'कोरोनामुळे मी मृत्यूच्या दारात होते तेव्हा, माझ्या बाळाला वाचवा, एवढीच विनंती त्यांना केली'

Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

कोरोना झालेला असताना गरोदर असणाऱ्या एका महिलेची कहाणी

सात महिन्यांची गरोदर असलेल्या एका तरुण महिलेला श्वास घेताना प्रचंड त्रास होत होता, म्हणून तिला ब्रॅडफोर्ड रॉयल इन्फर्मरी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा आपल्याला एक नाही तर दोन जीव वाचवायचे आहेत, हे रुग्णालयाच्या कर्मचारीवर्गाच्या लक्षात आलं होतं. या अनुभवाबद्दल लिहितायंत डॉ. जॉन राइट...

मेहपारा नक्वी 22 वर्षांच्या आहेत. बेडफोर्डशायर विद्यापीठातून पदवी घेतलेल्या मेहपारा त्यांचे पती अली व सासरच्या कुटुंबियांसह ब्रॅडफोर्डला राहायला आल्या. कोव्हिडचा प्रादुर्भाव झाल्यापासून ही मंडळी फारशी बाहेर पडत नव्हती, फक्त सुपरमार्केटला जात असत आणि त्यांच्या बाळासाठी काही वस्तू आणायला बाहेर पडत तेवढंच, असं मेहपारा सांगतात. बाळ डिसेंबरमध्ये जन्माला येईल असा अंदाज होता.

पण ऑक्टोबरच्या सुरुवातीला मेहपारा यांना डोकेदुखी व खोकल्याचा त्रास व्हायला लागला. त्यानंतर त्यांची चव गेली, वासही यायचा बंद झाला. आपल्याला बहुधा कोव्हिड झाला असावा, हे त्यांच्या लक्षात आलं. घराच्या वरच्या मजल्यावर एका खोलीत मेहपारा व अली यांनी स्वतःला विलग करून घेतलं. अलीची आई त्यांच्यासाठी खोलीबाहेर ट्रेमध्ये जेवण ठेवत असे.

दोन-तीन दिवसांमध्ये मेहपाराला श्वास घेणं इतकं त्रासदायक व्हायला लागलं की, अली यांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णालयात दाखल झाल्यावर पहिल्याच रात्री मेहपारा यांची तब्येत इतकी खालावली की त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं.

कोव्हिडची पहिली लाट आली तेव्हा, म्हणजे गेल्या वसंतामध्ये, गरोदर असणारी आणि त्याच वेळी गंभीर आजारी पडलेली कोणीच रुग्ण आमच्यापर्यंत आलेली नव्हती. मेहपारा अशी पहिली रुग्ण होती. त्यामुळे या केसमध्ये आमच्या मातृत्व सेवा विभागाच्या प्रमुख डेबी हॉर्नर यांनी विशेष रस घेतला.

सुईणी आणि प्रसूतिशास्त्रज्ञ बाळाच्या हृदयाचे ठोके तपासत होते, बाळ सुखरूप आहे, असं डेबी मेहपाराला म्हणाल्या. त्या क्षणी तरी गर्भात असणं हाच पर्याय बाळासाठी सर्वोत्तम होता. पण कोणत्या तरी टप्प्यावर सिझेरियन पद्धतीने प्रसूती करवून घेणं मेहपाराच्या हिताचं ठरेल, असंही डेबी यांनी सांगितलं. कारण सात महिन्यांपर्यंत गर्भात वाढ झालेलं नवजात बालक इनक्युबेटरच्या मदतीने सुरक्षित राहू शकेल. हे सर्व डेबी यांनी अली यांनाही फोनवरून सांगितलं.

परंतु, मेहपारा अधिकाधिक चिंताग्रस्त होत गेल्या.

"मी आता जगणार नाही आणि माझ्या बाळाला काहीतरी होणार आहे, असं मला वाटलं," त्या म्हणतात. "त्यामुळे सिझेरियन करावं असं मी माझ्या नर्सला सांगितलं, म्हणजे किमान बाळ तरी बाहेर निघेल. मी जगेन असं वाटत नाहीय, त्यामुळे तुम्ही माझ्या बाळाला वाचवा, असं मी त्यांना सांगितलं."

या टप्प्यावर डेबी यांच्याशी बोलल्याचं ती सांगते.

"त्यांनी खूपच आश्वस्त केलं. 'तुला आम्ही काहीही होऊ देणार नाही, आम्ही तुला आणि तुझ्या बाळालाही वाचवू', असं त्यांनी सांगितलं."

पण डेबी खरं बोलतायंत, अशी मेहपाराची खात्री पटली नाही.

