You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'तालिबानच्या क्रूर काळात मी बाबांना गमावलं' - अफगाण महिलेची व्यथा
अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापण्याची तयारी करत आहे. त्याचवेळी 1999 मध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर एका महिलेनं त्यांच्या कुटुंबाची व्यथा मांडली. या महिलेचं कुटुंब 1999 मध्ये तालिबानच्या शासन काळादरम्यान पूर्णपणे विखुरलं गेलं होतं.
अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या हेरात शहरातील राहणाऱ्या फरीबा दहा वर्षांच्या असताना त्यांनी वडिलांना अखेरचं पाहिलं होतं. तालिबाननं त्यांचं अपहरण केलं होतं, असं त्यांच्या कुटुंबीयांचं मत होतं. ही फरीबा यांची कहाणी आहे. लोकांसमोर ओळख जाहीर होऊ नये यासाठी, यातील नावं बदलण्यात आलेली आहेत.
तालिबानच्या शासन काळात राहणं हे एखादं वाईट नातं निभावण्यासारखं आहे. सुरुवातीला सर्वकाही चांगलं वाटतं. ते आश्वासनं देतात काही आश्वासनं पूर्णही करतात. अगदी काळजी घेत ते पावलं टाकत असतात. पण तुम्हाला हळू-हळू असुरक्षिततेची जाणीव व्हायला लागते आणि त्याचवेळी ते त्यांच्या योजना आखत असतात. हळू-हळू जगाला अफगाणिस्तान विषयाचा कंटाळा येऊ लागतो आणि माध्यमं दुसऱ्या विषयांकडे वळतात. हळू हळू ते त्यांचा फास आवळतात आणि अखेर त्यांचं क्रूर रुप समोर येऊ लागतं.
माझ्या वडिलांचा जन्म हेरातमध्ये झाला होता. त्यांनी काबूल विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि नंतर ते तत्कालीन अफगाणिस्तान सरकारमध्ये एका छोट्याशा टीममध्ये काम करू लागले. रशियन गेले आणि मुजाहीदीन सत्तेत आले तेव्हा माझ्या वडिलांनी एका एनजीओमध्ये काम करायला सुरुवात केली होती. तालिबान हेरातला आलं तेव्हा माझ्या वडिलांकडे पळून जाण्याची संधी होती, पण ते घरीत थांबले. त्यांचं काम आणि हेरातवर प्रचंड प्रेम होतं.
'मी आईचा चेहरा कधीही विसरू शकणार नाही'
तालिबानच्या शासन काळात अनेक अडचणी आणि क्रौर्याचा सामना करावा लागला होता. त्यांच्या चार मुली होत्या. त्यांचं शिक्षण थांबलं होतं. एक लहान मुलगाही होता. पण त्याचं काम चांगलं होतं आणि ते त्याच्यावर आनंदी होते. ते स्वतःसाठी आणि आमच्यासाठी बरंच काही करत होते. ते प्राण्यांबरोबर काम करायचे त्यामुळं कठीण जीवनही सोपं वाटू लागत होतं.
1999 च्या जून महिन्यातली एक सकाळ होती. माझ्या वडिलांनी नाश्ता केला होता आणि ते ऑफिसला जायला तयार होत होते. जेव्हा ते बाईकवर कामाला निघाले तेव्हा ते मला पाहून हसले. काही वेळानं आमचे काही शेजारी त्यांची बाईक घेऊन आमच्या घरी आले आणि तालिबाननं त्यांना पकडून नेलं आहे, असं सांगितलं. मी आईचा त्यावेळचा चेहरा अजूनही विसरू शकलेली नाही. ती अगदी शांत, स्तब्ध झाली होती.
माझ्या पाच महिन्यांच्या भावाला घेऊन ती वडिलांना शोधायला गेली. वडिलांबाबत काहीही माहिती मिळाली नाही. ते कुठं आहेत किंवा जिवंतही आहेत की नाही, हे आम्हाला माहिती नव्हतं. माझे काका आणि माझ्या मित्रांनी त्यांना कुठं ठेवलंय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
वडिलांचा शोध
माझी आई दररोज तालिबानच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत होती, पण ते तिचं काहीही ऐकत नव्हते. जेव्हा हेरातमध्ये काहीही समजलं नाही तेव्हा माझे काका कंदहारला गेले. कारण तालिबाननं काही कैद्यांना कंहदारला नेल्याचं आम्हाला समजलं. पण तिथंही काही समजलं नाही. त्यानंतर ते काबूलला आणि नंतर मजार-ए-शरीफला गेले. पण तिथंही काही समजलं नाही.
आमच्या शेजाऱ्यांना मात्र खात्री होती की, त्यांना तालिबाननंच पकडलं आहे. इतरही काही शेजाऱ्यांना तालिबाननं पकडलं होतं. पण त्यानंतर त्यांना हेरात तुरुंगातून सोडण्यात आलं. माझी आई अत्यंत खंबीर होती. अगदी एखाद्या वाघिणीसारखी. ती पराभव स्वीकारणारी नव्हती. कुटुंबातील लोकांनी अनेकदा नकार दिला पण तिनं कधीही कुणाचं ऐकलं नाही. ती माझ्या लहान भावाला घेऊन (त्या काळात महिलांना पुरुष सोबत असल्याशिवाय बाहेर निघता येत नव्हतं, मग तो लहान मुलगा असला तरी हरकत नाही) कंदहारमध्ये मुल्ला उमरच्या कार्यालयात पोहोचली. तालिबाननं आईला मारहाण केली तसंच पुन्हा ती तिथं दिसली तर तिला दगडांनी ठेचून मारलं जाईल, अशी धमकी आईला दिली. आई निराश होऊन घरी परतली.
'तालिबानला माफ करू शकत नाही'
तालिबानच्या शासन काळात आमचं जीवन नरकासमान बनलं होतं. निराशेचा काळाकुट्ट अंधार आम्हाला दिसत होता. आई आमच्या सर्वांच्या सुरक्षेबाबत काळजी करत होती. आम्हाला घेऊन ती इराणच्या मशहदला पळून गेली. 2004 मध्ये अफगाणिस्तानातील स्थिती काहीशी सुधारली तेव्हा आम्ही परतलो. आम्हाला शिकायची इच्छा होती आणि आम्हाला स्वतःसाठी काही करायचं होतं.
आमच्या वडिलांच्या आमच्याकडून काही अपेक्षा होत्या. त्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या. मला अजूनही त्यांचं सुंदर हसू आठवतं. त्यांनी मला दिलेला पेन अजूनही माझ्याकडं आहे. आम्ही त्याचं दुःख व्यक्त करत बसू शकत नाही. आता आम्ही त्यांना विसरूही शकत नाही. आता आम्ही पुन्हा अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्याच्या बातम्या पाहत आहोत. त्यामुळं आम्हाला पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती वाटत आहे.
आता माझं लग्न झालं आहे आणि मी इंग्लंडमध्ये राहते. पण मला अफगाणिस्तानात असलेल्या माझी आई, बहिणी आणि भावाची काळजी आहे. आम्ही सहन केल्या तशा वेदनांचा सामना करावा लागलेल्या त्या लाखो कुटुंबांची मला काळजी आहे. त्या सर्वांचा दोष केवळ एवढाच आहे की, त्यांचा जन्म अफगाणिस्तानात झाला आहे.
(प्रोड्युसर: रोझिना सीनी)
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)