You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काबूल हल्ला: शाळेजवळ झालेल्या स्फोटात किमान 30 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका शाळेबाहेर झालेल्या स्फोटात किमान 30 जणांचा मृत्यू झालाय तर 52 जण जखमी झाले आहेत.
शनिवारी (8 मे) विद्यार्थी शाळेच्या इमारतीतून बाहेर पडत असताना हे स्फोट झाले. रस्त्यांवर बेवारस दप्तरं पडल्याचे फोटो सोशल मीडियावर पाहण्यात आले.
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश संख्या ही मुलींची आहे, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.
सुन्नी इस्लामी अतिरेक्यांकडून अनेकदा लक्ष्य करण्यात आलेल्या दश्त-ए-बार्ची याठिकाणी केलेल्या या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.
तालिबानी अतिरेक्यांनी या हल्ल्यात कोणताही सहभाग असल्याचे नाकारलं आहे. कार बॉम्ब आणि मोर्टारमुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज अफगाण अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
शेजारी असलेल्या पश्चिम काबूलमध्ये अल्पसंख्याक समुदायातील हजारो लोक राहतात. ते मंगोलियन आणि मध्य आशियाई वंशाचे आहेत आणि प्रामुख्याने शिया मुस्लिम आहेत.
जवळजवळ एक वर्षापूर्वी स्थानिक रुग्णालयातील प्रसूती युनिटवर हल्ला करण्यात आला होता, ज्यात 24 महिला, मुले आणि बाळांचा मृत्यू झाला होता.
शनिवारी (8 मे) झालेल्या स्फोटाचे लक्ष्य अद्याप अस्पष्ट आहे.
11 सप्टेंबरपर्यंत अमेरिका अफगाणिस्तानातून आपले सर्व सैन्य मागे घेण्याच्या तयारीत असल्याने वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाले आहेत.
शिक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या नजीबा एरियन यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले की, सरकारी शाळा मुलं आणि मुलींसाठी खुली होती. जखमी झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे. तीन सत्रांपैकी दुसऱ्या सत्रात शिकत असलेल्या या मुली होत्या असंही त्या म्हणाल्या.
अनेक साक्षीदारांनी तीन वेगवेगळे स्फोट ऐकल्याचे वर्णन केलं आहे, तर एका महिलेने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की तिने 'धूळ आणि धुरात अनेक रक्तबंबाळ मृतदेह' पाहिले आहेत.
रेझा नावाच्या एका महिलेने सांगितलं, "मी एका महिलेला मृतदेह तपासताना आणि आपल्या मुलीला हाक मारताना पाहिलं. त्यानंतर तिला तिच्या मुलीची रक्तबंबाळ झालेली पर्स सापडली आणि ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली."
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने हल्ल्याचा निषेध केला. "हिंसाचार आणि निरपराध नागरिकांना निर्बुद्धपणे लक्ष्य करणे त्वरित थांबवा अशी मागणी आम्ही करतो," असं त्यांनी म्हटलंय.
अफगाणिस्तानातील युरोपियन युनियनच्या मिशनने ट्विट करत म्हटलं की, "प्रामुख्याने मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याने हा अफगाणिस्तानच्या भवितव्यावर हल्ला केल्यासारखे आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)