You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सेक्स ट्राफिकिंगद्वारे पॉर्नहब नफा कमावतंय', 40 महिलांची न्यायालयात धाव
पॉर्नहबने या साईटवर कन्टेन्ट तयार करणाऱ्या एका भागीदारासोबत देहविक्रीचा उद्योग चालवून नफा कमावल्याचा आरोप करत 40 महिलांनी पॉर्नहबवर खटला दाखल केलाय.
'गर्ल्स डू पॉर्न' या कंपनीशी संबंध असणाऱ्या य 40 महिला आहेत. या कंपनीच्या मालकांवर अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या कंपनीच्या कारवायांबद्दल पॉर्नहब आणि त्यांची मुख्य कंपनी माईंडगीक यांना माहिती होती, पण त्यांनी तरीही ही भागीदारी सुरू ठेवल्याचं या पीडित महिलांचं म्हणणं आहे.
मास्टरकार्ड आणि व्हिसा या कंपन्यांनी पोर्नहबसोबतचे संबंध तोडल्याचं प्रकरण ताजं असतानाच हे नवीन प्रकरण समोर आलंय.
या वेबसाईटवर बाल लैंगिक शोषण आणि बलात्काराविषयीचा मजकूर असल्याचा आरोप न्यूयॉर्क टाईम्सने एका तपासानंतर केला होता. त्यानंतर मास्टरकार्ड आणि व्हिसा या दोन्ही कंपन्यांनी या वेबसाईटसोबतचे संबंध तोडले.
बीबीसीने केलेल्या एका तपासातूनही या वेबसाईटवर लहान मुलांच्या बलात्काराविषयीचे व्हिडिओ पुन्हापुन्हा अपलोड करण्यात आल्याचं आणि त्याचा पीडितांच्या आयुष्यावर परिणाम झाल्याचं उघडकीला आलं होतं.
दोन्ही पेमेंट कंपन्यांनी संबंध तोडल्याने आता या वेबसाईटकडे फक्त बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून सबस्क्रिप्शनची फी स्वीकारण्याचा पर्याय उरला आहे.
नवीन तक्रार काय आहे?
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी करत या 40 महिलांनी प्रत्येक 10 लाख अमेरिकन डॉलर्सची नुकसान भरपाई मागितली आहे.
याविषयीचं वृत्त Vice ने दिलंय.
पॉर्नहब चालवणाऱ्या माईंडगीक कंपनीचे 'गर्ल्स डू पोर्न' सोबत ऑक्टोबर 2019पर्यंत संबंध होते. ऑक्टोबर 2019मध्ये या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने कंपनीचं काम बंद झालं.
या महिलांनी हे आरोप केल्यानंतर पोर्नहब आणि माईंडगीकच्या इतर वेबसाईट्सवरून 'गर्ल्स डू पॉर्न'चे व्हिडिओज हटवण्यात आले.
या महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपली तक्रार सांगण्यासाठी कंपनीशी अनेकदा संपर्क साधला होता. या महिलांतर्फे 2016मध्ये पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती.
"गर्ल्स डू पॉर्न हे धोका, बळजबरी करत पीडितांचा व्यापार करत असल्याची कल्पना माईंडगीकला 2009 पासून होती आणि 2016 च्या अखेरपर्यंत खात्रीशीरपणे त्यांना हे माहिती होतं," असं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलंय.
"हे कळल्यानंतरही माईंडगीकने गर्ल्स डू पॉर्नसोबतची भागीदारी कायम ठेवली. शरीरविक्रयासाठी व्यापार होत असल्याचे मोठे पुरावे माईंडगीकला मिळूनही त्यांनी कधीही याबाबतचा तपास केला नाही वा व्यवसायातल्या भागीदाराला याविषयीचे प्रश्न विचारले नाहीत. यातून नफा मिळणं बंद होईपर्यंत त्यांना याची पर्वा नव्हती."
या महिलांनी केलेल्या आरोपांविषयी प्रतिक्रिया मिळवण्यासाठी माईंडगीकला संपर्क साधण्यात आलेला आहे.
गर्ल्स डू पॉर्नद्वारे मॉडेलिंगसाठीच्या संधींची जाहिरात दिली जाई आणि अर्ज करणाऱ्या तरुणींना ही अडल्ट व्हिडिओ तयार करणारी वेबसाईट असल्याचं नंतर सांगण्यात येई. हे काम केल्यास त्या तरुणीचं नाव समोर येणार नाही, व्हिडिओ इंटरनेटवर टाकला जाणार नाही असं सांगण्यात येत असे, पण प्रत्यक्षात हे ऑनलाईन पोस्ट करण्यात येई असं तक्रारीत म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)