You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Corona variants: कोरोना व्हायरसची वेगवेगळी रुपं किती धोकादायक ठरू शकतात?
- Author, जेम्स गॅलेघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
आपल्या समोर सध्या असा एक व्हायरस आहे, जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत अत्यंत सहजपणे किंबहुना दुप्पट वेगाने पसरतो, ही बाब एव्हाना स्पष्ट झाली आहे.
2019 च्या अखेरीस चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसचं नवं स्वरुप सध्या जगासमोर आहे.
सुरुवातीला युकेच्या केंट परिसरात आढळून आलेला कोरोनाचा अल्फा व्हेरियंट हा पूर्वीपेक्षा जास्त संसर्गजन्य होता, हे आपल्या निदर्शनास आलं.
पण त्यानंतर काही काळाने भारतात सर्वप्रथम आढळून आलेला डेल्टा व्हेरियंट त्यापेक्षाही जास्त संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
व्हायरस 'इव्हॉल्व' होण्याची म्हणजेच सातत्याने बदलण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. म्हणजे, आपण कोरोनाच्या नवनव्या आणि जास्त धोकादायक व्हेरियंट्सच्या कचाट्यात अडकलो आहोत का?
कोरोना व्हायरस आणखी किती धोकादायक स्वरुप घेऊ शकतो? या सर्व गोष्टीची काही मर्यादा आहे की नाही?
या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला कोरोना व्हायरसचा आतापर्यंतचा प्रवास समजून घ्यावा लागेल.
शास्त्रज्ञांच्या मते, कोरोना व्हायरस वटवाघळांमधून माणसांमध्ये आला आहे. त्याचा पहिलाच व्हेरियंट साथ सुरू करण्यासाठी पुरेसं होतं. त्याचप्रमाणे व्हायरस त्याचं काम चोख बजावताना दिसत आहे.
इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनच्या विषाणूतज्ज्ञ प्रा. व्हेंडी बार्कले सांगतात, "एखादा विषाणू मानवी शरीरात आल्यानंतर त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती असण्याची शक्यता अत्यंत कमी असते. तो मानवी शरीरात वास्तव्य करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. तिथं जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा त्याचा प्रयत्न असतो."
सर्वात धोकादायक अशा इबोला साथीपासून ते साधारण फ्लूंचं उदाहरण देताना त्या म्हणतात, "प्रत्येक वेळी व्हायरसने सुरुवातीला मानवी शरीरात प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यांनी आपलं खरं स्वरुप दाखवण्यास सुरुवात केली."
कोरोना व्हायरसचे किती व्हेरियंट असू शकतात?
एका व्हायरसची प्रसाराची क्षमता किती असते, याची कल्पना त्याच्या आर-नॉटच्या माध्यमातून मिळू शकते.
आता आर-नॉट म्हणजे काय? समजा, आपल्यात कोणत्याच रोगाची प्रतिकारक्षमता नाही. शिवाय आपण कोणती सावधगिरीही बाळगत नाही, अशा वेळी एका व्हायरसकडून किती व्यक्ती संक्रमित होऊ शकतात, त्याला व्हायरसची आर-नॉट क्षमता असं संबोधलं जातं.
कोरोना व्हायरसच्या पहिल्या व्हेरियंटची ओळख चीनच्या वुहानमध्ये पटवण्यात आली होती. तेव्हा त्याची आर-नॉट क्षमता 2.5 इतकी होती.
तर, नुकत्याच आढळून आलेल्या डेल्टा व्हेरियंटची आर-नॉट क्षमता 8.0 इतकी असू शकते, असं निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवलं होतं.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत व्हायरल इव्हॉल्यूशनचा अभ्यास करत असलेले डॉ. एरिस काटझोराकिस सांगतात, "या व्हायरसने आपल्याला खूपच त्रास दिला आहे. हा व्हायरस पूर्णपणे वेगळा आहे.
गेल्या 18 महिन्यांत या विषाणूने स्वतःला दोनवेळा बदलल्याचं आढळून आलं आहे. याचे अल्फा आणि डेल्टा व्हेरियंट 50 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचं दिसून येतं. कोणत्याही व्हायरसमध्ये इतका बदल होणं, हे स्वाभाविक मानलं जात नाही."
डॉ. एरिस यांच्या मते, कोरोना व्हायरसचा प्रसार आणखी वेगाने होऊ शकतो. आगामी काही काळात कोरोनाची संसर्गक्षमता आणखी वाढू शकते. त्याचे आणखी व्हेरियंट पाहायला मिळू शकतात.
