You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्त्रायलचा गाझावर पुन्हा हल्ला, गाझातून आगीचे फुगे सोडल्यानंतर कारवाई
गाझापट्टीमधल्या हमासच्या तळांवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केल्याचं इस्रायलने म्हटलंय. गाझामधून इस्त्रायलकडे ज्वलनशील फुगे सोडण्यात आल्यानंतर इस्रायलने हा हल्ला केला.
बुधवारी (16 जून) पहाटे गाझा शहरामधून स्फोटांचे आवाज येत होते.
मंगळवारी (15 जून) गाझामधून इस्रायलमध्ये आग लावू शकतील असे (incendiary) काही फुगे पाठवण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्याचं इस्रायलच्या अग्निशमन विभागाने म्हटलं आहे.
इस्रायल आणि गाझामध्ये 11 दिवसांच्या तुंबळ युद्धानंतर 21 मे रोजी युद्धविराम झाला होता. त्यानंतरची ही पहिली मोठी घटना आहे.
पूर्व जेरुसलेममध्ये मंगळवारी (15 जून) ज्यू नागरिकांनी एक मोर्चा काढला होता. गाझामध्ये दबदबा असणाऱ्या हमासकडून हा मोर्चा काढण्याबद्दल धमक्या देण्यात आल्या होत्या.
या मोर्चानंतर गाझापट्टीतून हे ज्वालाग्राही फुगे पाठवण्यात आले.
इस्रायलच्या फायटर जेट्सनी गाझा शहर आणि खान युनिसमधील हमासच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचं इस्रायलच्या लष्कराने (IDF) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय.
या निवेदनात म्हटलं आहे, "या परिसरामध्ये 'दहशतवादी कारवाया' सुरू होत्या आणि गाझा पट्टीमध्ये अशाच प्रकारच्या शत्रुत्त्वं वाढवणाऱ्या दहशतवादी कारवाया सुरू राहिल्या, तर सर्व प्रकारच्या प्रसंगांसाठी IDF सज्ज आहे."
या हवाई हल्ल्यांमध्ये कोणी जखमी झालं का, हे अद्याप स्पष्ट नाही.
'पॅलेस्टाईन शूरपणे प्रतिकार करत राहील आणि आमच्या भूमीमधून घुसखोरांना हटवत नाही, तोपर्यंत आमच्या हक्कांसाठी लढत राहू,' असं ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनामध्ये हमासच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
बीबीसीचे गाझामधले प्रतिनिधी रश्दी अबुआलौफ यांनी गाझामधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. इस्त्रायलच्या ड्रोन्सचे आकाशातून आवाज येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
गाझामधून सोडण्यात आलेल्या आग पेटवणाऱ्या फुग्यांमुळे दक्षिण इस्त्रायलमध्ये किमान 20 आगी लागल्याचं इस्त्रायलच्या अग्निशमन दलाने म्हटलंय.
बेंजामिन न्येतन्याहू यांची पंतप्रधान म्हणून 12 वर्षांची कारकीर्द संपुष्टात येऊन इस्त्रायलमध्ये नफ्ताली बेनेट यांच्या नेतृत्त्वाखालचं नवीन आघाडी सरकार अस्तित्त्वात आल्यानंतरची इस्त्रायल आणि गाझामधली ही पहिली हिंसक चकमक आहे.
हेही वाचलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)