दिवस जात गेले, तशी मेहपाराची अवस्था आणखी चिंताजनक झाली. डेबी यांनी आयसीयूमधल्या सल्लागाराशी चर्चा केली. बाळाला अधिक ऊर्जा व ऑक्सिजन लागत होता, आणि त्याचा ताण मेहपाराच्या फुफ्फुसांवर येत होता, यामुळे डॉक्टर चिंतेत होते.

"तिचं जीवन आणि बाळाचं जीवन यांच्यात अगदी सूक्ष्म समतोल साधायचा होता. आता प्रसूती करवून बाळ बाहेर काढणं गरजेचं आहे, म्हणजे समतोल कायम राहील, असं आम्हाला वाटलं," असं डेबी सांगतात.

मातृत्वसेवेचे विभाग निराळ्या इमारतीत आहेत, पण डेबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा परिस्थितीसाठी तयारी केली होती, त्यामुळे रुग्णालयाच्या मुख्य भागातील शस्त्रक्रिया खोली वापरण्यासाठी ते सज्ज होते. त्यासाठी योग्य तो कर्मचारीवर्ग व उपकरणंही त्यांच्या दिमतीला होता.

शस्त्रक्रियेच्या खोलीत आल्यावर मेहपारा यांच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी धोकादायक अवस्थेपर्यंत खाली गेली. डेबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पातळी वाढवण्यासाठी तातडीने पावलं उचलली, पण एकंदरच शरीराला भूल देऊन सिझेरियन प्रसूती करावी लागेल, अशी त्यांची खात्री पटली.

प्रसूती झाल्यावर शक्य तितक्या लवकर जाग आणली जाईल, असं डेबी यांनी मेहपाराला सांगितलं.

"पण यात किती कालावधी जाईल हे मला माहीत नाही, असंही मी तिला सांगितलं. हे झाल्यानंतर किमान काही दिवस तरी गेल्यावर कदाचित आम्ही तुला जागं करू अशी शक्यता आहे."

भूल दिल्यानंतर मेहपाराच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी पुन्हा खालावली- आणखीच खाली गेली. "अंगावर काटा आणणारा क्षण होता तो," डेबी म्हणतात. परंतु, यातून ते बाहेर पडले आणि सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मेहपाराची मुलगी, नूर ५ ऑक्टोबर रोजी सव्वाबारा वाजता जन्माला आली, तेव्हा तिचं वजन दीड किलो भरलं.

त्यानंतर गोष्टी अधिक सुरळीत होत गेल्या. बाळाला, नमूरला रुग्णवाहिकेतून नवजात सेवा विभागात नेण्यात आलं आणि मेहपाराला पुन्हा आयसीयूमध्ये नेण्यात आलं, तिथे तिला बेशुद्धावस्थेत ठेवलं होतं.

"नऊ दिवस मी व्हेन्टिलेटरवर होते," मेहपारा सांगतात. "मी मूल जन्माला घातलंय हेही मला माहीत नव्हतं, मला काहीच कळत नव्हतं."

मेहपाराला यांना शुद्धीत आणण्यात आलं, तेव्हा त्या गुंगीत होत्या आणि त्यांना बोलायला जड जात होतं, पण थोड्याच वेळात डेबी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना अलीशी जोडून दिलं. तोवर अली विलगीकरणातून बाहेर आले होते आणि हा कॉल झाला तेव्हा ते नवजात बालकांच्या विभागामध्ये होते.

"त्यामुळे तेव्हा मेहपाराला पहिल्यांदा स्वतःचं बाळ पाहायला मिळालं," डेबी म्हणाल्या. "तो क्षण खूप भावूक होता. तिला नीटसं बोलताही येत नव्हतं, पण ती रडायला लागली. मी आणि सोबतच्या नर्सही स्वाभाविकपणे भावुक झालो होतो. त्यांच्या या अनुभवामध्ये आमचा सहभाग असणं आणि हे असं घडवण्याला हातभार लावणं, हे सगळंच विशेष होतं."

शुद्धीत आल्यावर गोंधळल्यासारखं झाल्याची आठवण मेहपारा सांगतात. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी मास्क आणि व्हायसर का घातलेत, हे त्यांना कळत नव्हतं.

"माझं बाळ कुठेय, असं माझ्या मनात आलं, पण मला बोलता येत नव्हतं," त्या सांगतात.

पण स्वतःच्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं, तो क्षण त्यांना आठवतो.

"मी तिला पाहावं अशी तजवीज त्यांनी करून दिलं. ते विलक्षण होतं," त्या सांगतात. "ती खूप सुंदर होती. मग मला माझी काय अवस्था आहे ते लक्षात यायला लागलं, ती सुरक्षित आहे आणि ती जगली, हेही मला कळलं."

