'क्वाड'मुळे चीन- बांगलादेश द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल का?

    • Author, रूपशा मुखर्जी
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

क्वाड या चार देशांच्या समूहामध्ये सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून चीननं नुकताच बांगलादेशला इशारा दिला आहे. क्वाड समुहाचं नेतृत्व अमेरिका करते. आता चीननं दिलेल्या या इशाऱ्यावर भारतीय उपखंडातीत अभ्यासक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

चीनचे बांगलादेशमध्ये असलेले राजदूत ली जीमिंग यांनी पत्रकारांना माहिती देताना अत्यंत आक्रमक पद्धतीनं बांगलादेशला थेट धमकी दिली होती.

इशारा किंवा धमकी देण्याची ही पद्धतच अनेकांना आवडलेली नाही. पत्रकारांशी बोलताना अशाप्रकारे मुत्सद्दी धोरणाविषयी इशारा देण्याचं कारण काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पण चीननं बांगलादेशला अचानक इशारा दिला आहे असंही नाही. अमेरिका आशिया खंडात मित्र गोळा करत आहे, आणि त्यावर चीननं सुरुवातीपासून करडी नजर ठेवली आहे. त्यात आता क्वाड त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय ठरला आहे.

अमेरिकेच्या भूमिकेवरून चीननं यापूर्वीदेखिल माध्यमांमध्ये आणि परराष्ट्र संबंधांच्या माध्यमातून चिंता व्यक्त केल्या आहेत. अमेरिका चीन आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं, चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनं ली जिमिंग यांच्या हवाल्यानं म्हटलं होतं.

मात्र चीनच्या राजदूतांनी दिलेलं वक्तव्य हे खेदजनक असल्याचं सांगत बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमीन यांनी, 'प्रत्येक देशाला कोणत्याही विषयावर त्यांचं ठोस मत मांडण्याचा अधिकार असला, तरी बांगलादेश आपलं परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो, असं म्हटलं आहे.

चीनच्या आक्रमक भूमिकेचं कारण काय?

चीनच्या राजदूतांनी केलेलं हे वक्तव्य 10 मे रोजीचं आहे. त्यात त्यांनी 'जर बांगलादेश क्वाड समुहात सहभागी झाला, तर चीनबरोबरच्या संबंधांना नुकसान पोहोचू शकतं, असं म्हटलं होतं. या वक्तव्यानं बांगलादेशचं सरकार आणि माध्यमांना धक्काच बसला.

बांगलादेशच्या द डेली स्टार या प्रसिद्ध वृत्तपत्राने 12 मे रोजी अत्यंत कठोर शब्दांमध्ये एका संपादकीय लेखाच्या माध्यमातून याविषयी भूमिका मांडली होती. त्यात असं लिहिण्यात आलं होतं की, 'बांगलादेश क्वाडच्या समुहाचा एक भाग बनेल यामुळं चीन काळजीत आहे असं वाटत आहे. पण त्याचं कारण काय हे कळत नाही. पण चीनच्या काळजीचं कारण काहीही असलं तरी, याबाबतचा कोणताही निर्णय हा केवळ बांगलादेशच्या सरकारचा असेल, यावर कोणालाही संशय असता कामा नये.'

यापूर्वी चीननं नेहमीच बांगलादेशला क्वाडमध्ये सहभागी होण्यापासून थेट अडवण्याचं टाळलं होतं. पण, तरीही या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव प्रचंड वाढत होता.

बांगलादेशमधील चीनचे राजदूत ली जीमिंग यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "अमेरिकेनं नेहमीच अशी पावलं उचलली असून, त्यामागचा त्यांचा हेतू चांगला नाही. बांगलादेशनं 'चीन विरोधी गटात' सहभागी व्हावं यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे."

ली जीमिंग यांचा इशारा हा, या मुलाखतीपूर्वी म्हणजे सप्टेंबर 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यात फोनवरून केलेल्या चर्चेकडं होता. त्यावेळी एस्पर आणि शेख हसिना यांच्यातील फोनवरील चर्चेनंतर एका महिन्यानं अमेरिकेचे माजी उप संरक्षणमंत्री स्टिफन बिगन यांनी बांगलादेशचा दौराही केला होता.

'कोविड-19 ची जागतिक साथ, अमेरिका आणि चीन यांच्यात असलेला प्रचंड तणाव आणि सोबतच भारत-चीन दरम्यानचा सीमेवरील संघर्ष यामुळं बांगलादेशच्या आजूबाजूच्या परिस्थितीत बराच बदल झाला आहे,' असंही ग्लोबल टाइम्सच्या मुलाखतीत ली जीमिंग म्हणाले होते.

याला जगामध्ये चीनची 'वोल्फ वॉरियर डिप्लोमेसी' म्हटलं जातं. या मुत्सद्दी धोरणाच्या अंतर्गत चीनच्या सरकारचे विविध संदेशवाहक, चीनच्या संरक्षण आणि व्यापारी हितसंबंधांबाबत कठोर विधानं करत असतात.

भारतीय वृत्तपत्र 'द इंडियन एक्सप्रेस'नं 18 मे रोजी संपादकीय लेखात असं लिहिलं होतं की, 'बांगलादेशनं संवेदनशील मुद्द्यांवर कधीही चीनला दुखावलेलं नसतानाही चीनच्या राजदूतांनी अशाप्रकारे कठोर विधानं करण्याचं नेमकं कारण काय आहे? क्वाडच्या संदर्भात बोलताना चीनचे राजदूत बांगलादेशसाठी लक्ष्मण रेषा आखत आहेत, असं त्यांच्या बोलण्यातून वाटत होतं.'

चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे यांनी एप्रिल 2021 मध्ये बांगलादेशचा दौरा केला होता. त्यानंतर प्रोथोम अलो नावाच्या बांगलादेशच्या वृत्तपत्रानं 1 मे रोजी सुत्रांच्या हवाल्यानं असं वृत्त दिलं होतं. त्यानुसार चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी या दौऱ्यात बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामीद यांना असं म्हटलं होतं की, 'या भागातील शांती, स्थैर्य आणि विकास यासाठी बांगलादेशनं त्यांच्या बाजुनं राहावं अशी चीनची इच्छा आहे.'

चीनचे लष्करी आणि व्यापारी हित

बांगलादेश संरक्षण क्षेत्रातील खरेदीचा बहुतांश भाग हा चीनहून आयात करतो. फायनान्शियल एक्सप्रेस या भारतीय वृत्तपत्रातील माहितीनुसार, बांगलादेशच्या लष्कराकडं सध्या असलेल्या शस्त्रांपैकी 86 टक्के शस्त्रं चीनकडून घेतलेली आहेत.

एप्रिल महिन्यातील दौऱ्यात चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी म्हटलं होतं की, 'चीन आणि बांगलादेशनं मिळून अशा शक्तींच्या विरोधात एकत्रितरित्या प्रयत्न करायला हवा, जे या भागामध्ये बाहेरून येऊन, दक्षिण आशियामध्ये लष्करी संबंध वाढवत आहेत.' अमेरिकेनं बांगलादेशबरोबर लष्करी संबंध वाढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्याकडं वेई फेंघे यांचा इशारा होता.

बांगलादेशनं ऑक्टोबर 2019 मध्ये अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करणयासाठी अमेरिकेशी चर्चा सुरू केली होती. ढाक्यातील अमेरिकेच्या राजदूतांनी याबाबत बोलताना म्हटलं होतं की, 'बांगलादेशला त्यांच्या सैन्य दलांचं आधुनिकीकरण करायचं आहे. त्यांच्या 2030 च्या या उद्दीष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू इच्छितो.'

अमेरिका आणि बांगलादेश आपसांमध्ये गोपनीय माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या संदर्भातदेखील करार करण्याबाबत चर्चा करत आहे, असंही वृत्त आहे. त्यासाठी जनरल सेक्युरिटी ऑफ मिलिट्री इन्फॉर्मेशन अॅग्रिमेंट (GSOMIA)आणि अॅक्विझिशन क्रॉस सर्व्हीसिंग अॅग्रिमेंट (ACSA)हे करार होऊ शकतात.

बांगलादेशला भारतानंही यावर्षी संरक्षण क्षेत्रातील आयातीसाठी 50 कोटी डॉलरचं कर्ज दिलं होतं आणि तेही अत्यंत वाजवी दरांमध्ये.

तर, चीननंही जून 2020 मध्ये कोव्हिड-19 च्या संकटामुळं निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी बांगलादेशला मदत मिळावी म्हणून बांगलादेशात तयार झालेल्या 97 टक्के उत्पादनांवरचं आयातशुल्क रद्द केलं होतं.

बांगलादेश क्वाडमध्ये सहभागी होणार का?

क्वाडमध्ये सहभागी होण्याबाबतच्या बांगलादेशच्या प्रतिक्रियांचं विश्लेषण केल्यासं असं लक्षात येतं की, बांग्लादेश सध्या तरी त्यांच्या गट-निरपेक्षतेच्या संतुलित अशा परराष्ट्र धोरणावरच कायम राहील. तर भारतानंही सध्या क्वाडच्या विस्ताराबाबत काहीही चर्चा सुरू नसल्याचंच म्हटलं आहे.

माध्यमांमधील वृत्तांनुसार, क्वाडबाबत चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांवर बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामीद यांनी कोणतीही प्रतक्रिया दिली नव्हती.

दरम्यान, चीननं आता बांगलादेश बरोबरचे संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एप्रिल महिन्यातील वेई फेंघे यांनी ढाक्याच्या बंगबंधू संग्रहालयाचाही दौरा केला होता.

चीनच्या एखाद्या उच्च स्तरीय पदाधिकाऱ्याने शेख मुजीबूर रेहमान यांना श्रद्धांजली देण्यासाठी संग्रहालयात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. विशेष म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संग्रहालयात जाऊन आल्यानंतर एका महिन्यानं, चीनच्या संरक्षण मंत्र्यांचा संग्रहालयाचा हा दौरा झाला होता.

चीनमधलं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वुईचॅटवर 13 मे रोजी एका निनावी लेखामध्ये असं म्हटलं होतं की, 'आमच्या राजदूतांनी बांगलादेशला चांगल्या हेतूनं इशारा दिला आहे. चीन आणि अमेरिकेतील संघर्षाचा फायदा उचलण्याचा बांगलादेश विचार करत असेल, तर त्यातून त्यांचा बालिशपणा दिसतो. बांगलादेशनं या दोन महाशक्तींमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये त्यांच्यातील निर्दयीपणाला मात्र कमी लेखलं असल्याचं यावरून दिसतं.'

या लेखात बांगलादेशला कोव्हिड-19 दरम्यान चीनकडून मिळालेल्या मदतीबाबतही आठवण करून देण्यात आली होती.

सध्या तरी बांगलादेशला चीनच्या विरोधी अशा कोणत्याही व्यासपीठावर जाण्याची गरज नाही. मात्र, जगातील वाढती आव्हानं पाहता गट-निरपेक्ष धोरण सोडून बांगलादेशनं चीनचा पक्का मित्र बनावं म्हणजे जागतिक स्तरावर अमेरिकेचा सामना करता येईल, अशी चीनची अपेक्षा असल्याचं त्यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून दिसत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)