दुसरीकडे, कोरोना व्हायरसपेक्षाही जास्त आर-नॉट दर असलेले इतर काही व्हायरस आहेत. उदाहरणार्थ, कांजिण्या आजार या बाबतीत खूपच पुढे आहे. त्याचा संसर्ग अत्यंत विस्फोटक पद्धतीने होऊ शकतो.
प्रा. बार्कले सांगतात, कोरोना व्हायरस आता आणखी वाढण्याची, आणखी धोकादायक होण्याची खूपच जास्त शक्यता आहे. पण नेमकं किती वाढ होईल, हे सांगणं अत्यंत कठीण आहे.
व्हेरियंट कशामुळे वाढत आहेत?
कोणतेही विषाणू आपलं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी काही युक्ती वापरतात.
म्हणजेच, मानवी पेशींसोबत ते आपलं स्वरुप बदलतात. हवेत अधिक काळ स्वतःला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे विषाणू रुग्णांमधील व्हायरस लोड वाढवतात.
जेणेकरून संबंधित रुग्णाचा श्वासोच्छवास, शिंकणे किंवा खोकणे या माध्यमातून जास्त प्रसार करता येईल. त्याशिवाय, संसर्गादरम्यान ते स्वतःमध्ये बदलही घडवून आणतात.
पण, कोरोना व्हायरसमध्ये अल्फा ते डेल्टा पर्यंतचा जो बदल आपण पाहिला, त्याचप्रकारे ओमेगा किंवा इतर व्हेरियंट्सचाही सामना आपल्याला करावा लागेल का? हे व्हेरियंट आणखी धोकादायक स्वरुप घेऊ शकतील का?
या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. एरिस काटझोराकिस सांगतात, "याचीही काही मर्यादा आहे. पुढे जाऊन एखादा सुपर-अल्टीमेट व्हायरस येईल, त्याच्याकडे म्यूटेट होण्यासाठीचे सगळे मार्ग असतील, असं आपण आताच म्हणू शकत नाही."
सध्या लसीकरणही सर्वत्र वेगाने सुरू आहे. यामुळेही कोरोनाच्या प्रसारात अडथळा निर्माण होऊ शकतो, असं तज्ज्ञांना वाटतं.
पण, लसीकरणानंतरही विषाणूमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, असं डॉ. काटझोराकिस यांना वाटतं.
त्यासाठी बीटा आणि डेल्टा व्हेरियंट यांचा उल्लेख त्यांनी केला.
डेल्टा व्हेरियंट फक्त वेगानेच पसरतो, असं नाही. तर प्रतिकारशक्तीलाही तो चकवा देऊ शकतो, हे आपण पाहिलं आहे, असं ते म्हणाले.
अशा स्थितीत कोरोना व्हायरसवर आळा घालण्यासाठी सर्वात उपयुक्त रणनिती काय असेल, याचा अंदाज लावणं अजूनही कठीणच आहे.
वेगवेगळ्या विषाणूंनी संसर्ग करण्याची पद्धत वेगळी असते. कांजिण्यांचा व्हायरस विस्फोटक आहे. पण एकदा होऊन गेल्यानंतर तो आयुष्यभराची प्रतिकारशक्ती सोडून जातो. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याला नवीन शरीराचा शोध असतो.
पण इनफ्लूएन्झा व्हायरसचा आर-नॉट अत्यंत कमी असतो. हा क्वचितच 1 पेक्षा जास्त असू शकतो. पण हा व्हायरस सातत्याने संसर्ग करत राहतो. प्रतिकारशक्ती असूनसुद्धा अनेकवेळा लोकांसाठी तो त्रासदायक ठरतो.
आशेचा किरण
प्रा. बार्कले म्हणतात, "आपण सध्या अत्यंत रंजक, निर्णायक आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. पुढील परिस्थितीचा अंदाज लावणं सध्या खूपच कठीण आहे.
दुसरीकडे, आणखी एक संकल्पना सातत्याने मांडली जाते. ती म्हणजे विषाणूला जास्तीत जास्त पसरायचं असेल तर त्याने स्वतःला कमी धोकादायक ठेवलं पाहिजे. पण अनेकांना ही संकल्पना मान्य नाही.
आपण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पोहोचल्यानंतर पहिला व्यक्ती राहिला की गेला, याच्याशी त्याचा काहीएक संबंध नसतो, असा युक्तिवाद करत वरील संकल्पना फेटाळून लावली जाते.
पण काहीही असलं तरी सध्या सुरू असलेलं लसीकरण हेच आपल्यासाठी आशेचा किरण आहे.
लसीकरण वेगाने झालेल्या देशांमध्ये कोरोनाचे पुढील व्हेरियंट्स निर्माण होणार नाहीत. पण जोपर्यंत विषाणू पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत त्याला तोंड देण्यासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)