Ind vs Aus Test: विराट कोहलीच्या रनआउटमुळे शेन वॉर्नही हळहळला

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज पहिला दिवस होता. हा कसोटी सामना गुलाबी चेंडूवर खेळवण्यात येत आहे. अॅडलेडमध्ये होत असलेल्या या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली चांगल्या लयीत दिसत होता.

पण धाव घेण्याच्या प्रयत्नात कोहली धावबाद झाल्यामुळे मोठा डाव खेळण्याची त्याची संधी हुकली. कोहलीच्या आठ वर्षांच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत फक्त दुसऱ्यांदा धावबाद झाला आहे.

विराट कोहलीच्या रनआऊटवर माजी क्रिकेटपटू शेन वॉर्ननेही हळहळ व्यक्त केली आहे. विराटची मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली असती. तो अगदी योग्य फॉर्मात होता. पण विराटच्या आऊट होण्यामुळे क्रिकेटच्या चाहत्यांचेच नुकसान झाल्याची भावना शेन वॉर्नने व्यक्त केली आहे.

कोहली बाद झाल्यानंतर भारताच्या फलंदाजांची पडझड पाहायला मिळाली. सकाळी सावध सुरुवात केल्यानंतरही पहिल्या दिवसअखेर भारताची धावसंख्या 6 बाद 233 पर्यंत पोहोचली आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रिद्धिमान साहा 9 आणि रविचंद्रन अश्विन 15 धावांसह नाबाद होते.

एकाच मैदानावर कोहली दुसऱ्यांदा धावबाद

विराट कोहली आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत आज केवळ दुसऱ्यांदा धावबाद झाला.

77 व्या षटकात ऑस्ट्रेलियन ऑफ स्पिनर नॅथन लायन याच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे स्ट्राईकवर होता. चेंडू फटकावल्यानंतर रहाणेने कोहलीला धाव घेण्यासाठी कॉल दिला. पण धाव पूर्ण होणार नसल्याचा अंदाज येताच त्याने कोहलीला पुन्हा मागे पाठवलं. पण तोपर्यंत कोहलीने अर्धी धावपट्टी पार केली होती. तो पुन्हा माघारी परतू शकला नाही.

जॉश हेजलवूडने क्षणही न दवडता चेंडू लायनकडे भिरकावला. लायनने कोणतीही चूक न करता कोहलीला धावबाद केलं. कोहलीने 180 चेंडूंचा सामना करत 74 धावा केल्या. तो आपलं शतक सहज पूर्ण करेल असं वाटत असतानाच त्याच्या विकेटमुळे भारतीय संघात निराशा पसरली.

कोहली बाद झाला तेव्हा भारताचा डाव 4 बाद 188 असा झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे (42) आणि हनुमा विहारी (16) हेसुद्धा झटपट बाद झाल्यामुळे भारताची 6 बाद 206 अशी अवस्था झाली होती. पण साहा-अश्विन जोडीने अखेरची पाच-सहा षटके सावधपणे खेळून काढत धावसंख्या 233 पर्यंत पोहोचवली.

आठ वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात याच मैदानावर कोहली रनआऊट झाला होता. त्यावेळी पहिल्या डावात कोहलीने शतक झळकावलं होतं. पण दुसऱ्या डावात हिलफेनहॉसच्या थेट फेकीवर कोहली 22 धावांवर बाद झाला होता. याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

शॉ-अग्रवाल यांची निराशा, पुजारा-कोहली-रहाणे यांनी डाव सांभाळला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने निराशा केली. शॉ सामन्यात दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तो भोपळाही फोडू शकला नाही.

त्यामुळे शून्यावरच एक बाद अशी भारताची धावसंख्या होती. त्यानंतर मयांक अग्रवालही वैयक्तिक 17 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि पुजारा यांनी मिळून भारताचा डाव सांभाळला. पुजारा 43 धावांवर बाद झाल्यांनंतर कोहलीने रहाणेसोबतही अर्धशतकी भागिदारी केली.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने दोन तर जॉश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)