कोरोना व्हायरस चीनमधूनच पसरला का, चौकशीसाठी WHO चं पथक वुहानला जाणार

फोटो स्रोत, Getty Images
दहा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचं पथक पुढच्या महिन्यात चीनच्या वुहान प्रांताचा दौरा करून कोरोना विषाणूची सुरुवात कशी झाली, याच्या कारणांचा तपास करेल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.
आजवर चीनने कुठल्याही प्रकारच्या स्वतंत्र तपासासाठी नकारच दिला होता. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून वुहानला पथक पाठवण्यासंदर्भात चीनशी चर्चा सुरू होती, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
वुहानमधल्याच मांस विक्री करणाऱ्या एका मार्केटमधून कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचं बोललं गेलं. मात्र, याविषयीच्या अधिकृत तपासाच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
चीनने कोरोना विषाणूची साथ पसरत असल्याचं लपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला होता.
तपास पथकाचा उद्देश
जागतिक आरोग्य संघटनेचं पथक कोरोनासाठी कोण जबाबदार आहे, हे शोधण्यासाठी नव्हे तर भविष्यात अशा प्रकारची जागतिक साथ येऊ नये, यासाठी वुहानचा दौरा करणार असल्याचं या पथकातील एक बायोलॉजिस्टने असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्युटचे डॉ. फेबियन लीनडर्टज म्हणाले, "दोष कुणाचा, हे शोधून काढणं, हा या दौऱ्याचा उद्देश नाही. तर नेमकं काय झालं होतं आणि या अभ्यासाच्या आधारे भविष्यात अशाप्रकारचे धोके कमी करण्याचे प्रयत्न करता येतील का, याचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात येत आहे."

