अलीरेझा : इराणमध्ये एका गे व्यक्तीच्या हत्येने खळबळ का माजली आहे?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

इराणमध्ये 20 वर्षीय गे व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच देशात खळबळ माजली असून त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत.

अली फाजेली मॉनफरेड असं या गे व्यक्तीचं नाव होतं. मित्रमंडळी आणि सोशल मीडियावर त्याला अलीरेझा नावाने ओळखलं जायचं. अलीरेझा याचं सर्वप्रथम अपहरण करण्यात आलं, त्याला इराणच्या दक्षिण-पश्चिम दिशेला असलेल्या अहवाझ भागात नेण्यात आलं. तिथं त्याचं शीर धडावेगळं करून त्याची हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे.

अलीरेझाच्या जोडीदाराने या हत्येचा आरोप त्याच्या पुरुष नातेवाईकांवर लावला आहे. पुरुष नातेवाईकांकडून आपल्या जीवाला धोका आहे, असं अलीरेझा याला सतत वाटायचं, असं त्याच्या जोडीदाराने सांगितलं.

इराण प्रशासनाने अलीरेझाच्या मृत्यूबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बीबीसी पर्शियनला स्मशानभूमीतील काही फोटो मिळाले आहेत.

इराणमधील 6Rang या लेस्बियन आणि ट्रान्सजेंडर नेटवर्कने अलीरेझाच्या मृत्यूची बातमी सर्वांना दिली होती.

अलीरेझाच्या लैंगिकतेबाबत कळाल्यामुळेच त्याच्या नातेवाईकांकडूनच अपहरण करून खून करण्यात आल्याचा आरोप या ग्रुपनेही केला आहे.

शैलीदार, दिलखुलास व्यक्तिमत्व

अलीरेझा याचं शेवटचं बोलणं 4 मे रोजी त्याच्या आईसोबत झालं होतं, असं सांगितलं जातं.

त्यानंतर काही दिवसांनी आईला फोनवर अलीरेझाबद्दल माहिती सांगण्यात आली. त्याचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह कुठे मिळेल हेसुद्धा फोनवर सांगण्यात आलं होतं. त्यानुसार एका पाम वृक्षाखाली अलीरेझाचा मृतदेह आढळून आला होता.

अलीरेझाचा पार्टनर अघील अब्यात याने त्याच्याबद्दल अधिक माहिती दिली. अब्यात सांगतो, अ"लीरेझा त्याच्या आईची भेट घेण्यासाठी अहवाजला गेला होता. तिथं मिलिटरी सर्व्हिस एक्झम्प्शन कार्ड घेणं आणि मोबाईल विकणं अशी काही कामंही होती."

त्यानंतर काही दिवसांनी तो तुर्कस्तानला अब्यात याला भेटण्यासाठी जाणार होता. अखेरीस युरोपात शरणागतीसाठी तो अर्जही करणार होता.

बीबीसी पर्शियनला अलीरेझाच्या काही ऑडिओ नोट्सही आढळून आल्या. ईराणमध्ये एका गे व्यक्तीचं आयुष्य किती अवघड असतं. याबाबत अलीरेझाने सांगितलं होतं. तसंच त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून त्याला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळायच्या.

अलीरेझाच्या एका मैत्रिणीशीही बीबीसीने संवाद साधला. अलीरेझा गे असल्याचं त्याच्या मैत्रिणीला माहीत नव्हतं. पण राहणीमान आणि सोशल मीडियावर त्याची प्रतिमा या विषयांवरून त्याच्या कुटंबाकडून अलीरेझावर किती दबाव टाकला जातो, याची तिला कल्पना होती.

इन्स्टाग्रॅमवर अलीरेझाचे अनेक फॉलोअर होते. याठिकाणी त्याचे अनेक सेल्फी, मित्रमंडळींसोबत मजामस्ती करताना, गाण्यांवर लिप-सिंक करतानाचे अनेक फोटो आणि व्हीडिओ आहेत.

अलीरेझा ज्याप्रकारचे कपडे वापरतो, तसंच त्याने करून घेतलेल्या प्लास्टीक सर्जरींबाबत त्याच्या कुटुंबीयांची तक्रार होती, असं त्याच्या पार्टनरने बीबीसीशी बोलताना संगितलं.

अलीरेझाकडे मिलिटरी एक्झम्प्शन कार्ड सापडल्यानंतर त्याचा ईराण सोडण्याचा विचार असल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे अलीरेझाला जीवे मारण्यात येऊ शकतं, अशी भीती पार्टनर अब्यात याला सतत वाटायची.

इराणमधील तरूणांना लष्करी सेवा देणं अनिवार्य आहे. पण गे आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना या सेवेतून सूट मिळते. या व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगत त्यांना मिलिटरी एक्झम्प्शन कार्ड दिलं जातं.

अलीरेझाच्या हत्येमुळे 6Rang ग्रुप अत्यंत चिंताग्रस्त झाला आहे. एक्झम्प्शन कार्डमुळे LGBT समूहातील लोकांची ओळख पटवणं सहज शक्य आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं 6Rang ग्रुपला वाटतं.

इराणमध्ये गे असणं हे निषिद्ध आहे. समलैंगिक संबंध इथं बेकायदेशीर मानले जातात. असे संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूदंडाची शिक्षाही होऊ शकते.

अलीरेझाच्या हत्येप्रकरणी काही जणांची अटक झाल्याची माहिती मिळत आहे. पण अद्याप पोलीस प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अलीरेझाच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतर त्याचं नाव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं. लोक हॅशटॅग वापरून जगभरातील लोकांना याबाबत संदेश पाठवत आहेत. LGBT समूहातील लोक त्यांच्या देशात कशा प्रकारच्या अडचणींना तोंड देतात, ही गोष्ट चव्हाट्यावर आणली जात आहे.

अनेक जण अलीरेझाला श्रद्धांजली वाहताना दिसत असून त्याच्या इन्स्टाग्रॅमचे पेज मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.

डेमी लोवातो यांच्यासारख्या पॉप स्टार सेलिब्रिटींनीही अलीरेझाबाबत पोस्ट केलं आहे.

ड्रॅग क्वीन जॅकी कॉक्स यांनीही सोशल मीडियावर अलीरेझाच्या हत्येबाबत आवाज उठवला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)