आर्मेनिया-अझरबैजान वाद : दोन आठवड्यांच्या भीषण संघर्षानंतर तात्पुरती युद्धबंदी

फोटो स्रोत, EPA
नागोर्नो-काराबाख या प्रदेशावर ताबा मिळवण्यावरून आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध आता थांबणार आहे. जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी रशियाने मध्यस्थी केल्यानंतर तात्पुत्या युद्धबंदीला दोन्ही देशांनी मान्यता दिली आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरॉव यांनी ही माहिती दिली.
रशियाच्या मध्यस्थीनंतर या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये मॉस्कोमध्ये तब्बल 10 तास चर्चा झाली. शनिवारी (10 ऑक्टोबर) दुपारनंतर युद्धबंदी लागू करण्यावर यात एकमत झालं आहे. त्यानंतर दोन्ही देश युद्धात मारल्या गेलेल्या आपापल्या सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेतील आणि युद्धकैद्यांची अदलाबदल करतील.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गैई लॅवराव यांनी म्हटलं की, यानंतर दोन्ही देश शांतता प्रस्थापित करण्याविषयी चर्चा करतील.
नागोर्नो-काराबाख या प्रदेशावरून आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमध्ये दोन आठवड्यांपूर्वी युद्धाला सुरुवात झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही देशांनी समोरासमोर चर्चा केली. दोन्ही देशाचे परराष्ट्र मंत्री या चर्चेत सहभागी झाले होते.
27 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत 300 जवानांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोकांवर घर सोडण्याची वेळ आली.
नागोर्नो-कालाबाख एक डोंगराळ भाग आहे. अधिकृतपणे हा अझरबैजानचा भाग आहे. मात्र, 1994 च्या युद्धानंतर हा भाग आर्मेनियाच्या ताब्यात गेला.
आर्मेनिया आणि अझरबैजान पूर्वीच्या सोव्हिएत संघाचा भाग होते. नागोर्नो-काराबाख प्रदेशावरून या दोन्ही देशांमध्ये 1980 आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातही संघर्ष झाला होता.
त्यानंतर 1994 मध्ये युद्धबंदीची घोषणा झाली. मात्र, शांतता करारावर दोन्ही देशांमध्ये कधीच एकमत झालं नाही.
मॉस्कोमध्ये काय घडलं?
आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात शुक्रवारी (9 ऑक्टोबर) चर्चा सुरू झाली. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
दोन्ही देशांना आपापल्या जवानांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी आणि युद्धकैद्यांच्या अदलाबदलीसाठी युद्धबंदी गरजेची असल्याचं रशियाचे अद्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धबंदी करण्याचं आवाहन करताना म्हटलं होतं.
युद्ध समाप्तीसाठी आर्मेनियाला एक 'शेवटची संधी द्यायला तयार आहोत,' असं चर्चा सुरू करण्यापूर्वी अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी टेलिव्हिजनवरून दिलेल्या संदेशात म्हटलं होतं
मात्र, असं म्हणतानाच अझरबैजानची प्रादेशिक अखंडता पुन्हा स्थापन करणे, हेच आपलं उद्दिष्ट असणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
त्यांनी म्हटलं होतं, "आम्हा सत्याच्या मार्गावर आहोत. आम्ही जिंकतोय. आम्ही आमची जमीन पुन्हा परत घेऊ आणि प्रादेशिक अखंडता पुन्हा स्थापन करू. मात्र, आमची जमिनीवरून माघारी जाण्यासाठी आम्ही आमची जमीन ताब्यात घेणाऱ्यांना शेवटची संधी देऊ इच्छितो."
आर्मेनियामध्ये रशियाचा एक सैन्यतळही आहे. शिवाय, हे दोन्ही देश 'कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन'चे सदस्यही आहेत. मात्र, अझरबैजानच्या सरकारशीही रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
कशी आहे परिस्थिती?
आर्मेनियाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे की शुक्रवारी मॉस्कोमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतरही युद्ध सुरूच आहे.
यापूर्वी गुरुवारी (8 ऑक्टोबर) आर्मेनियाने अझरबैजानच्या नागोर्नो-काराबाखमधल्या एका ऐतिहासिक चर्चवर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप केला होता.

फोटो स्रोत, NurPhoto
नागोर्नो-काराबाखची राजधानी स्तेपनाकियर्तपासून हे चर्च 15 किमी अंतरावर आहे.
आर्मेनियाने आमच्या गांजा आणि गोरनबॉय या शहरांवरही हल्ला चढवला आणि यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप गुरुवारी अझरबैजानने केला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धामुळे नागोर्नो-काराबाखमधून तब्बल निम्मे लोक म्हणजे जवळपास 70 हजार लोक घर सोडून गेलेत.
या भागातलं प्रमुख शहर आणि राजधानी असलेल्या स्तेपनाकियर्तमध्ये अनेक दिवस बॉम्बहल्ले सुरू होते. या बॉम्बहल्ल्यापासून बचावासाठी शहरातल्या लोकांनी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किंवा जमिनीत खंदक खोदून तिथे आश्रय घेतला आहे.
हल्ल्यामुळे शहरातल्या बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

नागोर्नो-काराबाखविषयी
- हा 4,400 चौरस किमीचा डोंगराळ भाग आहे.
- हा भाग आर्मेनियन ख्रिश्चन आणि तुर्क मुस्लीमबहुल आहे.
- सोव्हिएत संघाच्या विघटनापूर्वी हा एक स्वायत्त प्रदेश बनला जो अझरबैजानचा भाग होता.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर हा अझरबैजानचा भाग असल्याचं मानलं जातं. मात्र, इथली बहुतांश लोकसंख्या आर्मेनियन आहे.
- 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत चाललेल्या युद्धात 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी फुटीरतावादी गटांनी काही भागांवर ताबा मिळवला होता.
- 1994 साली युद्धबंदी झाली. मात्र, तेव्हापासून या भागात तणाव कायम आहे.
- तुर्कस्थान उघडपणे अझरबैजानचं समर्थन करतो.
- या भागात रशियाचा एक सैन्यतळही आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























