You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान कोरोना : लस घेण्यास टाळाटाळ कराल तर सिमकार्ड होईल ब्लॉक
कोरोना व्हायरसवरची लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्तींचं सिमकार्ड ब्लॉक करण्यात येईल, असा इशारा पाकिस्तानच्या पंजाब सरकारने दिला आहे.
पंजाब प्रांताच्या सरकारने याबाबत निर्णय घेतल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.
कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीकोनातून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पंजाब प्रशासनाने हे पाऊन उचलल्याचं म्हटलं आहे.
पंजाबच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते सय्यद हम्माद रजा यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितलं, "कोरोना लस न घेणाऱ्या नागरिकांचे सिम कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."
पाकिस्तानमधील ARY वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, देशातील लसीकरण मोहिमेअंतर्गत पंजाबला देण्यात आलेलं लक्ष्य पूर्ण करू शकत नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं.
देशात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर NOC च्या घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने म्हटलं आहे.
देशातील सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने लस घेणं सरकारने अनिवार्य केलं आहे.
गेल्या आठवड्यात सिंध प्रांताच्या सरकारनेही कठोर पाऊल उचलत लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखण्याचा निर्णय घेतला होता, अशी बातमी डॉननेच दिली होती.
पाकिस्तानच्या सरकारने मात्र अशा प्रकारच्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत.
दुसरा डोस घेण्यास लोकांची टाळाटाळ
स्थानिक माध्यमांनुसार पाकिस्तानात 2 फेब्रुवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यानंतर सुमारे 3 लाख नागरीक लशीचा दुसरा डोस घेण्यास आले नाहीत.
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांच्या मते, पहिल्या डोसनंतर काही जणांच्या मृत्यूंची बातमी पसरली. तसंच काही जण नकारात्मक चर्चेमुळे लस घेण्यास नकार देत आहेत.
पंजाबच्या आरोग्य मंत्री यास्मीन राशिद यांनी लाहोरमध्ये सांगितलं की निर्बंध आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवल्यामुळे पंजाबात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे.
किमान 20 टक्के नागरिकांचं लसीकरण झालेल्या परिसरात सर्व निर्बंध हटवण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलं होतं.
तसंच लाहोरमध्ये मोठ्या दर्ग्यांबाहेर लसीकरण कॅम्प लावण्यात येणार आहेत. शिवाय, लस घेतलेले नागरीक सिनेमागृह, हॉटेल, लग्नसमारंभांना जाऊ शकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानात कोरोना रुग्णसंख्येत घट
पाकिस्तानात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. तीन महिन्यांनंतर पॉझिटिव्हीटी रेट 4 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे.
गेल्या 24 तासांत पाकिस्तानात कोरोनाचे 1303 नवे रुग्ण आढळून आले. तसंच 47 जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
भारताचा विचार केल्यास देशात गुरुवारी (10 जून) 91 हजार 702 नवे रुग्ण आढळून आले. तर 3403 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
देशात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली असून एक लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
पाकिस्तानात आतापर्यंत 9 लाख 38 हजार 737 जणांना कोरोनाची लागण झाली असून 21 हजार 576 जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे.
त्या तुलनेत भारतात आतापर्यंत 2 कोटी 92 लाख 74 हजार 823 जणांना कोरोनाची लागण झाली. तर 3 लाख 63 हजार 79 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.
पाकिस्तानात कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट इतकी प्रभावी ठरली नव्हती.
तिथं कोरोनाची पहिली लाट मे-जूनमध्ये आली. पण काही कालावधीत ती ओसरल्याचं दिसून आलं.
तर कोरोनाची दुसरी लाट सप्टेंबरच्या मध्यात आली आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत आकडेवारी स्थिर होती.
त्यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. मार्च महिन्यात 16 हजार सक्रिय कोरोना रुग्ण होते. पण एप्रिलमध्ये ही संख्या आठपटींनी वाढली.
सरकारने काय म्हटलं?
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पाकिस्तानातही अशीच स्थिती निर्माण झाली होती. शिवाय, रमजान महिन्यामुळे आव्हान आणखी कठीण बनलं होतं.
रमजानच्या महिन्यात पाकिस्तानातील मशिदी गर्दीने फुललेल्या असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता होती.
गेल्या वर्षी जगभरात रमजानच्या कालावधीत मशिदी बंद असताना त्या खुल्या ठेवणारा पाकिस्तान हा एकमेव देश होता.
यंदाच्या वर्षीही अशीच स्थिती पाहायला मिळाली. रमजानच्या दरम्यान मशिद आणि इमाम बारगाह उघडी होती.
पण लोकांनी सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचं पालन करण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती.
देशात प्रति 963 लोकांसाठी 1 डॉक्टर या प्रमाणात डॉक्टर उपलब्ध आहेत, त्यामुळे लोकांनी काळजी न घेतल्यास मोठं संकट उभं राहील, असा इशारा पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला होता.
गरीब मजूर आणि श्रमिक वर्गावर परिणाम होईल, असा कोणताही निर्णय आपल्याला घ्यायचा नाही, पण भारतासारखी परिस्थिती ओढवल्यास कठोर पावलं उचलली जातील, असंही इम्रान खान यांनी एप्रिल महिन्यात स्पष्ट केलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)