कमल सिंहः बॅले शिकण्यासाठी रिक्षाचालकाचा मुलगा पोहोचला लंडनपर्यंत

फोटो स्रोत, PHOTOGRAPHY BY ASH
- Author, व्हिक्टोरिया लिंड्रिया
- Role, आर्ट्स अँड एंटरटेन्मेंट रिपोर्टर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
'इच्छा असेल तर मार्ग दिसेल' असं म्हटलं जातं. दिल्लीतल्या विकासपुरीत राहणाऱ्या कमल सिंह नावाच्या तरुणाने ही उक्ती प्रत्यक्षात आणून दाखवलीय. केवळ प्रत्यक्षात आणली नाहीय, तर तो अनेकांसाठी प्रेरणा बनलाय. कमलचा हा प्रवास जाणून घेऊया...
चार वर्षांपूर्वी 17 वर्षांचा कमल सिंह एकीकडे त्यांचं शिक्षण पूर्ण करत होता आणि त्याचवेळी दुसरीकडे बॅले डान्सचे क्लासही करत होता. कमल सिंह आता 21 वर्षांचा आहे.
बॅले डान्सला करिअर म्हणून निवडणं हे सर्वसामान्य घरातल्या मुला-मुलींच्या आवाक्यातलं नसतं. त्यातल्या संधी आणि यश-अपयशांबाबत फारशी कुणाला माहितीही नसते. पण कमलनं यात केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे, तर भारतीयांनाही अभिमान वाटेल, असं पाऊल ठेवलं आहे.
दिल्लीतल्या रिक्षाचालकाचा मुलगा असलेल्या कमल सिंह याची इंग्लिश नॅशनल बॅले स्कूलनं आपल्या प्रोफेशनल ट्रेनी प्रोग्रामसाठी निवड केलीय. अशी निवड झालेला कमल सिंह हा पहिला भारतीय आहे.
आता दिल्लीतल्या विकासपुरीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या चेल्सी इथं राहतो. विकासपुरीत आपलं बालपण घालवलेला कमलसिंह इथं त्याच्या इतर 12 विद्यार्थी मित्र-मैत्रिणींसोबत बॅटरसीच्या डान्स स्टुडिओत मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत बेली डान्स करताना दिसतो.
कुठल्याही आंतरराष्ट्रीय बॅले कंपनीत काम करणं आणि तिथं प्रिंसिपलच्या पदापर्यंत पोहोचणं सर्वच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. नूरेयेव आणि फॉन्टेयेन यांच्या पावलावर पाऊल ठेवत सर्व विद्यार्थी डान्स शिकण्याचा प्रयत्न करत असतात.

फोटो स्रोत, PHOTOGRAPHY BY ASH
यंदा इंग्लिश नॅशनल बॅले स्कूलमध्ये तीन तरुणांना संधी मिळालीय. हे तिघेही अशा ठिकाणाहून आलेत, जिथे बॅले डान्सला करिअर म्हणून निवडणं अशक्यप्राय गोष्ट मानली जाऊ शकते.
दिल्लीतल्या विकासपुरीत राहणाऱ्या रिक्षाचालकाचा मुलगा असलेला कमल सिंह हा त्या तिघांपैकी एक आहे.
कमलला हे मनापासून वाटतं की, त्याचे शिक्षक अर्जेटिनातील डान्र फर्नांडो एग्विलेरो आणि बॉलीवुड स्टारच्या मदतीविना हे या क्षेत्रात पुढे जाणं शक्य नव्हतं.
'फी भरण्याएवढेही हातात पैसे नव्हते…'
"इंग्लिश नॅशनल बॅले स्कूलमध्ये निवड झाल्याचं कळल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. मात्र, त्याचवेळी दु:खंही झालं, कारण मला माहित होतं की प्रवेश फी भरण्याएवढेही आपल्याकडे पैसे नाहीत," असं कमल सांगतो.
मात्र, पैशाची काळजी करण्यापेक्षा डान्सवर लक्ष केंद्रित कर असं त्याला शिक्षकांनी सांगितंल.
बॅलेच्या फ्री ट्रायल क्लाससाठी कमल दिल्लीस्थित एंपिरियल फर्नांडो बॅले कंपनीत गेला होता. त्याचवेळी फर्नांडो यांच्या लक्षात आलं की, कमलमध्ये प्रचंड क्षमता आहे.
मात्र, कमल बॅले डान्सच्या प्रशिक्षणाचा खर्च पेलू शकत नव्हता. त्यात त्याचं घरसुद्धा स्कूलपासून दूर होतं आणि तिथं पोहोचायला दोन तास लागत असत.

