You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोमालिया हल्ला: कट्टरतावाद्यांचा मोगादिशूत हल्ला, 9 जण ठार
कट्टरतावाद्यांनी सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये हल्ला केला आहे. मोगादिशूमधल्या एका हॉटेलमध्ये इस्लामी कट्टरतावादी आणि सुरक्षा यंत्रणाची चकमक उडाली, त्यात एकूण नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे रॉयटर्सने सांगितले आहे.
कट्टरतावादी संघटना अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याची सुरुवात रविवारी दुपारी एका कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने झाली.
वृत्तसंस्था रॉयटर्सने आतापर्यंत नऊ लोकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे.
अल-शबाब या कट्टरतावादी गटाचे संबंध अल-कायदाशीही आहेत. हा गट सतत सरकारविरुद्ध हल्ले करत असतो.
प्रत्यक्षदर्शींच्यामते मोगादिशूमधल्या 'आफ्रिक' हॉटेलच्या मुख्यदारावर एक कार येऊन आदळली आणि तिचा स्फोट झाला. यानंतर सशस्त्र बंदूकधारी हॉटेलमध्ये गोळीबार करत शिरले.
"तो स्फोट इतका शक्तिशाली होता की संपूर्ण हॉटेल हादरलं. आम्ही आत गप्पा मारत बसलो होतो पण हल्ला झाला आणि प्रचंड घाबरलो. काय घडतंय कळत नव्हतं," तिथले प्रत्यक्षदर्शी अहमद नूर यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.
घटनास्थळी असलेल्या एका पोलिसाने रॉयटर्सला सांगितलं की, "आता मोहीम संपलेली आहे. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे ज्यात 4 हल्लेखोरांचाही समावेश आहे. जवळपास 10 लोक जखमी झाले आहेत."
मृतांमध्ये सोमालियाचे माजी सैन्य जनरल मोहम्मद नूर गुलाल यांचाही समावेश आहे असं सोमालियाचे पंतप्रधान मोहम्मद हुसेन रोबेल यांनी आपल्या पत्रकात म्हटलंय.
बीबीसी प्रतिनिधी बेला हसन मोगादिशूमध्ये आहेत. यांनी सांगितलं की 'आफ्रिक' हॉटेल विमानतळाच्या जवळ आहे आणि या भागात प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते. असं असतानाही कट्टरतावाद्यांनी या हॉटेलला लक्ष्य बनवलं आहे.
हल्ला झाला तेव्हा अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या हॉटलमध्ये उपस्थित होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.
सोशल मीडियामधल्या व्हीडिओमध्ये हॉटेलमधून आगीचे लोळ उठताना दिसत आहेत.
हा हल्ला नेमका अशावेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सोमालियामधून अमेरिकन सैन्याच्या 700 तुकड्या मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकचं सैन्य स्थानिक सुरक्षा यंत्रणांना कट्टरतावाद्यांच्या विरोधात, विशेषतः अल शबाबविरोधात, लढाई लढण्यात मदत करत होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)