You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा: भविना पटेल अंतिम सामन्यात पराभूत, रौप्यपदकावर समाधान
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस (क्लास 4) च्या अंतिम सामन्यात भारताच्या भविना पटेलला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भविनाला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागणार आहे.
भविना पटेल हिला अंतिम सामन्यात चीनच्या चाओ यिंग या खेळाडून पराभूत केलं.
तत्पूर्वी, भविना पटेलने शनिवारी (28 ऑगस्ट) अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला होता. या स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.
क्लास 4 गटाच्या सेमी फायनलमध्ये भविनाने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या मिआओ झांगवर 3-2 (7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8) असा शानदार विजय मिळवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविनाचं कौतुक केलं आहे.
कसा आहे भाविनाचा प्रवास?
गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातल्या सुंधिया गावचे रहिवासी हसमुखभाई पटेल यांची भविना ही कन्या.
"मी टोकियोमध्ये दाखल झाले तेव्हा मी शंभर टक्के द्यायचं ठरवलं. बाकी कशाचा विचार न करता सर्वोत्तम प्रदर्शन करायचं. तसं खेळले तर पदक पटकावेन याचा विश्वास होता. आज जशी खेळले तशीच अंतिम लढतीत खेळले तर सुवर्णपदक नक्कीच जिंकू शकेन. देशवासीयांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत."
भविना व्हीलचेअरवर बसून खेळते. बाराव्या वर्षी तिला पोलिओ असल्याचं स्पष्ट झालं. या आजाराने खचून न जाता भविनाने दमदार वाटचाल केली आहे.
सेमी फायनलच्या लढतीत, भविनाने पहिला गेम गमावला. मात्र जिद्दीने पुनरागमन करत पुढचे दोन गेम तिने जिंकले.
तिसरा गेम भविनाने अवघ्या चार मिनिटात जिंकला. पाचव्या आणि निर्णायक गेममध्ये भविनाने 5-0 आघाडी घेतली.
मात्र त्यानंतर ती 5-9 अशी पिछाडीवर पडली. मात्र पिछाडी भरून काढत भविनाने शानदार विजय मिळवला. झांगविरुद्धचा भविनाचा हा पहिलाच विजय आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भविनाने 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पेरिक रॅनकोव्हिकवर मात केली होती.
क्लास4 गटातील खेळाडू व्यवस्थित बसून शरीराचं संतुलन सांभाळू शकतात. त्यांचे हात संपूर्णदृष्ट्या कार्यक्षम असतात. पाठीच्या मणक्यातील किंवा सेरेब्रल पाल्सीमुळे त्यांना शरीराच्या खालच्या अपंगत्व आलेलं असू शकतं.
तेरा वर्षांपूर्वी भविनाने अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली.
2011 मध्ये भविनाने थायलंड इथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती.
2013मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भविनाने रौप्यपदक पटकावलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)