कोरोना: अमेरिकेची वृद्धी आणि भारताच्या घसरणीचा चीनला फायदा

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे तर अमेरिका कोरोनातून सावरत आहे. सध्या तयार झालेल्या परिस्थितीमुळे भारताचं आर्थिक नुकसान होत आहे तर चीनचा फायदा होतोय. हे कसं घडतंय?

चीनच्या निर्यातीत गेल्या महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाली. याचं कारण ठरली अमेरिका. अमेरिका जागतिक साथीतून वेगाने सावरल्याने तिथे मागणी वाढली आहे.

इकडे भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या तीव्र लाटेमुळे कारखाने बंद आहेत. उत्पादन ठप्प झाल्याने अर्थातच निर्यातही बंद आहे. अशावेळी वेगवेगळ्या देशांची मागणी पूर्ण करतोय तो चीन.

चीनने यावर्षी जवळपास 264 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चीनने यंदा 34% अधिक निर्यात केली आहे.

दरम्यान, चीनने केलेल्या आयातीतदेखील वर्षभरात 43% वाढ झाली आहे. गेल्या दशकाची तुलना केल्यास गेल्या वर्षभरात चीनची आयात सर्वांत वेगाने वाढली आहे.

आव्हानं

ट्रम्प काळात चीन आणि अमेरिकेत व्यापार युद्ध सुरू झालं होतं. तसंच व्यापाराच्या बाबतीत इतर राष्ट्रांबरोबरही चीनचे खटके उडाले. अशी परिस्थिती असूनही गेल्या महिन्यात चीनची निर्यात आयातीपेक्षा 43 अब्ज डॉलर्सने जास्त आहे.

असं असलं तरी जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या चीनसमोर अनेक आव्हानंही आहेत.

अर्थतज्ज्ञांच्या मते चीन देत असलेली आकडेवारी पूर्णपणे योग्य नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे या वर्षीच्या निर्यातीच्या आकड्यांची गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना करण्यात आली आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे कठोर लॉकडाऊन असल्याने चीनमध्येही उत्पादन जवळजपळ ठप्प होतं.

चीनच्या जीडीपीमध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीत 18.3 ही जी विक्रमी वाढ झाली त्यामुळे यावेळी विकास दर कमी होईल, असं जाणकारांना वाटतं.

याचं कारण म्हणजे कोरोनाच्या जागतिक साथीमुळे जगभरातली पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्याचा परिणाम सामानाच्या वाहतुकीवर झाला आणि वाहतुकीचा खर्चही वाढला.

जगभरात कारपासून ते मोबाईल फोनपर्यंत मायक्रोचिप्सचा वापर होतो. या मायक्रोचीप्सचा जगभरात तुटवडा निर्माण झाला आणि यामुळेही उत्पादकांना तोटा सहन करावा लागतोय.

त्रुटी

गेल्या आठवड्यात चीनने जारी केलेल्या सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात चीनमधल्या कारखान्याच्या उत्पादनात घट झाली आहे.

गुरुवारी चीनने ऑस्ट्रेलियासोबत होऊ घातलेली महत्त्वाची आर्थिक चर्चा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. या दोन्ही देशांमधले राजनयिक संबंध किती तणावाचे बनले आहेत, याचं हे उदाहरण.

ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूची उत्पत्ती कुठून झाली, याचा शोध लावण्याची मागणी केली होती आणि चीनच्या ख्वावे या दिग्गज दूरसंचार कंपनीला 5G नेटवर्क बनवण्यापासून रोखलं होतं. तेव्हापासून चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या संबंधात बरीच कटुता आली आहे.

गेल्या वर्षी चीनने ऑस्ट्रेलियावरून आयात होणारं मद्य आणि बीफ यावर बंदी घातली होती. त्यावेळी चीनने एक निवेदन प्रसिद्ध करत ऑस्ट्रेलियावर 'शीतयुद्ध कालीन मानसिकता' अंगिकारत असल्याचा आरोप केला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)