इराक : हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँक फुटल्यानं कोरोनाग्रस्तांसह 82 जणांचा होरपळून मृत्यू

फोटो स्रोत, Reuters
इराकची राजधानी बगदाद इथं एका हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानं जवळपास 82 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखींमध्ये कोरोना रुग्णांचाही समावेश आहे.
या दुर्घटनेत 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बगदाद येथील अल खतीब हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.
स्थानिक वृत्तांनुसार, हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँक फुटल्यानं आगीची घटना घडली.
सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या व्हीडिओंमध्ये दिसतंय की, आगीच्या घटनेनंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला असून, ते इकडून-तिकडे पळत आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवतानाही व्हीडिओमध्ये दिसत आहेत.
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल कदीमी यांनी या घटनेला 'दुर्दैवी घटना' म्हटली असून, या घटनेच्या चौकशीचे आदेशीह दिले आहेत.
आगीच्या घटनेनंतर नातेवाईकांनी आपापल्या रुग्णांना शोधण्यासाठी धावाधाव सुरू केली होती.

फोटो स्रोत, EPA
अहमद जकी नावाची व्यक्ती त्यांच्या आजारी भावाला वाचवण्यासाठी तिथं आले होते. त्यांनी आगीच्या घटनेबद्दल सांगितलं. तसंच, त्यांनी काही रुग्णांना वाचवलंही आहे.
त्यांनी सांगितलं, "सुरुवातीला एक स्फोट झाला. दुसरा स्फोट दुसऱ्या बाजूने झाला. इंधन ओतल्यासारखी आग पसरत होती. माझ्या भावापर्यंत धूर पोहोचला. माझा भाऊ आजारी आहे, मी त्याला रस्त्यावर घेऊन आलो. त्यानंतर मी परत गेलो. आग शेवटच्या मजल्यापर्यंत पोहचली नव्हती. एका 19 वर्षांच्या मुलीचा श्वास कोंडताना मी पाहिले. तिचा मृत्यू झाला असता. मी तिला खांद्यावर उचलले आणि बाहेर आणले. लोक इकडे-तिकडे उडी मारत होते. डॉक्टर्स गाड्यांच्या छतावर पडले होते. मी पुन्हा वर गेलो आणि लोकांना खाली आणत होतो."
ही आग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागापासून सुरू झाली अशी माहिती इराकच्या नागरी संरक्षण खात्याचे प्रमुख मेजर जनरल कादीम बोहान यांनी सरकारी माध्यमांशी बोलताना दिली.
रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी मशीन काढल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाला तर काही लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला.
इराकमध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. आतापर्यंत देशात दहा लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
इराकच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 15,217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या महिन्यात इराकने कोरोना लसीकरण सुरू केले आणि आतापर्यंत देशातील 6.5 दशलक्ष लोकांनी लस घेतली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























