You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
परतूर स्नेहसंमेलन वादात, मुलांनी पाकिस्तानी गाण्यावर तलवारींसह नृत्य केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जालना जिल्ह्यातील एका शाळेच्या कार्यक्रमात कथितपणे पाकिस्तानी गाण्यावर सादरीकरण केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधितांनी हे गाणं पाकिस्तानी नसून एका तुर्की टीव्ही मालिकेतील संगीत असल्याचा दावा केला आहे.
सोशल मीडियावर परतूर येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात पाकिस्तानी गाण्यावर नृत्य सादर केले असे आरोप झाले होते. तसेच या सादरीकरणादरम्यान पाकिस्तानी कट्टरतावादी मुमताज कादरी याचे छायाचित्रदेखील प्रदर्शित केल्याचा आरोप करण्यात आला होता.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी यात धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही फोटो वापरले नसल्याचा दावा केला आहे. तसेच जो व्हीडिओ व्हायरल झालाय त्यात मूळ फोटो एडिट आणि ब्लर केल्याचंही दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं.
ही घटना फेब्रुवारी 2025 मध्ये घडली होती. बीबीसी मराठीने या व्हीडिओची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
परतूर पोलिसांनी 19 जून 2026 रोजी मुख्याध्यापक वजियोद्दीन सिद्दीकी आणि इतर दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 (भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेस धोका निर्माण करणारी कृत्ये), 196 (गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे), 197 (राष्ट्रीय एकात्मतेवर परिणाम करणारी चुकीची माहिती पसरवणे) आणि 353 (लोकांमध्ये भीती किंवा घबराट निर्माण करणारी खोटी माहिती प्रसारित करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी "परतूर शाळेच्या प्रकरणात तीन जणांविरोधात एफआयआर दाखल झाल्याचं" स्पष्ट केलं. तसेच एका व्यक्तीला अटक झाली असून एकजण रुग्णालयात उपचार घेत आहे असं सांगितलं. पुढील तपास सुरू आहे असंही ते म्हणाले.
शाळेवर आरोप आणि मुख्याध्यापकांचं उत्तर
हा व्हीडिओ आता समोर आल्यानंतर माजी मंत्री तसेच आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी असिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णकांत कनवरिया यांच्याशी संपर्क साधून कारवाईची मागणी केली होती.
बबनराव लोणीकर शाळेवर आरोप करताना म्हणाले, "यात सगळ्या विद्यार्थ्यांना अतिरेक्यांचे कपडे घातले, सगळा पोशाख अतिरेक्यांचा. अतिरेक्यांच्या हातात जशा तलवारी असतात तशा तलवारी विद्यार्थ्यांच्या हातात दिल्या. या संस्थेमध्ये अशाप्रकारे अतिरेकी बनवण्याचं काम चालतं. याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. या संस्थेच्या अध्यक्षावर आणि संचालक मंडळावर मकोका लागला पाहिजे. हेडमास्तर आणि शिक्षकांवर मकोका लागला पाहिजे."
शाळेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक मोहम्मद वजियोद्दीन तारेख सिद्दीकी यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत ते म्हणतात, "शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या ज्या व्हीडिओवर जो आक्षेप घेण्यात आला, यूपीच्या महिलांनी आक्षेप घेतला. त्यांना मला एकच सांगायचं आहे की तो काही आक्षेपार्ह व्हीडिओ नाही. तुम्ही जर आमच्या युट्युबवर चॅनलवर जाऊन पाहिलं तर तुम्हाला बरीचशी देशभक्तीची गीतं, भारतीय संस्कृतीची गीतं, मराठी गीतं वगैरे तसंच भारताची संस्कृती दर्शविणारे परफॉर्मन्ससुद्धा दिसतील. मात्र तुम्ही ते परफॉर्म्स न पाहता तुम्हाला हा व्हीडिओ दिसला. हा व्हीडिओ आम्ही युट्युबवरून अर्तुगरुल गाजी या मालिकेतून घेतला. त्याच्यावर विद्यार्थ्यांनी परफॉर्म केलं."
ते पुढं म्हणाले, "आरोप करणाऱ्यांचा आक्षेप आहे की त्यात विद्यार्थ्यांच्या मागे स्क्रीनवर धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा काही इमेज आम्ही दाखवल्या. मात्र या इमेजमध्ये आक्षेपार्ह असं काही नाही. त्याच अर्तुगरुल गाजी या मालिकेतील जो हिरो आहे, त्याचे फोटो आम्ही स्क्रीनवर दाखवले होते. ज्या लोकांनी याला आक्षेप घेतला, त्यांनी त्यांच्या एक्स हँडल त्याला काहीतरी ब्लर केलेलं दिसतं. त्यामुळे त्यांनी मूळ फोटो ब्लर केले, त्याला एडिट केलं आणि त्याच्यात नेमकं काय केलं हे आम्हाला माहित नाही."
FIR मध्ये नेमकं काय नमूद आहे?
पोलीस अंमलदार गोविंद भगवानराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 18 जून 2026 रोजी परतूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, 22 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी आयोजित स्नेहसंमेलनात सादर झालेल्या नृत्याविषयी आक्षेप घेण्यात आले आहेत. या व्हीडिओच्या आधारे तक्रारदाराने शाळेतील संबंधित शिक्षक आणि आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 152, 196 (1)(अ), 197, 353(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले असून पोलीस तपास सुरू आहे.
व्हीडिओत नेमकं काय दिसतं?
व्हायरल झालेल्या व्हीडिओची पुष्टी बीबीसी मराठीनं केलेली नाही. मात्र त्यावर आक्षेप घेणाऱ्या लोकांच्या मते या व्हीडिओत व्हीडिओत काही विद्यार्थी एका कथित वादग्रस्त ओळींवर नृत्य करत असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या हातात तलवारीसारखी वस्तू देण्यात आल्याचं दिसतं असं आरोप करणारे म्हणतात. या कार्यक्रमात एका दहशतवाद्याच्या छायाचित्राचाही कथित वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, या प्रकारामुळे मुलांमध्ये चुकीचे संदेश जाऊ शकतात आणि समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
FIR मध्ये शाळेचे काही कर्मचारी आणि आयोजकांचा उल्लेख आहे. तक्रारदाराने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी शैक्षणिक संस्थांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.