अफगाणिस्तान : कंदाहारमध्ये शुक्रवारच्या नमाजादरम्यान मशीदीवर आत्मघातकी हल्ला, 30 ठार

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अफगाणिस्तानातल्या कंदाहार शहरामध्ये एका शिया मशीदीत शुक्रवारचा नमाज सुरू असताना आत्मघातकी हल्ला करत स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये 30 जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत.

बीबी फातिमा मशीदीत हा स्फोट झाला. तिथे पडलेला फुटलेल्या काचांचा खच आणि जमिनीवर पडलेले मृतदेह दृश्यांमध्ये पहायला मिळत आहेत.

हा आत्मघातकी हल्ला होता, असं बीबीसीला सांगण्यात आलंय.

3 आत्मघातकी हल्लेखोर होते अशी माहिती आपल्याला एका स्थानिक पत्रकाराने दिल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलं आहे. यापैकी एकाने मशीदीच्या दरवाज्यात बॉम्बचा स्फोट केला तर इतर दोघांनी इमारतीच्या आतमध्ये आपल्याकडच्या बॉम्बचा स्फोट घडवून आणला.

"प्रार्थना संपल्यानंतर गोळीबाराला सुरुवात झाली. त्यानंतर 3 स्फोट झाले. आम्ही खिडकीकडे फेकले गेलो. मारले गेलेले, जखमी झालेले अनेकजण तिथे पडले होते," अहमदुल्लाह नावाच्या एका व्यक्तीने रॉयर्सला सांगितलं.

शुक्रवारच्या नमाजाला या मशीदीत सर्वाधिक गर्दी होते आणि स्फोट झाला त्यावेळीही इमारतीत अनेकजण होते.

अफगाणिस्तानातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असणाऱ्या कंदाहारवर तालिबानने 13 ऑगस्ट रोजी ताबा मिळवला.

इस्लामिक स्टेट गट (IS) ची स्थानिक शाखा - IS-K या हल्ल्याची जबाबदारी घेण्याची शक्यता असल्याचं ट्वीट बीबीसीचे अफगाणिस्तानातले प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांनी केलंय.

IS-K गटाचा तालिबान सरकारला प्रखर विरोध असून त्यांनी गेल्या काही दिवसांत अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत.

कंदाहार शहर ही तालिबानची जन्मभूमी मानली जाते. त्यामुळेच कंदाहारवरचा हल्ला तालिबानच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल.

गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानात उत्तरेला असणाऱ्या कुंडुझ शहरातल्या मशीदीवर नमाज सुरू असताना आत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये किमान 50 जण ठार झाले होते. ऑगस्ट अखेरीस अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यापासूनचा हा सर्वात भयानक हल्ला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)