सततच्या आजारपणातून अब्जावधींच्या उद्योगाला कशी मिळाली प्रेरणा?

ज्यूल्स मिलर

फोटो स्रोत, ROB NORTHWAY

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

"माझी तब्येत इतकी ढासळली होती की, अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला होता," ज्यूल्स मिलर सांगत होत्या.

"मी सतत थकलेली असायचे, पोट गच्च असायचं. माझ आयुष्य नॉर्मल राहिलंच नव्हतं. त्याचवेळी मी अन्न, शारीरिक आरोग्य आणि सप्लिमेंट्स या सगळ्याचा विचार करायला लागले."

ही 2015 मधली गोष्ट आहे. त्यावेळी 25 वर्षांच्या असलेल्या ज्यूल्स यांचं लंडनमधलं आयुष्य अतिशय धकाधकीचं होतं. त्यांना तीव्र पोटदुखी आणि पचनसंस्थेचा आजार सुरू झाला.

त्यांनी आजारासाठी सप्लिमेंट घ्यायला सुरूवात केली, पण त्यामुळे काहीच फरक पडला नाही. काही सप्लिमेंट्समुळे तर अजूनच त्रास झाल्याचं ज्यूल्स यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना जाणवलं की, त्या घेत असलेल्या बऱ्याचशा गोळ्यांमध्ये फिलर्स आणि बल्किंग एजंट्स (ज्यामुळे पोट फुगतं असे घटक) होते.

सततचं आजारपण आणि गोळ्या-औषधं खाऊन कोणीही वैतागलं असतं, नैराश्यग्रस्त झालं असतं. पण ज्यूल्स यांच्या बाबतीत असं काही झालं नाही. त्याला कारण होते, त्यांचे आजोबा. ते केंब्रिज विद्यापीठात केमिस्ट होते.

कोरोना
लाईन

ज्यूल्स यांनी आजोबा प्रोफेसर जॉर्ज मिलर यांच्यासोबत डाएटरी सप्लिमेंट्समधले घटक आणि त्यांचे प्रमाण यावर संशोधन सुरू केलं.

"त्यातून खरंच खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली," ज्यूल्स सांगतात. "बाजारात अनेक ब्रँड्स होते. पण त्यामध्ये असे काही घटक होते, ज्यामुळे इतर काही लक्षणं निर्माण व्हायची."

आजोबांसोबतच्या संशोधनामुळे ज्यूल्स यांना नवीन उद्योगाची कल्पना सुचली. पूर्णपणे नैसर्गिक अशा सप्लिमेंट्सचा व्यवसाय सुरू करण्याची.

2017 साली त्यांनी Nue ची सुरूवात केली. सध्या त्यांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल तब्बल 10 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. 2019 या वर्षाशी तुलना करता यावर्षी विक्रीमध्ये सहापट वाढ झाल्याचं ज्यूल्स यांनी सांगितलं. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोक आरोग्याबद्दल अधिक जागरूक झाल्याचं त्यांनी म्हटलं.

ज्यूल्स यांचा जन्म लंडनमध्ये झाला. पण ज्यूल्स काही महिन्यांची असतानाच त्यांचे कुटुंब कोलंबियामध्ये स्थायिक झाले. स्पॅनिश हीच त्यांची मातृभाषा बनली. सात वर्षांची असताना ज्यूल्स यांचं कुटुंब पुन्हा लंडनला परतलं.

शाळा संपल्यानंतर त्यांनी बर्मिंगहॅम विद्यापीठातून फिलॉसॉफिचं शिक्षण घेतलं आणि लंडनमध्ये अॅडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

Nue सुरू करण्यापूर्वी ज्यूल्स या व्हेजिटेरियन फूड फर्म 'डिटॉक्स किचन'च्या बिझनेस हेड होत्या. Nue च्या सुरुवातीबद्दल बोलताना ज्यूल्स म्हणतात की, तेव्हाही त्यांच्या मनात जराही साशंकता नव्हती.

"मी जर आता कोणताही व्यवसाय सुरू केला असता, तरी त्यावेळी असलेला आत्मविश्वास माझ्यात नसता," ज्यूल्स यांनी म्हटलं.

ज्यूल्स मिलर

फोटो स्रोत, THE NUE CO

फोटो कॅप्शन, ज्यूल्स मिलर

"त्यावेळी माझ्यात एक धीटपणा होता. ज्या गोष्टींबद्दल मला माहिती नव्हती त्याची मी एक यादी बनवायचे. त्याचबरोबर ज्या लोकांकडे माझ्या या प्रश्नांची उत्तरं असतील त्यांच्याही नावांची यादी तयार करायचे आणि मग त्यांना सविस्तर ई-मेल पाठवायचे."

ज्यूल्स यांनी ज्या दोन लोकांशी संपर्क साधला होता, त्यापैकी एक होत्या नताली मसनेट. Net-a-Porter या फॅशन रिटेलच्या संस्थापिका. दुसरे होते अमेरिकेतील फिटनेस फर्म इक्विनोक्सचे हार्वे स्पेवक. या दोघांनीही ज्यूल्स यांच्या मेलला उत्तर दिलं. त्यांना योग्य तो सल्लाही दिला.

