कोरोना : वुहानमधील संसर्गाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला तुरुंगवास

झांग झान

फोटो स्रोत, YOUTUBE/SCREENSHOT

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

वुहानमधील कोरोना संसर्गाचं वार्तांकन करणाऱ्या चिनी पत्रकाराला चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

झांग झान असं अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. 'अशांतता आणि तणाव निर्माण केल्याच्या आरोपांवरून झान यांना दोषी ठरविण्यात आलं आहे.

37 वर्षीय झांग झान यांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. त्या गेल्या काही महिन्यांपासून उपोषण करत होत्या. झांग यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती.

वुहानमधल्या संसर्गाचं वार्तांकन केल्यामुळे अडचणीत आलेल्या अनेक नागरी पत्रकारांपैकी झांग या एक होत्या.

चीनमध्ये स्वतंत्र माध्यमं नाहीत. कोरोना संसर्गाला सरकारकडून जो प्रतिसाद दिला जात आहे, त्याबद्दल जे कार्यकर्ते किंवा जागले (व्हिसल ब्लोअर्स) लिहित आहेत, त्यांना सरकारी यंत्रणांच्या दडपशाहीला तोंड द्यावं लागताना दिसत आहे.

"शिक्षा सुनावली गेल्यानंतर झांग झान या अतिशय खचून गेल्यासारख्या दिसत होत्या," असं झान यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांपैकी एक असलेल्या रेन क्वानियू यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.

निकालाचं वाचन होत असताना झांग यांच्या आई कोर्टामध्येच हुंदके देऊन रडू लागल्या असंही रेन यांनी सांगितलं.

'बंडखोर व्यक्तिमत्त्व'

अटकेपूर्वी एका फिल्ममेकरला दिलेल्या व्हीडिओ इंटरव्ह्यूमध्ये झांग यांनी सांगितलं होतं की, फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाच्या काळात शहरातील वातावरणाबद्दल एका नागरिकानं लिहिलेली पोस्ट वाचून मी वुहानला जाण्याचं निश्चित केलं.

तिथे गेल्यावर झांग यांनी वुहानच्या रस्त्यांवर तसंच हॉस्पिटलमध्ये जे चित्र दिसत होतं, त्याबद्दल लिहायला सुरूवात केली. त्यांच्यावर अनेकदा सरकारी यंत्रणांकडून दडपण येत होतं. मात्र, सोशल मीडियावर त्यांचं लिखाण मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात होतं.

नेटवर्क ऑफ चायनीज ह्युमन राइट्स डिफेंडर्सनं म्हटलं होतं की, झांग यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, झांग यांनी अन्य पत्रकारांच्या अटकेबद्दल तसंच सरकारी यंत्रणेकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करणाऱ्या कुटुंबियांना जो त्रास दिला जात होता, त्याबद्दलही लिहिलं होतं.

"कदाचित मी पहिल्यापासून बंडखोर वृत्तीची होते आणि केवळ सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत होते. मी हे का करू शकत नव्हते?" बीबीसीला त्यांच्या मुलाखतीची जी क्लिप मिळाली होती, त्यामध्ये झांग सांगत होत्या.

"मी जे करत आहे, ते थांबविणार नाही. कारण हा देश आता मागे जाऊ शकत नाही."

CHRD नं दिलेल्या माहितीनुसार झांग या 14 मे पासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांना शांघाय पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दुसऱ्या दिवशी समोर आली.

नोव्हेंबर महिन्यात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटलं होतं की, त्यांनी WeChat, ट्विटर आणि युट्यूब तसंच अन्य माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवली.

परदेशी माध्यमांना मुलाखती दिल्याचा आणि वुहानमधील संसर्गाबद्दल चुकीची माहिती पसरविल्याचाही आरोप झांग यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांना चार किंवा पाच वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्याची शिफारसही करण्यात आली होती.

आपल्या अटकेचा निषेध करण्यासाठी झांग यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली होती.

झांग यांच्या वकिलांनी आपल्या निवेदनात सांगितलं की, जेव्हा मी झांग यांना डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला भेटलो होतो, तेव्हा त्यांना ट्यूबद्वारे जबरदस्तीने अन्न भरविण्यात येत होतं. त्यांना डोकेदुखी, पोटदुखी आणि गरगरणं असे त्रास होत होते.

"त्यांना बाथरुमला जाण्यासाठीही मदतीची गरज लागत होती. झोपेतही त्या सतत कूस बदलायच्या," झांग यांचे वकील सांगत होते. झांग यांच्या प्रकृतीचं कारण सांगत त्यांच्याविरुद्धची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती.

झांग यांना 2019 सालीही अटक करण्यात आली होती. हाँगकाँगमधील आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल झांग यांना अटक करण्यात आली होती.

CHRD मध्ये सल्लागार असलेले लिओ लॅन यांनी झांग यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना हा एकप्रकारचा 'इशारा' असल्याचं म्हटलं.

"त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा कठोर आहे. चिनी सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वुहानमध्ये जे घडलं ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्य नागरिकांवरही दडपण आणण्यात येत आहे," लिओ लॅन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

"कोरोना संसर्गाशी संबंधित गोष्टींचं वार्तांकन केल्याबद्दल ज्या अन्य नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांचीही मला काळजी वाटतीये."

वुहानमधील परिस्थितीचं वार्तांकन करणारे ली झेहुआ, शेन क्वीशी आणि फँग बिन हे पत्रकारही बेपत्ता होते.

काही दिवसांपूर्वी ली समोर आले. आपल्याला जबरदस्तीने क्वारंटाइन केल्याचा आरोप त्यांनी केला. शेन हे आपल्या कुटुंबीयांसोबतच राहत असल्याचं सांगितलं जात असून त्यांच्यावर सरकारी यंत्रणा नजर ठेवून आहेत. फँग बिन कुठे आहेत, हे मात्र अजूनही कोणाला माहिती नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)