नीरज चोपडाने सुनावलं, ‘तुमच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी मला वापरू नका'

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

भारताचा टोकियो ऑलिम्पिक स्टार नीरज चोपडा चर्चेत राहणं साहजिक आहे.

देशासाठी ॲथलेटिक्समधलं पहिलं गोल्ड मेडल जिंकल्यानंतर तो काय खातो, कुठे राहतो, कसा व्यायाम करतो, कसा फिट राहतो, इतक्या दूरवर भाला कसा फेकतो - लोकांना सगळं जाणून घेण्यात रस आहेच. अशात त्याच्या एका मुलाखतीची बरीच चर्चा होते आहे.

या मुलाखतीत त्याने टोकियोमध्ये भालाफेकच्या अंतिम फेरीविषयीचा एक किस्सा सांगितला आहे.

तो म्हणालाय की त्याची भाला फेकण्याची वेळ आल्यानंतर त्याला त्याचा भाला सापडतच नव्हता. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याचा भाला हा पाकिस्तानचा खेळाडू अरशद नदीम याच्या हातात होता. मग तो गेला आणि त्याचा भाला परत आणून मग लगेचच फेकला. यामुळे जरा घाईगडबड झालीय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे सांगितलं आहे.

याच बातमीची मग ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू झाली. सर्वत्र या बातमीला शेअर करताना असं वळण देण्यात आलं की जणूकाही पाकिस्तानचा खेळाडू नीरजचा खेळ बिघडवण्याचा प्रयत्न करत होता. आणि एकप्रकारे या चर्चेला भारत विरुद्ध पाकिस्तान असा वाद रंगवण्याचा प्रयत्न झाल्यासारखं दिसलं.

मग काय? भारताच्या नीरज चोपडाने गुरुवारी एक व्हीडिओ ट्वीट करत म्हटलं की हा नाहक वाद उभा केला जातोय. एका व्हीडिओमध्ये त्याने म्हटलं की काही लोक त्यांच्या घाणेरड्या अजेंड्यासाठी माझ्या वक्तव्यांची मोडतोड करत आहेत.

"एका मुलाखतीत मी म्हटलं होतं की पहिल्या थ्रोच्या आधी माझा भाला पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीम यांच्या हातात होता. या वक्तव्याचा विनाकारण मोठा मुद्दा बनवला जात आहे. आम्ही सर्व खेळाडू आमचे भाले एकत्र ठेवतो आणि कोणीही ते वापरू शकतात. त्यामुळे तो भाला घेऊन अरशद थ्रोसाठी तयारी करत होता.

यात काही चुकीचं नव्हतं. मी माझ्या थ्रोसाठी त्याच्याकडे तो भाला मागितला. ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. ही गोष्ट एवढी वाढवून सादर केली जात आहे, याचा मला खेद आहे. खेळ हा एकमेकांना जोडतो," असं नीरज चोपडानं एक व्हीडिओ ट्वीट करून म्हटलं आहे.

या प्रकरणावर अरशद नदीमने काय म्हटलं?

बीबीसी उर्दूशी बोलताना अरशद नदीमने हे सर्व आरोप 'हास्यास्पद' असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

अरशद नदीमनं म्हटलं, "असं काही झालं नव्हतं. मी काही नीरज चोपडाचा वैयक्तिक भाला माझ्याकडे घेतला नव्हता. ऑलिंपिक आणि इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणताही खेळाडू स्वतःचं सामान वापरत नाही. सगळ्या सामानाची व्यवस्था आयोजक करतात."

"टोकियोमध्येही फायनल राउंडच्यावेळी आयोजकांनी अनेक भाले एकत्र ठेवले होते. कोणताही खेळाडू त्यांपैकी एक भाला उचलून वापरू शकत होता. माझ्या हातात जो भाला होता तो नीरज चोपडाने आधीच्या थ्रोमध्ये वापरला होता याची मला कल्पनाही नव्हती. मी जाणूनबुजून तो भाला माझ्याजवळ ठेवला नव्हता. मी असं का करेन? आणि मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, तो कोणत्याही खेळाडूचा वैयक्तित भाला नव्हता.

अरशद नदीमने पुढे म्हटलं की, ज्या भाल्याचा वापर करून नीरजने सुवर्णपदक जिंकलं, तो भाला मी त्याकडे मागितला होता हे सांगणंही हास्यास्पद आहे. त्यावेळी प्रत्येक खेळाडू आपल्या स्वतःच्या विवंचनेत असतो. अशावेळी या गोष्टी कशा शक्य आहेत?

अरशद आणि नीरजमधली चुरस

मुळात अरशद नदीम आणि नीरज चोपडा यांच्यातलं मैदानातलं द्वंद्व गेल्या काही वर्षांपासून जगाने पाहिलंय.

2018च्या आशियाई खेळांमध्येही या दोघांमध्ये चुरस कायम होती. तेव्हा नीरज चोपडाने सुवर्ण पदक पटकावलं होतं, तर अरशद नदीमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं.

पण दोघांमध्ये मैदानाबाहेर चांगली मैत्री असल्याचं नीरजने सांगितलं आहे. त्याच्या सुवर्ण पदकाच्या कामगिरीनंतर बोलताना तो म्हणाला होता की 'जर त्या विजयी पोडियमवर नदीम माझ्यासोबत उभा असता तर मला आणखी भारी वाटलं असतं. आशियाचं नाव झालं असतं.'

आणि आत्ताही नीरजने या व्हीडिओच्या माध्यमातून खेळ सर्वांना एकत्र आणतो, हे अधोरेखित केलंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)