'सामना'तील भाषेबद्दल चंद्रकांत पाटील यांचं रश्मी ठाकरेंना पत्र #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. 'वहिनी, आपल्यालाही ही भाषा आवडत नसेल'- चंद्रकांत पाटील यांचं रश्मी ठाकरेंना पत्र

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी 'सामना'मध्ये वापरण्यात येणाऱ्या भाषेबद्दल तक्रार केली आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

"संपादक म्हणून या वृत्तपत्रात छापल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी आपण जबाबदार असता. आपल्यालाही ही भाषा आवडत नसेल, याची मला खात्री आहे," असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

या पत्रात चंद्रकांत पाटील लिहितात, "गेल्या काही दिवसांपासून आपल्या 'सामना' वृत्तपत्रातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते तसेच भाजप महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल वापरण्यात येणारी खालच्या स्तराची भाषा!"

"वहिनी, आपणाला या पत्राद्वारे मी एवढेच सांगू इच्छितो की, आपण 'सामना' वृत्तपत्राच्या संपादक आहात. वृत्तपत्रात छापण्यात येणाऱ्या बातम्या, त्यातील भाषा या सर्वांसाठी आपण संपादक म्हणून जबाबदार असता. वहिनी, मी आपणाला एक व्यक्ती म्हणून चांगलं ओळखतो आणि मला खात्री आहे की आपणालाही ही भाषा आवडत नसेल."

"आपणाला या पत्राद्वारे मी एवढीच विनंती करु इच्छितो की, संपादक या नात्याने आपण आपल्या वृत्तपत्रात वापरण्यात येणाऱ्या भाषेचा विचार करावा. जर आपणास माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या 'सामना' वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा," असे चंद्रकांत पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहे.

2. पोलीस थकले तरी त्यांनी हिंमत हरलेली नाही - गृहमंत्री अनिल देशमुख

आमच्या पोलिसांना बदनाम करण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. काहींनी असा विडाच उचलला होता. पण आमच्या पोलिसांनी त्यावर चोख प्रत्युत्तर दिलं. आमचे पोलीस कोरोनाकाळात सतत काम करून थकले असले तरी त्यांची हिंमत हरलेली नाही, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.

ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.

मुंबई येथे सेगवे पोलिसांना गस्त घालण्यास मदत व्हावी म्हणून सेगवे) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना अत्याधुनिक गॅझेट दिले जात आहे.

मुंबई पोलिसांत आता अश्वदलाचाही समावेश केला आहे. ड्रोन पोलिसिंगसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन वर्षाचं स्वागत करताना नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचं चांगलं पालन केलं. त्यामुळे नवीन वर्षात कुठेही गालबोट लागलं नाही, असं देशमुख म्हणाले.

3. 'पुण्यात सोमवारी शाळा उघडणारच'

कोरोना संकटामुळे गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. पण आता शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुण्यातील शाळा सोमवारपासून (4 जानेवारी) कोणत्याही परिस्थितीत सुरू होतील, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

ही बातमी ई-सकाळने दिली.

पुण्यातील शाळा सोमवार, 4 जानेवारीपासून सुरू करण्यात येतील, अशी घोषणा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी केली होती. पण नव्या कोरोना स्ट्रेनमुळे पुन्हा शाळा सुरू होण्याबाबत शंका निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त कुमार यांनी शाळा सुरू करण्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

कोरोना काळातील सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता आदी नियमांचं पालन करत पुण्यातील शाळा सोमवारपासून (4 जानेवारी) उघडतील, असं महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनना साथ नियंत्रणात असल्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. शिक्षकांनी तीन वेळा चाचणीही करून घेतली. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कुमार यांनी म्हटलं आहे.

4. अमित शाह यांच्यावर विनोद केल्याबद्दल कॉमेडियन मुनव्वर फारूकी यांना इंदूरमध्ये अटक

इंदूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विनोद केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाजप आमदाराच्या मुलाने याविषयी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फारूकीला अटक केलं.

इंदूरमध्ये एका कॅफेमध्ये नववर्षानिमित्त मुनव्वर फारूकी यांच्या कॉमेडी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास भाजप आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांचे पुत्र एकलव्य सिंह गौड हेसुद्धा उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत गौड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाला विरोध दर्शवला. त्यांनी या कार्यक्रमाचं व्हीडिओ शूटिंगही केलं असून तो व्हीडिओ पुरावा म्हणून पोलिसांना देण्यात आला आहे. त्यानुसार कॉमेडियन फारूकी यांच्यासह इतर चार स्थानिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5. रस्त्यावर उतरण्यापेक्षा 55 लाख रुपयांबद्दल सांगा - अतुल भातखळकर

ईडीच्या मुद्द्यावर शिवसेनेने रस्त्यावर उतरण्यापेक्षा संजय राऊत यांनी ईडीला सामोरं जावं. त्यांनी 55 लाख रुपयांबद्दल खुलासा करावा, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे दिवस केव्हाच संपले आहेत. साप म्हणून भुई थोपटण्याऐवजी संजय राऊत, प्रताप सरनाईक यांनी ईडीला सामोरं जावं.

ईडीने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा खुलासा ईडीसमोर तसंच महाराष्ट्राच्या जनतेसमोरही करावा. हे अधिक महत्त्वाचं आहे. आंदोलन करून ईडी गप्प बसणार नाही. ईडी कायद्याने चालते. कायद्यानेच कायद्याला उत्तर द्यावं, असंही भातखळकर म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)