You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोनी वादळ: फिलिपिन्समध्ये या वर्षातल्या सर्वात शक्तिशाली वादळाचा तडाखा
फिलिपिन्समध्ये सध्या गोनी वादळाने धुमाकूळ घातला आहे. प्रतिताशी 225 किलोमीटर या वेगाने हे वादळ फिलिपिन्सच्या किनाऱ्याला धडकलं आहे. वादळासोबतच इथं जोरदार पाऊसही आहे.
वादळामुळे आतापर्यंत चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर घरं उद्ध्वस्त झाली असून पाणी साचून रस्ते वाहून गेल्याचं सांगितलं जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी कॅटेंडुनस बेटाच्या किनाऱ्यावर गोनी वादळ वेगाने धडकलं. त्यानंतर लुजोनपर्यंत हे वादळ पोहोचलं. फिलिपिन्सची राजधानी मनिला या बेटावरच आहे.
"कॅटेंडुनस बेटवरील विराक या छोट्याशा शहरात धोका अद्याप कायम आहे. तिथं सुमारे 70 हजार नागरिक राहतात. गोनी वादळ आल्यानंतर त्या सर्वांशी संपर्क तुटला आहे," असं बीबीसी प्रतिनिधी हॉवर्ड जॉनसन यांनी सांगितलं.
हवामान विभागाने आपल्या माहितीपत्रात पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा इशारा दिला होता. सोशल मीडियावर येत असलेल्या व्हीडिओंमध्ये घरांवरून छत उडून जात असल्याचं दिसत आहे. स्थानिक प्रशासनाने सध्या तरी वीजपुरवठा बंद केलेला आहे.
मृत चार जणांमध्ये अलबाय प्रांतातील एका 5 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. दोन जण बुडाले तर एकाचा चिखलात वाहून गेल्याने मृत्यू झाला. इतर एका व्यक्तीचा अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाला.
अलबाय प्रांतात राहणाऱ्या 21 वर्षीय फ्रांसिया मेई बोरास यांनी AFP वृत्तसंस्थेशी बोलताना वादळाबाबत माहिती दिली.
वारा अत्यंत भीतीदायक आहे. याचा आवाज घाबरवून टाकणारा आहे. हे वादळ खूप शक्तिशाली आहे, असं त्या म्हणाल्या.
फिलिपिन्समध्ये गोनी वादळ रॉली नावाने संबोधलं जात आहे. हे वादळ 2013 मध्ये आलेल्या हेयान वादळानंतर सर्वात मोठं वादळ मानलं जात आहे. हेयान वादळामुळे त्यावेळी 6 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
फिलिपिन्समध्ये वादळ नेहमीच येत असतात. दरवर्षी सरासरी 20 वेळा याठिकाणी वादळ येतात. गेल्या आठवड्यात आलेल्या मोलावे वादळामुळे 22 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. पण त्या तुलनेत गोनी वादळ प्रचंड शक्तिशाली आहे.
यावेळी कोव्हिड-19 मुळे इथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. फिलिपिन्समध्ये आतापर्यंत 3 लाख 80 हजार 739 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 7221 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
नागरिक सुरक्षा प्रमुख रिकार्डो जॅलाड सांगतात, "सुमारे 3 लाख 47 हजार लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या काही रुग्णांवर तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत उपचार सुरू होते. पण त्यांना आता तिथून हटवण्यात आलं आहे. त्यांची रवानगी सुरक्षित ठिकाणी करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)