Nue नं तयार केलेली पहिली सप्लिमेंट होती- डिब्लोट. पचनसंस्थेच्या ज्या आजारामुळे स्वतः ज्यूल्स त्रस्त झाल्या होत्या, त्यासाठी ही सप्लिमेंट बनवली गेली होती. त्यानंतर व्हिटॅमिन्स आणि स्कीन ट्रीटमेंटसाठी सप्लिमेंट तयार करायला सुरूवात केली.

सुरू झाली तेव्हा कंपनी केंब्रिजमध्ये होती, मात्र त्यानंतर वर्षभरात ही कंपनी न्यूयॉर्कला गेली. डाएटरी सप्लिमेंट्ससाठी युएस हे जास्त मोठं मार्केट असल्यानं हा निर्णय घेतल्याचं ज्यूल्स यांनी सांगितलं.

"जवळपास 80% अमेरिकन हे व्हिटॅमिन किंवा इतर सप्लिमेंट खातात. ब्रिटीश याबाबत जास्त 'ओपन' नाहीयेत."

जागतिक पातळीवर सप्लिमेंटचा व्यवसाय वाढत आहे. गेल्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटलं होतं की, 2026 पर्यंत सप्लिमेंटच्या वार्षिक विक्रीत 210 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ होऊ शकते. 2018 मध्ये सप्लिमेंटच्या व्यवसायातली उलाढाल 125 अब्ज डॉलर्स इतकी होती.

Nue नं 2017 साली वेबसाइटच्या माध्यमातून सप्लिमेंट्सची विक्री सुरू केली. पण आता त्यांची उत्पादनं रिटेलर्सच्या माध्यमातूनही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. न्यूयॉर्कमध्ये Nue चं स्वतःचं एक स्टोअरही आहे.

सध्या या व्यवसायाला 11.5 दशलक्ष डॉलर्सचं फंडिंग मिळालं आहे. कन्झ्युमर गुड्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी युनिलिव्हरचंही फंडिंगही Nueला मिळालं आहे.

मात्र सध्याच्या घडीला ज्यूल्स आणि त्यांचे पती चार्ली गोवर यांच्याकडेच कंपनीचे सर्वाधिक समभाग आहेत. चार्ली हे कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत, तर ज्यूल्स या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

कॅरोलिन पीटन या ब्रिटीश न्यूट्रिशनल थेरपिस्ट आहेत. या प्रॉडक्टमध्ये नेमकं काय आहे, याबद्दल कंपनी बोलत आहे, हे खरंच चांगलं असल्याचं कॅरोलिन यांनी म्हटलं आहे.

"सप्लिमेंटमध्ये ज्या आरोग्यदायी घटकांची अपेक्षा आपल्याला असते, त्याव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो, हे फार कमी लोकांना माहीत असतं," कॅरोलिन म्हणतात.

"त्याबद्दल स्पष्टता असणं हे या इंडस्ट्रीसाठी चांगलं आहे. कमी किमतीच्या उत्पादनांना मागणी जास्त असते. पण काही लोक असतात, जे शुद्ध स्वरुपाच्या उत्पादनांसाठी अधिक पैसे मोजायला हयगय करत नाहीत."

डाएटरी सप्लिमेंट्सची आवश्यकता काय?

जर तुम्हाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्या, असा सल्ला युकेमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसनं दिला आहे. आपण जेव्हा सूर्यप्रकाशात जातो, तेव्हा आपलं शरीर व्हिटॅमिन डी तयार करतं.

औषधं

फोटो स्रोत, Getty Images

पण इतर व्हिटॅमिन आणि मिनरल्सचं काय? केवळ पोषक अन्न खाणं पुरेसं आहे?

ब्रिटीश न्यूट्रिशन फाउंडेशननं याबद्दल म्हटलं आहे, की समतोल आणि चौरस आहारामधून आपल्याला व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर आवश्यक पोषक द्रव्य मिळतात. त्यासोबतच फायबर आणि पॉलिफेनॉल्स सारखे नॅचरल बायोअॅक्टिव्ह कंपाउंडही मिळतात. सप्लिमेंट्स हा आरोग्यदायी आहाराला पर्याय ठरू शकत नाही.

"अर्थात, काही वेळा सप्लिमेंट घेणं आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ- गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास तसंच गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात फॉलिक अॅसिड हे सप्लिमेंट घेतलं जातं."

तुमच्यासाठी कोणतं सप्लिमेंट आवश्यक आहे, हे माहीत करून घेणं गरजेचं आहे, असं ज्यूल्स सांगतात.

Nue नं गेल्यावर्षी मानसिक आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी कँपेनही केलं होतं. "तुम्ही खरंच कसे आहात?" अशी या कँपेनची संकल्पना होती. वेलनेस इंडस्ट्री ही कायम शारीरिक आरोग्याभोवतीच का केंद्रित झालेली आहे, असा प्रश्न या कँपेनमधून विचारण्यात आला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)