मेहपारा यांना महिला व नवजात बालक विभागामध्ये हलवणं, ही पुढची पायरी होती. पण काही दिवस त्यांची तब्येत पुरेशी सुधारली नव्हती. तरीही थोड्याच दिवसांमध्ये आई आणि मुलीची अखेर गाठ पडली.

"मी तिला बघितलं तेव्हा ते अवास्तव वाटत होतं. माझ्या हातांमध्ये पुरेशी ताकद नसल्यामुळे सुरुवातीला मला तिला धडपणे उचलता येत नव्हतं, म्हणून मी तिला माझ्या छातीवर ठेवलं," मेहपारा सांगतात. "मी तिला स्पर्श करू शकत होते, पाहू शकत होते- ती खरोखरच जगलेय आणि धडधाकट आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता."

मेहपारा बेशुद्धावस्थेत असताना फिजिओथेरपिस्ट त्यांच्यावर काम करत होते, त्यांना श्वास घेता यावा यासाठी त्यांची फुफ्फुसं मोकळी व्हायला मदत करत होते. त्यानंतर मेहपारा यांना पुन्हा बसता येईल आणि अखेरीस चालता येईल यासाठी ते कार्यरत झाले. त्यांच्या व्हायसरमधूनही मेहपारा त्यांना चटकन ओळखायला शिकल्या.

मेहपारा यांना पहिल्यांदा पलंगावरून खाली आणलं, तेव्हाचा अनुभव फिझिओथेरपिस्ट कॉर्डी गाउबर्ट सांगतात.

"पहिल्यांदा आम्ही तिला बसवलं, जेणेकरून तिचा चेहरा खिडकीच्या दिशेने राहील आणि बाहेरचं जग तिला दिसेल. त्यामुळे तिला स्थिरस्थावर व्हायला मदत झाली. मग आम्ही अली आणि मेहपाराच्या आईला फोन केला. ती पलंगावरून उतरत असल्याचं त्यांना पाहता आलं," असं कॉर्डी सांगतात. "खूपच छान आणि अतिशय भावुक क्षण होता."

त्यांच्यात अगदी हृदयस्पर्शी नातं तयार झालं होतं.

"मी त्यांना कधीच विसरू शकणार नाही, कारण ते लोक नसते, तर मी यातून बाहेर आले नसते," मेहपारा सांगतात. "सुरुवातीपासून ते येऊन माझी तपासणी करून जायचे. कॉर्डीचा चेहरा मला आठवतोय आणि दुसरी एक, बहुधा जॅकी, होती. आज मी चालतेय, त्याचं पूर्ण श्रेय त्यांना आहे."

या अनुभवाचा शेवट सुखद असल्यामुळे तो कॉर्डी यांच्यासाठीही बहुमोल होता.

"मेहपारा गंभीर आजारी होती आणि कदाचित यातच तिचे प्राण जाण्याची शक्यता होती. विशेषतः नुकतंच बाळ जन्माला घातलेलं असताना अशा अवस्थेत पुढे तग धरणं खूप अवघड असतं," असं कॉर्डी सांगतात. "कोव्हिड रुग्णांच्या अनेक शोकांतिका आम्ही पाहिल्या, अनेक जणांना प्राण गमवावे लागले, आणि अशा आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांशी आम्हीदेखील जोडले जातो."

अखेरीस ३ नोव्हेंबर रोजी मेहपारा रुग्णालयातून बाहेर पडल्या. सुमारे महिनाभर त्या रुग्णालयात होत्या.

मी त्यांच्याशी बोललो तेव्हा घरी येऊन त्यांना काही आठवडे झाले होते. नूर सात पौंडांची होती आणि मेहपारा यांच्याच शब्दांत सांगायचं तर "सुंदर नि आनंदी बाळ" होती.

कोव्हिडमुळे आयसीयूत राहावं लागलेल्या अनेक लोकांप्रमाणे मेहपारादेखील हळूहळू बऱ्या होत आहेत. याला थोडा काळ लागेल. लांब अंतर चालून जायचं असेल, तर त्यांना त्रास होतो आणि क्वचित प्रसंगी धाप लागते.

"डोक्यात गोंधळ उडतो ती बहुधा सगळ्यांत अडचणीची गोष्ट आहे. मी आजकाल बऱ्याच गोष्टी विसरते, पण शेवटी मी पुन्हा आधीसारखी होईन, अशी मला आशा आहे आणि माझी तशी श्रद्धा आहे," असं त्या म्हणतात.

"मी फक्त २२ वर्षांची आहे आणि एकंदरीत धडधाकट आहे, पण मला या आजाराचा इतका जोरदार फटका बसला, त्यावरून याला वयाची मर्यादा नाही हे स्पष्ट होतं."

मेहपारा, अली आणि नूर यांच्या कहाणीचा शेवट सुखद झाला, याचं डेबी हॉर्नर यांना बरं वाटतं.

