IndvsAus: 'तुला मानला रे ठाकूर'; अर्धशतकी खेळीसाठी कोहलीने केलं शार्दूलचं कौतुक

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

केवळ दुसऱ्याच टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला तोंड देत दमदार अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या शार्दूल ठाकूरचं कर्णधार विराट कोहलीने मराठीत कौतुक केलं आहे. 'तुला मानला रे ठाकूर' अशा शब्दात कोहलीने शार्दूलची पाठ थोपटली आहे.

पदार्पणातच वॉशिंग्टनने दाखवलेली परिपक्वता आणि मोठी खेळी करण्यासाठीची जिद्द विलक्षण आहे. यालाच टेस्ट क्रिकेट म्हणतात. पदार्पणात अशी खेळी साकारणं प्रशंसनीय आहे असं कोहलीने वॉशिंग्टन सुंदरबद्दल म्हटलं आहे.

शार्दूलसाठी विराटने खास मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. अफलातून खेळीसाठी 'तुला मानलं' या मराठी शब्दप्रयोगाचा उपयोग करत कोहलीने शार्दूलचा हुरुप वाढवला आहे.

मुंबईकर शार्दूल ठाकूरने ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याला तोंड देत ब्रिस्बेन टेस्टमध्ये खणखणीत अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाच्या 369 रन्समोर खेळताना टीम इंडियाची एकाक्षणी 186/6 अशी अवस्था होती. मात्र शार्दूल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी भागीदारी करत डाव सावरला.

या दोघांनी सातव्या विकेटसाठी 123 रन्सची भागीदारी केली. शार्दूलने 67 तर वॉशिंग्टनने 62 रन्सची दिमाखदार खेळी केली. शार्दूलने 9 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी सजवली.

नॅथन लॉयनच्या बॉलिंगवर जोरदार षटकार खेचत शार्दूलने अर्धशतक पूर्ण केलं.

पालघरहून दररोज मुंबईला जाणंयेणं करत क्रिकेटची धुळाक्षरं गिरवलेल्या शार्दूलने फर्स्ट क्लास क्रिकेटचा सगळा अनुभव पणाला लावत दमदार षटकारासह अर्धशतकाला गवसणी घातली.

मुंबई क्रिकेटचा खडूसपणा दाखवत शार्दूलने चांगल्या बॉलचा आदर केला तर वाईट बॉलवर चौकार-षटकार वसूल करत बॅटिंगही उत्तम करता येतं हे दाखवून दिलं.

दोन वर्षांपूर्वी शार्दूलने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केलं होतं. मात्र त्या मॅचमध्ये लगेचच दुखापतग्रस्त झाल्याने शार्दूलचा टेस्ट प्रवास थांबला.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मालिकेत जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या प्रमुख बॉलर्सना दुखापत झाल्याने शार्दूलचा खेळण्याचा मार्ग सुकर झाला.

तीन वर्षानंतर पुन्हा टेस्ट खेळण्याची संधी मिळालेल्या शार्दूलने मार्कस हॅरिस, टीम पेन आणि पॅट कमिन्स यांना बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं होतं.

शार्दूलने आतापर्यंत 12 वनडे आणि 17 ट्वेन्टी-20 लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईचा शिलेदार असलेल्या शार्दूलच्या नावावर दोनशेहन अधिक विकेट्स आहेत.

वॉशिंग्टन सुंदरने पहिल्याच टेस्टमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केली.

ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 369 रन्ससमोर खेळताना, तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने प्रमुख बॅट्समनना गमावलं आहे. भरवशाचा चेतेश्वर पुजारा, कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मयांक अगरवाल तंबूत परतले आहेत.

184/5 अशी टीम इंडियाची स्थिती आहे. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत आणि पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर टीम इंडियाची आता भिस्त आहे.

टीम इंडियाने 62/2 वरून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात शुभमन गिल 7 रन्स करून बाद झाला. स्थिरावलेला रोहित शर्मा मोठी खेळी करणार असं वाटत असतानाच नॅथन लॉयनच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 44 रन्सची खेळी केली. रोहितच्या त्या फटक्यावर माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे. बेजबाबदार फटका असं अनेकांनी याचं वर्णन केलं.

तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर पुजारा-रहाणे जोडीने संयमी सुरुवात केली. जोश हेझलवूडच्या अचूक टप्प्यावरील बॉलवर पुजारा विकेटकीपर टीम पेनकडे कॅच देऊन बाद झाला. त्याने 94 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. मागच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात पुजाराने सर्वाधिक रन्स करत ऑस्ट्रेलियाला बेजार केलं होतं.

मिचेल स्टार्कचा ऑफस्टंपबाहेरचा बॉल खेळण्याची चूक कर्णधार रहाणेला भोवली. मॅथ्यू वेडने त्याचा कॅच घेतला. त्याने 37 रन्सची खेळी केली.

लंचनंतर पहिल्याच ओव्हरमध्ये हेझलवूडचा ऑफस्टंपच्या खूप बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न मयांक अगरवालच्या अंगलट आला. मयांकने 38 रन्स केल्या. हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाल्याने मयांकला या मॅचमध्ये संधी मिळाली. सलामीवीर मयांक पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आला.

ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सचा चांगला सामना करणाऱ्या ऋषभने आततायीपणे विकेट गमावली. स्लिपच्या डोक्यावरून फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न कॅमेरुन ग्रीनच्या हातात जाऊन विसावला. ग्रीनने चांगला कॅच घेतला. त्याने 23 रन्स केल्या.

9 खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाने वॉशिंग्टन सुंदर आणि टी.नटराजन यांना पदार्पणाची संधी दिली आहे. शार्दूल ठाकूर आणि मयांक अगरवाल यांना अंतिम अकरात समाविष्ट करण्यात आलं.

दरम्यान ऑस्ट्रेलियाने मार्नस लबूशेनच्या शतकाच्या बळावर 369 रन्सची मजल मारली. लबूशेनने कारकीर्दीतलं पाचवं शतक झळकावलं. त्याने 108 रन्सची खेळी साकारली. टीम पेनने 50 रन्स केल्या.

नटराजन, सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)