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना विषाणू पसरण्याला सुरुवात कधी झाली आणि त्याचा प्रसार वुहानमधूनच झाला की नाही, हे जाणून घेणं या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचंही डॉ. लीनडर्टज यांनी सांगितलं आहे.
हे पथक जवळपास 4 ते 5 आठवडे वुहानमध्ये असेल.
विषाणू सर्वप्रथम कुठे आणि कधी आढळला?
अगदी सुरुवातीच्या दिवसात चीनमधल्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरातल्या एका मांस मार्केटमध्ये हा विषाणू आढळून आला आणि याच मार्केटमधून हा विषाणू प्राण्यातून माणसाच्या शरीरात संक्रमित झाल्याचं बोललं गेलं.
मात्र, कोरोना विषाणू वुहानमधल्या मांस मार्केटमधून मानवात संक्रमित झाला नसून तिथे त्याचा फैलाव झाला, असं आता तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मानवाला संक्रमित करण्याची क्षमता असणारे कोरोना विषाणू अनेक दशकांपासून वटवाघुळांमध्ये असावे, असं संशोधनात दिसून आलं आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात वुहान सेंट्रल हॉस्पिटलमधले डॉ. ली वेनलियँग यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना एका नवीन आजाराचा संभाव्य उद्रेक होणार असल्याचा इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनीच त्यांना 'चुकीची माहिती पसरवू नका', असा दम देत त्यांच्यावरच 'अफवा पसरवल्याचा' आरोप ठेवला.
फेब्रुवारी महिन्यात डॉ. ली यांचा कोरोनाग्रस्तांवर उपचारादरम्यान कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला.
पुढे एप्रिल महिन्यात हा विषाणू वुहानमधल्या एका प्रयोगशाळेतून लीक झाला, असाही संशय व्यक्त करण्यात आला आणि तसे आरोपही होऊ लागले. अमेरिकेच्या गृहमंत्रालयाच्या माहितीवरूनही चीनमधील त्यांच्या दुतावासातील अधिकाऱ्यांना तिथल्या जैवसुरक्षेविषयी काळजी वाटत असल्याचं दिसून आलं.
मात्र, हा विषाणू मानवनिर्मित किंवा जनेटिकली मॉडिफाईड नसला तरी त्याची लागण प्राण्यापासून झाली की प्रयोगशाळेतल्या एखाद्या अपघातातून तो पसरला, याचा तपास सुरू असल्यचं त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालकांनी सांगितलं होतं.
दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव चीनबाहेर झाला असावा, असा दावा अलिकडेच चीनमधल्या काही प्रसार माध्यमांनी केला आहे.
मात्र, या वृत्तांना काहीच आधार नसल्याचं आणि यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचल्याबद्दल चीनच्या नेतृत्त्वाला लागलेली चिंता दिसून येत असल्याचं विश्लेषकांना वाटतं.
वुहानमधून या प्रश्नाचं उत्तर मिळेल का?
बीबीसी आरोग्य प्रतिनिधी नाओमी ग्रिमले यांचं विश्लेषण
विषाणूच्या उत्पत्तीची स्वतंत्र चौकशी करण्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जागतिक आरोग्य संघटनेवरून उठलेला वाद यात गुंतला आहे.
याबाबत ट्रंप प्रशासनाने कायमच कठोर भूमिका घेतली होती. चीन सरकारने वुहानमध्ये लावलेला लॉकडाऊन, मास टेस्टिंग आणि विषाणूचा जेनेटिक कोड जगासमोर आणणे, अशा अनेक बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने चीनचं कौतुक केलं होतं. ही उदाहरणं देत राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटना चीनबाबत नरमाईची भूमिक घेत असल्याचे आरोप केले होते.
अमेरिकेसोबतच ऑस्ट्रेलिया आणि यूकेनेही याप्रकरणी योग्य चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली होती.
असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या व्हीडिओ कॉलचे काही ट्रान्सक्रिप्टही उघड केले होते. यात हे अधिकारी चीनी अधिकाऱ्यांकडून अपेक्षित माहिती पुरवली जात नसल्याची तक्रार करत होते.
यावर्षी एप्रिल महिन्यात चीनच्या दौऱ्यावर गेलेल्या जागितक आरोग्य संघटनेच्या दोन अधिकाऱ्यांच्या पथकाला वुहानला भेट देण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले होते.
जागतिक आरोग्य संघटनेचं नवं पथक आता वुहानला भेट देणार आहे. या दौऱ्यातून काही मूलभूत जैविक प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे. - हा विषाणू वटवाघुळातून पसरला का? वटवाघुळ आणि मानव यांना जोडणारा 'मधला दुवा' (intermediate host) होता का? आणि विषाणूच्या सुरुवातीच्या उद्रेकाच्या केंद्रस्थानी वुहानमधील मांस मार्केटच होतं का?
चीनभोवती संशयाचं धुकं
जानेवारी महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या हेल्थ इमरजन्सी प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माईक रायन यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल चीनचं कौतुक करताना म्हटलं होतं, "आव्हान मोठं असलं तरी त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे."
विषाणूच्या जेनेटिक कोडची माहिती तात्काळ सार्वजनिक करत चीनने विषाणूच्या फैलावाचा वेग मंदावण्यात मोलाची कामगिरी बजवली, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं होतं.
मात्र, अमेरिका आणि इतर अनेक देशांनी आक्षेप घेत विषाणूचा फैलाव नेमका कधी सुरू झाला, याची पारदर्शक माहिती चीनने दिली आहे का, असा सवाल विचारला होता.

फोटो स्रोत, Getty Images
मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेचे चीनमधील प्रमुख डॉ. गॉडेन गॅली बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, 'सुरुवातीच्या काळात संसर्गाच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवण्यात काही उणिवा होत्या. मात्र, भविष्यात समस्या कशा टाळता येतील, याकडे तज्ज्ञ लक्ष देतील.'
यानंतर मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर 'चीनकेंद्री' असल्याच थेट आरोप करत सुरुवातीच्या दिवसांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या मार्गदर्शनामुळेच विषाणू नियंत्रणाची संधी गमावल्याचं म्हटलं होतं.
ट्रंप एवढ्यावरच थांबले नाही तर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडत असून जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी इतरत्र वळवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती.
मात्र, लवकरच अमेरिकेला नवे अध्यक्ष मिळणार आहेत. 20 जानेवारी रोजी जो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. जो बायडन यांनी परराष्ट्र धोरणविषयक समिती स्थापन केली आहे. अमेरिकेचं जागतिक आरोग्य संघटनेतलं स्थान कायम ठेवण्याचं टास्क या समितीला देण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























