You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाः थिएटर्स खुली करा, या मागणीसाठी फ्रेंच अभिनेत्रीचा स्टेजवर नग्न निषेध
फ्रान्समधल्या एका अभिनेत्रीने सरकारपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी एका पुरस्कार सोहळ्यात व्यासपीठावरच कपडे काढले.
"कोरोना संकट काळात कला आणि संस्कृती जतन करण्यासाठी सरकारीने पावलं उचलायला हवी", असा संदेश त्यांनी दिलाय.
57 वर्षांच्या अभिनेत्री कोरेन मासिरो यांनी सीजर अवॉर्ड सोहळ्यात हे पाऊल उचललं. फ्रान्समध्ये सीजर पुरस्काराला ऑक्सर इतकंच महत्त्वाचं मानलं जातं.
मासिरो व्यासपिठावर गाढवाचा कॉस्च्युम परिधान करून गेल्या होत्या. त्याखाली त्यांनी रक्ताने माखलेला ड्रेस घातला होता. व्यासपीठावर पोहोचल्यावर त्यांनी हे दोन्ही ड्रेस काढले आणि विवस्त्र झाल्या.
फ्रान्समध्ये तीन महिन्यांहूनही अधिक काळापासून चित्रपटगृह बंद आहेत. अनेक कलाकारांना सरकारचा हा निर्णय रुचलेला नाही.
सीजर पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी मासिरो यांना 'बेस्ट कॉस्च्युम' पुरस्कार देण्यासाठी मंचावर आमंत्रित केलं होतं.
पण, व्यासपीठावर येताच विवस्त्र होऊन त्यांनी सर्वच उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
त्यांनी शरीरावर काही संदेशही लिहिले होते. त्यांनी लिहिलं होतं, "संस्कृती नाही, तर भविष्य नाही."
आणखी एक संदेश त्यांनी पाठीवर लिहिला होता. फ्रान्सचे पंतप्रधान जीएन कास्टेक्स यांना उद्देशून त्या लिहितात, "आम्हाला आमची कला परत करा, जीएन."
फ्रान्समधल्या इतरही अनेक कलाकारांनी पंतप्रधानांना असंच आवाहन केलं आहे.
सीजर पुरस्कार सोहळ्यात बेस्ट स्क्रीनप्लेचा पुरस्कार पटकावणाऱ्या स्टेफनी डेमॉस्टिअर म्हणाल्या, "माझी मुलं झाराच्या शोरूममध्ये जाऊन कपडे खरेदी करू शकतात. पण, ते चित्रपट बघायला जाऊ शकत नाही. हे मला कळत नाही."
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फ्रान्समधले शेकडो कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, समीक्षक आणि कला जगतातल्या इतर अनेकांनी पॅरिसच्या रस्त्यावर उतरत सरकारविरोधी निदर्शनं केली होती. 'इतर अनेक ठिकाणचे निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कला केंद्रांवरूनही निर्बंध उठवून ती खुली करावी', अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती.
यावर्षी सीझर पुरस्कार सोहळ्यात एल्बर्ट डुपोंटेल यांच्या 'गुडबाय मॉरॉन्स' चित्रपटाला बेस्ट फिल्म पुरस्कार मिळाला. तर डेन्मार्कमध्ये बनलेल्या 'अनादर राउंड' चित्रपटाला बेस्ट फॉरेन फिल्मचा पुरस्कार मिळाला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)