नोबेल शांतता पुरस्कार यंदा संयुक्त राष्ट्रांच्या WFP म्हणजेच अन्न सुरक्षा कार्यक्रमाला जाहीर

फोटो स्रोत, Reuters
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न सुरक्षा कार्यक्रमाला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
WFP संघटनेने जगभरात भूकबळीविरुद्ध दिलेल्या लढ्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
"WFP संघटनेने भूकबळीच्या समस्येचा शस्त्रासारखा वापर करणाऱ्यांविरुद्ध पूर्ण क्षमतेने लढा दिला," असं नॉर्वेजियन नोबेल कमिटीने पुरस्कार जाहीर करताना म्हटलं.
यामुळे WFP ला 1.1 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे.
नॉर्वेजियन नोबेल इन्स्टीट्यूटचं मुख्यालय असलेल्या ओस्लो येथून 101 व्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
हा आमच्यासाठी 'अभिमानास्पद क्षण' असल्याचं वक्तव्य WFP च्या प्रवक्त्यांनी केलं. WFP संघटनेमार्फत दरवर्षी सुमारे 88 देशांतील 97 मिलियन लोकांची मदत केली जाते.
यंदाच्या वर्षीच्या पुरस्काराने नोबेल कमिटी जगाचं लक्ष कुपोषण आणि भूकबळींच्या समस्येकडे वेधू इच्छिते. लाखो लोकांना या समस्येला तोंड द्यावं लागतं, असं कमिटीच्या अध्यक्ष बेरीट रेईस-अँडरसन म्हणाल्या.
वर्ल्ड फुड प्रोग्रॅमने अन्न सुरक्षेचा वापर शांतता प्रस्थापित करण्यासाठी केला. बहुराष्ट्रीय पातळीवर याची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 211 व्यक्ती आणि 107 संघटना यांना नामांकन मिळालं होतं. नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार नामांकन मिळालेल्यांची यादी पुढील 50 वर्षं प्रकाशित करता येऊ शकत नाही.
नोबेल शांतता पुरस्काराचे विजेते कोण-कोण?
गेल्या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार एथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना देण्यात आला होता. त्यांनी इरिट्रियासोबत केलेल्या शांतता करारामुळे 1998-2000 पासून 20 वर्षं कायम असलेली युद्धजन्य परिस्थिती संपुष्टात आली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 2009 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशांना एकत्र करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
याशिवाय, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (2002), बालशिक्षणासाठी काम करणारी मलाला युसूफजाई (2014), युरोपियन महासंघ(2012), संयुक्त राष्ट्र आणि त्यांचे सचिव कोफी अॅन्नान (2001) आणि मदर तेरेसा (1979) यांना आतापर्यंत नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे.
नोबेल शांतता पुरस्कार म्हणजे काय?
नोबेल पुरस्कार जगातील सर्वांत महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी एक मानला जातो. स्वीडनमधील शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.
हा पुरस्कार पहिल्यांदा 1901 साली देण्यात आला होता. नोबेल पुरस्कार विविध प्रकारच्या गटांमध्ये दिला जातो.
संबंधित क्षेत्रात गेल्या एका वर्षात मानवतेच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी विचार केला जातो.
नोबेलचं विशिष्ट अशा प्रकारचं पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. रोख रक्कम मिळण्यासाठी संबंधित विजेत्यांना एक व्याख्यान द्यावं लागतं.
नोबेल पुरस्कार दरवर्षी दिले जातात, पण दोन महायुद्धांच्या आणि इतर काही वेळा यामध्ये खंड पडला होता. एखाद्या वर्षी कुणीच नोबेल पुरस्कारासाठी पात्र नसल्यास कमिटी तसं जाहीर करते. पुरस्काराची रक्कम पुढील वर्षासाठी राखून ठेवली जाते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)


























