You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जापानच्या समुद्रात अमेरिका आणि रशियाच्या युद्धनौका आमने-सामने
मंगळवारी रशियाच्या युद्धनौकेने जापानी समुद्र हद्दीत घुसलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेला पकडून हुसकावून लावल्याचं रशियाने म्हटलं आाहे.
अमेरिकेची USS जॉन एस. मॅक्केन ही युद्धनौका जापानी समुद्र हद्दीत दोन किमी आत आल्याचं रशियाचं म्हणणं आहे. जापानी समुद्राला पूर्व समुद्र (East Sea) नावानेही ओळखतात. जापान, रशिया आणि कोरियाची ही समुद्र सीमा आहे.
रशियन युद्धनौकेने चिरडून टाकण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेने आपली युद्धनौका हद्दीबाहेर नेल्याचा दावाही रशियाने केला आहे.
दरम्यान, आपण कुठल्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही आणि आमच्या युद्धनौकेला हुसकावूनही लावण्यात आलेलं नाही, असं अमेरिकेचं म्हणणं आहे.
रशियाने पॅसिफिक समुद्रात तैनात केलेल्या अॅडमिडल व्हिनोग्रेदोव्ह याा युद्धनौकेने आंतरराष्ट्रीय कम्युनिकेशन चॅनलच्या माध्यमातून अमेरिकेच्या युद्धनौकेला इशारा दिला, असं रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा खोडून काढताना अमेरिकी नौदलाचे प्रवक्ते म्हणाले, "या मोहिमेबद्दल रशियाने जारी केलेलं निवेदन खोटं आहे. अमेरिकेच्या USS जॉन मॅक्केन या युद्धनौकेला कुठल्याही राष्ट्राच्या सीमेतून 'हुसकावण्यात' आलेलं नाही."
ते पुढे म्हणाले, अमेरिका "कधीही धमक्यांना घाबरणार नाही आणि कुठलाही अनुचित सागरी दावा कधीही मान्य करणार नाही."
समुद्रात होणाऱ्या अशा घटना दुर्मिळ आहेत. गेल्या वर्षी पूर्व चीनजवळच्या समुद्रात अमेरिकेच्या एका क्रूज जहाजाला रशियाचं हेच अॅडमिडल व्हिनोग्रेदोव्ह जहाज धडणार होतं. त्यावेळीही दोन्ही देशांनी एकमेकांवर दोषारोप केले होते.
अमेरिका आणि रशिया या दोन देशांमधले हे आरोप-प्रत्यारोप नवे नाहीत. या दोन्ही देशांनी कायमच एकमेकांवर समुद्रात आणि हवेत एकमेकांविरोधात सैन्याभ्यास करत असल्याचे आरोप केले आहेत.
1988 साली रशियाच्या 'बेजेव्हेटनी' या जहाजाने यॉर्कटाऊन या अमेरिकी क्रूज जहाजाला सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोपावरून काळ्या समुद्रात धडक दिली होती.
या दोन देशांमधले संबंध तणावपूर्ण आहेत आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतल्या विजयासाठी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं अजूनही अभिनंदन केलेलं नाही.
या दोन्ही देशांनी त्यांच्यातील उर्वरित अण्वस्त्र करारालाही अजून अंतिम रुप दिलेलं नाही. हा करार फेब्रुवाारी महिन्याात संपुष्टात येणार आहे.
2017 साली अमेरिकेच्या याच USS जॉन एस. मॅक्केन जहाजाची सिंगापूरच्या समुद्रात एका तेलवाहू नौकेशी धडक झाली होता. त्या अपघातात 10 खलाशांचा मृत्यू झाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)