फोटो स्रोत, PHOTOGRAPH BY ASH
संसाराचा गाडा हाकण्यासाठी कमलचे वडील दोन-दोन नोकऱ्या करायचे. अशा स्थितीत बॅले डान्सचं ट्रेनिंग म्हणजे एखाद्या महाकाय गोष्टीपेक्षा कमी नव्हतं. प्रवेश फीची तजवीज करणंसुद्धा महाकठीण गोष्ट होती.
त्याचवेळी फर्नांडो यांनी पुढाकार घेत कमलच्या आई-वडिलांना समजावलं. एवढंच नव्हे, फर्नांडो यांनी कमलला दिल्लीतल्या आपल्या घरात राहण्यासाठी खोली दिली. तीन वर्षांपर्यंत मोफत प्रशिक्षण दिलं. त्यानंतर इंग्लिश नॅशनल बॅले स्कूलमध्ये जाण्यासाठी, तिथली प्रवेश फी आणि लंडनमध्ये राहण्यासाठीसुद्धा फर्नांडो यांनी मदतीचा हात पुढे केला.
लंडनच्या बॅलेस्कूलच्या वर्षभराच्या कोर्ससाठी 8 हजार पाऊंड म्हणजे भारतीय रुपयांत सांगायचे तर 7 लाख 87 हजार रुपये मोजावे लागतात. शिवाय, तिथं राहण्या-खाण्याचा खर्च आहेच. एवढी मोठी रक्कम गोळा करणं अर्थात कमलला शक्य नव्हत. मात्र, त्याच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी क्राऊड फंडिंगचा मार्ग अवलंबला.
कुणाल कपूर आणि ऋतिक रोशननंही केली मदत
कमलने Ketto या क्राऊंड फंडिंग प्लॅटफॉर्मची मदत घेतली. या प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक बॉलीवुड अभिनेते कुणाल कपूर आहेत. कुणाल कपूर यांनी आपल्या स्टार पॉवरचा उपयोग करत सोशल मीडियावरून कमलबाबत लिहिलं. त्यानंतर कुणाल कपूर यांचे मित्र अभिनेता ऋतिक रोशन याने कमलसाठी 3200 पाऊंडची देणगी दिली.
काही आठवड्यात कमलला शिकण्यासाठी आवश्यक तेवढे 18 हजार पाऊंड जमा झाले. आतापर्यंत त्याच्याकडे 21 हजार पाऊंड जमा झाले असून, अजूनही लोकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कमल सांगतो, "भारतीयांकडून मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्याबाबतच्या बातम्या वाचून असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांना भारतातील माझ्या शिक्षकांकडून बॅले डान्स् शिकण्याची इच्छा झालीय. त्यांच्याकडून त्यांना डान्सची प्रेरणा मिळालीय."
मला मिळालेली संधी पाहून भारतात बॅले डान्सकडे करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिले जाईल, अशी आशा कमल व्यक्त करतो.
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कमी भारतीय बॅले डान्सर दिसले आहेत.
इंग्लिश नॅशनल बेली स्कूलमधील आर्टिस्टिक डायरेक्टर आणि रॉयल बॅलेच्या मुख्य डान्सर राहिलेल्या विवियाना दुरांते सांगतात, "कधी कधी गुणवत्ता अशा ठिकाणी असतात, की त्यांना संधी मिळणं फार कठीण होऊन बसतं."
कमलचा ऑनलाईन अर्ज पाहून त्यांनी त्याची निवड केली होती. त्या सांगतात, कमलचा फोकस आणि प्रतिभा पाहून हरखून गेली होती.

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES
"भारतीय शास्त्रीय नृत्य हे बॅले डान्सच्या जवळ जाणारं आहे. विशेषत: हात आणि शरीराच्या वरील अंगानं व्यक्त केलं जातं, हे दोन्ही प्रकारात जवळचं साम्य आहे. आपली जबाबदारी आहे की, बेली डान्सला विविध संस्कृतीच्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि या जगाचा त्यांनाही भाग बनवणं," असं विवियाना दुरांते सांगतात.
त्या म्हणतात, "तुम्हाला अशा डान्सरची गरज असते, जो त्याच्या नृत्याच्या माध्यमातून आपली संस्कृती सांगू शकेल. नृत्याची भाषा सगळ्यांना कळते. आर्थिक स्थिती या मार्गात कधीच अडथळा बनू नये."
बॉलीवुडकडून प्रेरणा
कमल सांगतो त्याप्रमाणे, पाच वर्षांपूर्वी त्याने बॅले डान्सची नुसती एक झलक पाहिली होती. तेव्हापासून त्याच्या आयुष्यानं वळणच घेतलं.
कमल म्हणतो, "मला सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. मला डान्स करायचा होता. मात्र, माझ्या या आवडीला आई-वडील तेवढं गांभिर्याने घेत नव्हते. मग चार वर्षूंर्वी एबीसीडी (एनी बडी कॅन डान्स) नावाचा सिनेमा आला आणि त्यात बॅले डान्स दाखवण्यात आला होता. ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाचं वळण ठरली."

फोटो स्रोत, PHOTOGRAPHY BY ASH
"पायाच्या बोटावर उभं राहून शरीर बॅलन्स करून मुलीला हवेत भिरकावणं, मग तिलं पकडणं, गोल-गोल फिरणं... बॅले डान्ससाठी तुमच्या शरीरातील हाडं मजबूत हवीत. तुमच्यात ताकद हवी. त्यासाठी तुम्हाला रोज कसरत करावी लागते आणि डान्सचा सरावही करावा लागतो," असं कमल सांगतो.
कायम सकारात्मक राहणं गरजेचं
कमल लंडनमध्ये जाऊन आता महिना उलटला आहे. प्रशिक्षणाचं नियमित वेळापत्रक पाळतोय. अधून-मधून कमल भारतीय खाद्यपदार्थांसाठी लंडनमध्ये भटकतो. व्हॉट्सअपवरून कुटुंबीयांशी गप्पा मारतो.

फोटो स्रोत, PHOTOGRAPHY BY ASH
लंडनमध्ये सध्या कमल एकटाच राहतोय. मात्र तरीही त्याला एकटं असल्यासारखं वाटत नाही. तो सांगतो, "बॅले सर्वांसाठी नाहीय. शारीरिक आणि मानसिकरित्या जे लोक ताकदवान आहेत, त्यांच्यासाठीच बेली आहे. डान्सचं तंत्र कुणीही शिकू शकतं, मात्र तुम्ही कायम सकारात्मक राहणं आवश्यक असतं."
विवियाना दुरांतेसुद्धा कमलच्या या मताशी सहमत होतात. त्या म्हणतात, तुम्ही डान्सरला फक्त ट्रेनिंग देऊ शकता, मात्र प्रत्यक्षात तुम्हालाच सर्वकाही करायचं असतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























