You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काबूल विद्यापीठावर अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ला, 19 जण मृत्यूमुखी
सोमवारी अफगाणिस्तानच्या काबूल विद्यापीठात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला. तर 22 लोक जखमी झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
सुरक्षा रक्षकांसोबत जवळपास तासभर झालेल्या चकमकीनंतर या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काबूल विद्यापीठाच्या आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी विद्यापीठात अंधाधूंद गोळीबार केला.
अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला थांबवण्यात यश आलं असून गोळीबार करणाऱ्या तीन अज्ञात बंदूकधाऱ्यांना ठार मारण्यात आलं आहे.
हा हल्ला सरकारी अधिकारी काबूल विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये एका पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी येण्याच्या वेळेस करण्यात आला.
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर्व विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय. ज्यात 10 महिलांचा समावेश असल्याचं काबूल पोलिसांच्या प्रवक्त्यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. त्यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून इस्लामिक स्टेटशी संबंधित संघटनांनी अफगाणिस्तानमध्ये अनेक शिक्षण संस्थांना टार्गेट केलं आहे. गेल्याच महिन्यात ट्युनिशिअन सेंटरच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू झाला होता. याच संघटनेनं 2018 साली काबूल विद्यापीठावर हल्ला केला होता.
सोमवारी झालेल्या हल्ल्याच्या व्हीडिओ फूटेजमध्ये काबूल विद्यापीठातील विद्यार्थी गोळीबार सुरू असताना पळताना पाहायला मिळत होते. काही विद्यार्थ्यांनी गोळीबारापासून बचाव करण्यासाठी भिंतीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. एका हल्लेखोराने स्फोट घडवून आणल्याची माहिती गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
"ते दिसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यावर गोळीबार करत होते. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही त्यांनी गोळीबार केला," असं प्रत्यक्षदर्शी फताउल्ला मोराडी यांनी रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितलं.
23 वर्षाचा विद्यार्थी फैदून अहमदी गोळीबार सुरू झाल्यावेळी आपल्या वर्गात होता.
"आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला असं वाटलं हा आमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. मुलं-मुली ओरडत होते. प्रार्थना करत होते आणि मदतीसाठी याचना करत होते," असं तो AFP या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.
फैदून आणि त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थ्यांना 2 तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)