जोनाथन यांनी ज्या परकीय सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो देश अमेरिकेचा मित्र राष्ट्रच (उदा. फ्रान्स) होता. चीन किंवा रशियाप्रमाणे स्पर्धक राष्ट्र ते नव्हतं.
पण तो देश नेमका कोणता होता, याबाबत अधिक माहिती उघड करण्यात आली नाही.
जोनाथन यांनी त्या देशाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली.
त्यानंतर सर्वांनी मिळून जोनाथन यांना पकडण्यासाठी सापळा रचला.
जोनाथन यांनी पाठवलेलं पॅकेज काही महिन्यांनी डिसेंबर महिन्यात FBI कडे सोपवलं गेलं. त्यानंतर त्यांनी एक तोतया परकीय अधिकारी बनून जोनाथन यांच्याशी संपर्क साधला.
सरकारच्या आरोपांनुसार हे दांपत्य संवेदनशील माहिती एका मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून ठेवायचं. हे मेमरीकार्ड विशिष्ट अशा ठिकाणी ठेवून दिलं जात असे. त्यानंतर जोनाथन यांची पत्नी त्या ठिकाणी लक्ष ठेवायची. या पद्धतीला डेड ड्रॉप असं संबोधलं जातं.
टोएबे दांपत्य विकण्याचा प्रयत्न करत असलेले प्रपल्शन तंत्रज्ञान लष्कराच्या सर्वात मोठ्या गुप्त माहितीपैकी एक आहे.
नुकतेच अमेरिकेने ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून एक करार केला होता.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, नाकाबंदी पार करताना जोनाथन एका वेळी काही मोजकीच कागदपत्रे सोबत घेऊन जात.
षडयंत्रात कथितरित्या सहभागी असलेल्या त्या अधिकाऱ्याला त्यांनी एका नोटमध्ये लिहिलं होतं, "मी माझ्याकडे असलेल्या फाईल्स माझ्या नोकरीच्या दैनंदिन कामकाजादरम्यान हळू-हळू जमा करत आहे. माझ्यावर कुणाला संशय येऊ नये, यासाठी मी खूप सावध आहे."
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनुसार, माहिती पुरवण्यासाठी जोनाथन यांनी एसडी कार्ड लपवण्याच्या विविध युक्त्या वापरल्या होत्या.
कधी त्यांनी मेमरी कार्ड पीनट बटर सँडविचमध्ये ठेवलं. तर कधी च्युईंगमच्या पाकिटात ते ठेवलं.
पीनट बटर सँडविच कार्डसाठी जोनाथन यांना क्रिप्टोकरन्सी स्वरुपात 20 हजार डॉलरही मिळाले होते.
सुरुवातीला जोनाथन शांत-शांत राहू लागले होते. पण नंतर ते तोतया परकीय अधिकाऱ्यांसोबत सहज वागू लागले होते.
एकदा त्यांनी पत्रात लिहिलं, "जुन्या मित्रांसोबत दारू पित त्यांना आपली कहाणी सांगायला मजा येईल. सुरक्षित वाटेल तेव्हा तेही करू."
गेल्या आठवड्यात अटक होईपर्यंत जोनाथन यांनी अनेक कागदपत्रे गोळा केली होती. ते हेरगिरीचा प्रयत्न करत असल्याचं सिद्ध होण्यासाठी ही कागदपत्रे पुरावे म्हणून पुरेशी होती.
शेजाऱ्यांचं म्हणणं काय?
टोएबे दांपत्याच्या अटकेनंतर एका आठवड्यानंतरही त्यांच्या घरी सगळं जसंच्या तसं आहे.
त्यांच्या घरातील सीलिंग फॅन, बेसमेंटमध्ये अर्धवट स्वरुपात झालेलं काम, बैठकीच्या खोलीत मेजावर ठेवलेला पायमोजा जागचा हललेला नाही.
या दांपत्याचं सगळं काही ठिकठाक सुरू असताना त्यांनी अचानक या सगळ्या गोष्टी का सुरू केल्या. देशाची गुपितं परकीय राष्ट्राला विकण्याचा आरोप त्यांच्यावर कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न लोकांना पडला आहे.
शेजाऱ्यांच्या मते, हे कुटुंब जास्त सामाजिकही नव्हतं. ना पूर्ण एकांतप्रिय.
जोनाथन यांना मध्ययुगीन शस्त्रांमध्ये रस होता. त्याच्याशी संबंधित एका संघटनेशीही ते जोडलेले होते.
तर अटलांटाच्या एमोरी युनिव्हर्सिटीतून पीएचडी पूर्ण केलेल्या डायना एका खासगी शाळेत शिकवत होत्या.
हेरगिरीसाठी आवश्यक गरजा पाहिल्यास त्या त्यासाठी योग्यही नव्हत्या.
त्यांचे केस चमकणारे जांभळे होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवणं सोपं होतं.
आर्थिक अडचणीमुळे हेरगिरी?
व्यावसायिकरित्या तसंच वैयक्तिकरित्या टोएबे दांपत्य यशस्वी होतं. मग त्यांनी असं का केलं असेल?
वर्षानुवर्षे हेरगिरीच्या प्रकरणांमध्ये संशोधन करणारे मानसशास्त्रज्ञ डेव्हिड चारने अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया येथे कार्यरत आहेत.
हे प्रकरण गूढ असल्याचं त्यांना वाटतं. काही प्रकरणांमध्ये या परस्परविरोधी गोष्टी दिसून येतात. पैशांचा हव्यास किंवा बदला घेण्याची इर्षा यांमधून हा प्रकार घडू शकतो, असं ते म्हणाले.
लोक कितीही साधेसुधे असले तरी काहीतरी सिद्ध करण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होते. खरंतर प्रत्यक्षात ते अनेक गूढ लपवलेले असामान्य व्यक्ती असतात.
हेरगिरीसाठी काम करणं, धोका देणं या मानसिकतेचा अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याला एक विशिष्ट नाव दिलं आहे.
त्याला MICE म्हणजेच माईस म्हणून संबोधलं जातं.
एम वरून मनी (पैसे), आय वरून आयडिओलॉजी (विचारसरणी), सी वरून कॉम्प्रोमाईज (समझोता) आणि ई वरून ईगो (अहंकार) असा त्याचा अर्थ होतो.
या कारणांमुळेच लोक देशद्रोह करतात, असं अधिकारी सांगतात.
वकिलांच्या मते, जोनाथन यांना पैशाची गरज होती. आर्थिक विवंचनेतूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुप्त कागदपत्रांच्या बदल्यात एक लाख डॉल क्रिप्टोकरन्सी स्वरुपात मागितले होते.
न्यायालयाने त्यांच्या संपत्तीबाबत माहिती घेत त्यांना न्यायालयाकडूनच वकील पुरवला आहे. ते वकिलांची फी भरू शकतील की नाही, यासाठी हा वकील देण्यात आलेला आहे.
सध्या दोन वकिल त्यांचं प्रतिनिधित्व करत असून त्यांनी बीबीसीशी कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला.
एकूणच पैसा हेच प्रमुख कारण त्यांच्या या प्रयत्नांमागे असू शकतं, असं चारने यांना वाटतं.
त्यांचं घर पाहून त्यांची आर्थिक परिस्थिती समजून येणार नाही. पण त्यांची परिस्थिती बिकट होती. त्यांना अनेक अडचणी होत्या, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)