इराक: कोव्हिड वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत 50 रुग्णांचा होरपळून मृत्यू

इराकमधील एका रुग्णालयात कोव्हिड आयसोलेशन वॉर्डात लागेल्या आगीमुळं 50 हून अधिक जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
इराकच्या नसिरिया शहराच्या दक्षिणेला असलेल्या अल हुसैन रुग्णालयात ही आग लागली होती. सोमवारी रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
अद्याप आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र एका ऑक्सिजन टँकच्या स्फोटानंतर आग पसरल्याचा अंदाज प्राथमिक तपासानंतर वर्तवला जात आहे.
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कदीमी यांनी या प्रकरणी रुग्णालयाच्या प्रमुखांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
रुग्णांचे नातेवाईक या मुद्द्यावर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करत आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याचं वृत्तही रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाड्या जाळल्याचं रॉयटर्सच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

आग लागलेला नवीन वॉर्ड हा तीन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता. त्यात 70 बेडची व्यवस्था होती, अशी माहिती डॉक्टरांनी असोसिएटेड प्रेस (AP) या वृत्त संस्थेबरोबर बोलताना दिली.
एका स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आग लागली त्यावेळी या वॉर्डात किमान 63 लोक होते.
"मला आधी कोरोना व्हायरसच्या वॉर्डात एक मोठा स्फोट ऐकायला आला. त्यानंतर भीषण आग दिसली," असं रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकानं रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, AHMAD AL-RUBAYE
या घटनेनंतर अजूनही रुग्णांचा तपास घेणं सुरुच आहे.
इराकच्या संसदेचे सभापती मोहम्मद अल-हलबौसी यांनी या घटनेनंतर ट्वीट केलं. ही आग "इराकच्या नागरिकांच्या प्राणांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा स्पष्ट पुरावा आहे. हे अपयश संपवण्याची ही वेळ आहे," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.
यापूर्वी एप्रिल महिन्यात बगदादमध्ये एका रुग्णालयातही एका ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला होता. त्यात जवळपास 82 जणांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
बगदाद येथील अल खतीब हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली होती.
हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँक फुटल्यानं आगीची घटना घडली होती असं म्हटलं गेलं होतं.
स्फोट आणि आगीच्या त्या घटनेनंतर आरोग्य मंत्री हसन अल-तमिमी यांनी राजीनामा दिला होता.
अनेक वर्षांपासून युद्ध, उपेक्षित वागणूक आणि भ्रष्टाचार यात अडकलेल्या इराकच्या आरोग्य व्यवस्थेला कोरोनाच्या साथीचा मोठा फटका बसत आहे.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सध्याच्या आकड्यांनुसार इराकमध्ये 14 लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनामुळं आतापर्यंत 17,000 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























