कोरोना व्हायरस : विमान कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहांऐवजी डायपरचा वापर करण्याची चीनची सूचना

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विमानातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहांचा वापर न करता चक्क डायपर (नॅपी) वापरावेत, अशी सूचना चीनच्या विमान वाहतूक मंत्रालयाने केली आहे.
कोव्हिड काळात विमान प्रवासासाठीचे नवे नियम चीनच्या विमान वाहतूक मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले. त्यामध्ये नॅपी वापरण्याच्या नव्या नियमाचा समावेश करण्यात आला आहे.
कोव्हिडचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेल्या ठिकाणी जाणाऱ्या चार्टर विमानांसाठी ही नियमावली लागू असेल, असं विभागाने म्हटलं आहे.
जगभरात सर्वत्रच विमान वाहतुकीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. लोकांचा प्रवास थांबू नये तसंच कोरोनाचा प्रसार रोखावा, असं दुहेरी आव्हान विमान कंपन्यांसमोर आहे.
त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी विमान कंपन्यां तसंच विमान वाहतूक मंत्रालयाकडून विविध प्रकारचे निर्बंध लावण्यात येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर चीनच्या विमान वाहतूक प्रशासनाने एक 49 पानी नियमावली विमानप्रवासासाठी प्रसिद्ध केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या प्रति दशलक्ष 500 पेक्षा जास्त असलेल्या देशात प्रवास करायचा असल्यास केबिन क्रूच्या कर्मचाऱ्यांना विमानातील स्वच्छतागृहाचा वापर करता येणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
केबिन क्रूमधील कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क, हातमोजे, टोपी, गॉगल, फेसशिल्ड, कपडे आणि शूज झाकले जातील अशी डिस्पोजेबल आवरणं तर वापरावीतच, शिवाय त्यांनी डायपरही वापरावेत, अशी सूचना चीनच्या विमान वाहतूक मंत्रालयाने केली आहे.
सध्याच्या कोरोना संकटाचा मोठा फटका विमान वाहतूक क्षेत्राला बसला आहे. विस्कटलेली घडी बसवण्याच्या प्रयत्न या कंपन्यांकडून केला जात आहे.
विमान प्रवास सुरू राहावा यासाठी अनेक निर्बंध प्रवासी तसंच कर्मचाऱ्यांवरही घालण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, परदेशप्रवास करणाऱ्या विमानांसाठीचं धोरण आणखी कठोर आहे. काहींनी दोन प्रवाशांमधील एक जागा कठोरपणे रिकामी ठेवण्याचा नियम ठरवला आहे. तर काही विमानांमध्ये मास्क वापरणं अनिवार्य आहे. तसंच दोन प्रवाशांच्या मध्ये बसलेल्या प्रवाशाने पीपीई किट किंवा डिस्पोझेबल आवरण वापरावं, असा नियमही आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)























