You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉर्ड्स भारत विरुद्ध इंग्लड टेस्ट: लॉर्ड्सवरील विजयाच्या भारताच्या 3 आठवणी
क्रिकेटची पंढरी असं लॉर्ड्सच्या मैदानाचं वर्णन केलं जातं. सोमवारी भारतीय संघाने या मैदानावरच्या तिसऱ्या विजयाची नोंद केली.
भारतीय संघाने लॉर्ड्सवर 19 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र केवळ तीनमध्ये भारतीय संघाने जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या ऐतिहासिक ठिकाणी विजयी कामगिरी केली.
1. दिलीप वेंगसरकरांचं शतक आणि कपिलचा अष्टपैलू खेळ (1986)
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. लॉर्ड्स इथे झालेल्या पहिल्याच कसोटीत विजय मिळवत भारतीय संघाने दिमाखात सुरुवात केली.
इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 294 धावांची मजल मारली. ग्रॅहम गूचने 114 धावांची खेळी साकारली. डेरेक प्रिंगलने 63 धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून चेतन शर्मा यांनी पाच विकेट्स घेतल्या.
दिलीप वेंगसरकर यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 341 धावा करत छोटी पण महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. वेंगसरकर यांनी 126 धावांची दिमाखदार खेळी केली.
मोहिंदर अमरनाथ यांनी 69 धावा करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडतर्फे ग्रॅहम डिलीने 4 तर डेरेक प्रिंगलने 3 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने दुसऱ्या डावात गुडघे टेकले. त्यांचा दुसरा डाव 180 धावातच आटोपला. कपिल देवने 4 तर मणिंदर सिंगने 3 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाला विजयासाठी 134 धावांचं लक्ष्य मिळालं. वेंगसरकर यांनी 33 धावा करत विजयाचा पाया रचला. कपिल देव (23) आणि रवी शास्त्री (20) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
कपिल देव यांना 24 धावा आणि 5 विकेट्स साठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डस मैदानावरचा भारतीय संघाचा हा पहिलाच विजय होता.
2. रहाणेची अजिंक्य खेळी, भुवीचा षटकार आणि इशांतचं सप्तक (2014)
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2014 मध्ये लॉर्ड्सवर संस्मरणीय विजय साकारला होता.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर तंत्रकौशल्याचा वस्तुपाठ सादर करत अजिंक्य रहाणेने सुरेख शतक साकारलं. अजिंक्यने 15 चौकार आणि एका षटकारासह 103 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 295 धावा केल्या.
इंग्लंडने गॅरी बॅलन्सच्या शतकाच्या जोरावर 319 धावा करत अल्पशी आघाडी घेतली. बॅलन्सने 110 धावांची खेळी केली. लायम प्लंकेटने 55 धावा करत त्याला चांगली साथ दिली. स्विंग बॉलिंगचा नमुना सादर करत भुवनेश्वर कुमारने सहा विकेट्स घेतल्या.
भारताने दुसऱ्या डावात 342 धावा करत विजयाची पायाभरणी केली. मुरली विजयचं शतक अवघ्या पाच धावांनी हुकलं.
रवींद्र जडेजाने 68 तर भुवनेश्वरने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघाने इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य ठेवलं.
इशांत शर्माच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने सपशेल शरणागती पत्करली. इशांतने 7 विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं.
इशांतलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
3. राहुलचं शतक, बुमराह-शमीची जोडी जमली रे (2021)
लोकेश राहुलच्या शानदार शतकाच्या बळावर भारतीय संघाने 364 धावांचा पल्ला गाठला. रोहित शर्माने 83 धावा केल्या. राहुलने 12 चौकार आणि एका षटकारासह 129 धावांची खेळी केली. जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.
कर्णधार जो रूटच्या 180 धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने 391 धावांची मजल मारत अल्प आघाडी घेतली. रूटने 18 चौकारांच्या साथीने ही खेळी सजवली. भारतातर्फे मोहम्मद सिराजने 4 तर इशांत शर्माने 3 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात भारताची अवस्था 55/3 अशी होती. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीने चौथ्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी केली. मात्र चौथ्या दिवसअखेर हे दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. रहाणेने 61 तर पुजाराने 45 धावांची खेळी केली.
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने 89 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच भारतीय संघाने इंग्लंडसमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं.
भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने शरणागतीच पत्करली आणि त्यांचा डाव 120 धावातच आटोपला. मोहम्मद सिराजने 4 तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या.
राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)