"ही खूपच अवघड केस होती आणि सगळ्यांनाच त्यातून खूप ताण आला होता, त्यामुळे यातून ते सुखरूप बाहेर आले, याचा मला खूप आनंद वाटतो," असं डेबी सांगतात.

आधी आपण या विषाणूचा गांभीर्याने विचार केला नाही हे मेहपारा कबूल करतात. त्यांच्या समुदायातील काही लोकांनी चुकीच्या माहितीच्या प्रभावाखाली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात न जाण्याचा सल्ला दिला होता, याबाबत त्या खंतही व्यक्त करतात.

"प्रामाणिकपणे सांगायचं तर, मी हॉस्पिटलमध्ये गेले म्हणून माझा जीव वाचला," त्या म्हणतात. "मी घरीच थांबले असते, तर माझं आणि नूरचं काहीतरी बरंवाईट झालं असतं. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले त्याचं मला बरं वाटतं. माझा जीव वाचवल्याबद्दल मी एनएचएसच्या कर्मचारीव र्गाची ऋणी आहे."

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आम्हाला गरोदर महिलांच्या तब्येतीची चिंता वाटत होती. २००९ साली स्वाइन फ्लूची साथ पसरली तेव्हा त्यांना गंभीर आजाराचा विशेष धोका होता आणि २०१४ साली सिएरा लिऑनमध्ये इबोलाची साथ पसरली तेव्हा त्याची लागण झालेल्या जवळपास सर्व गरोदर महिला मरण पावल्याचा अनुभव होता. कोव्हिडची साथ पसरत गेली तसतसं बहुसंख्या गरोदर महिलांसाठी हा आजार गंभीर धोकादायक नसल्याचं स्पष्ट झालं, परंतु गरोदर नसलेल्या महिलांपेक्षा गरोदर महिलांना चांगल्यापैकी जास्त धोका होता, त्यातही काळ्या किंवा आशियाई व्यक्तींना हा धोका आणखी जास्त होता.

या साथीला आपण दिलेला प्रतिसाद वैद्यकीय संशोधनातील लक्षणीय प्रगतीमुळे शक्य झाला असला, तरी त्यातील एक उणीवही या निमित्ताने अधोरेखित झाली- उपचार आणि लसींच्या एकंदरितच वैद्यकीय चाचण्यांमधून सर्वसाधारणतः गरोदर महिलांना वगळलं जातं. ही वगळणूक दूर करण्यासाठी तत्काळ प्रयत्न व्हावेत, असं आवाहन केलं गेलं आहे. कारण, सर्वांसाठी परिणामकारक ठरतील असे उपचार व लसी आपल्याला हव्या आहेत.

मार्च २०२०मध्ये हा साथीचा आजार सुरू झाला तेव्हापासून आमच्या रुग्णालयाने कोव्हिड-19ची लागण झालेल्या जवळपास ३,००० रुग्णांवर उपचार केले, त्यातील सुमारे 500 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे हे वर्ष अतिशय खिन्नतेमध्ये संपलं. या साथीत जीव गमावलेल्यांची आठवण ठेवण्याची ही योग्य वेळ आहे, त्याचप्रमाणे आम्ही ज्यांचे जीव वाचवले त्या अनेक रुग्णांसाठी आनंद साजरा करण्याचीदेखील ही वेळ आहे.

काही रुग्णांच्या बाबतीत आजारातून बाहेर पडण्याचा प्रवास जवळपास चमत्कारासारखाच होता. काही रुग्ण जवळपास मरण पावले होते, पण त्यांना खेचून पुन्हा या जगण्यात आणलं गेलं. काही रुग्णांनी अनेक आठवडे आयसीयूमध्ये बेशुद्धावस्थेत घालवले आणि मग ते रुग्णालयाबाहेर पडले. यातील अनेक रुग्णांना अजूनही गंभीर आजाराचे दीर्घकालीन मानसिक व शारीरिक परिणाम सहन करावे लागत आहेत, पण विलक्षण फिजिओथेरपिस्टांच्या मदतीने ते हळूहळू त्यांच्या आधीच्या आयुष्यात परतत आहेत.

प्राध्यापक जॉन राइट डॉक्टर आणि साथीच्या रोगांचे तज्ज्ञ आहेत. ते ब्रॅडफोर्ड आरोग्य संशोधन संस्थेचे प्रमुख असून सब-सहारन आफ्रिकेतील पटकी, एचआयव्ही व ईबोला साथीच्या आजारांसंदर्भातील उपचारांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. बीबीसी न्यूजसाठी ते सदर रोजनिशी लिहीत आहेत आणि बीबीसी रेडिओसाठी रुग्णालयातील विभागांमधले अनुभव सांगत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)