भारत पहिल्यांदा गोळीबार करेल, चीनच्या सरकारी माध्यमांना भीती

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

भारत आणि चीनदरम्यान सीमेवरचा तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण दोन्ही देशांच्या माध्यमांमध्ये ही स्थिती संवेदनशील असल्याचं सांगितलं जात आहे.

याच पार्श्वभूमीवर चीनच्या ग्लोबल टाईम्स या सरकारी वृत्तपत्राने एक बातमी छापली आहे. भारताकडून गोळीबार करण्यात आल्यास परिणाम भोगावे लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

भारताने चीन सीमेवर सैन्यबळ वाढवणं, चीनी सैन्याविरुद्ध झटापट झाल्यास गोळीबाराची परवानगी देणं यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखीनच वाढेल. भारताला याचे परिणाम भोगावे लागतील, असं बातमीत म्हटलं आहे.

भारताने चीनविरुद्धचा तणाव कमी करण्याचं मान्य केलं असताना या घडामोडी घडत असल्याचंही वृत्तपत्रात लिहिलं आहे.

दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर पातळीवर झालेल्या बैठकीत सैन्यबळ न वाढवण्याचा निर्णय झाला होता. पण भारताने आपला शब्द पाळला नाही. यामुळे तणाव वाढत असल्याचंही बातमीत लिहिलं आहे.

तज्ज्ञांचा हवाला देत त्यांनी लिहिलं, "तणाव पाहता चीनला भारताच्या भूमिकेबाबत सावधान राहिलं पाहिजे. कोणत्याही लष्करी कारवाईसाठी तयार राहिलं पाहिजे. भविष्यात सीमेवर ही सामान्य बाब असेल."

भारतीय वृत्तपत्रातील बातमीनंतर प्रतिक्रिया

बातमीत लिहिलेली ही प्रतिक्रिया भारताच्या 'द हिंदू' वृत्तपत्रातील एका बातमीनंतर आली.

भारताने चीनला स्पष्ट संदेश दिला आहे. चीनचे सैनिक पुढे आल्यास भारतीय सैनिक त्यांच्यावर गोळी चालवू शकतात. एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही गोष्ट वृत्तपत्राला सांगितली, असं बातमीत म्हटलं आहे.

"जास्त जवळ याल तर आम्ही गोळी चालवू, असं आम्ही आता चीनला सांगितलं आहे. सैनिकांना स्वयं-संरक्षणासाठी गोळी चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

गेल्या काही दिवसांत पूर्व लडाखमध्ये पेंगाँग तलावाजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अनेकवेळा हवेत गोळीबार झाला.

भारत आणि चीनदरम्यानच्या सहाव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही देशांनी सीमेवर जास्त सैनिक पाठवू नयेत, यावर सहमती झाली.

भारत सीमेवर आपलं सैन्यबळ कायम ठेवेल, चीन आधी पुढे आला होता. त्यामुळे त्यांनी आधी मागे हटावं, अशी आमची भूमिका आहे, असं भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

ग्लोबल टाईम्सच्या या बातमीनंतर बीजिंगच्या चिंगहुआ युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञ कियान फेंग सांगतात, "भारताने सीमावर्ती भागात बांधकामं आणि लष्करी तयारी कधीच थांबवली नाही."

भारताने पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर दोन-तीन लाख सैनिक तैनात करून ठेवले आहेत, असा दावाही त्यांनी केला.

'द हिंदू' वृत्तपत्राच्या बातमीवर आधारित इतर अनेक लेख लिहिण्यात आले आहेत.

भारताकडूनच पहिली गोळी चालवली जाईल, अशी शक्यता एका लेखामध्ये वर्तवण्यात आली आहे.

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जून महिन्यात गलवान घाटीत झटापट झाली होती. यामध्ये 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला.

चीनने आपल्या सैनिकांच्या मृत्यूंची संख्या जाहीर केली नव्हती. पण ग्लोबल टाईम्सने नुकतेच चीनी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

कशाबाबत होती सहमती?

भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर कोअर कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांची सहा टप्प्यांत बातचीत झाली होती. त्यानंतर 22 सप्टेंबरला संयुक्त पत्रक जारी करण्यात आलं होतं.

दोन्ही देश सीमेवर सैनिक पाठवणं बंद करतील, असं त्या पत्रकात म्हटलं होतं.

"दोन्ही देशांतील नेत्यांना चर्चेदरम्यान सहमती लागू करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी गांभीर्याने करणं आवश्यक आहे. गैरसमज टाळावेत. तसंच सीमेवर सैनिकांची संख्यासुद्धा आता वाढवू नये. कोणताही देश सीमेवर एकतर्फी बदल किंवा छेडछाड करणार नाही. परिस्थिती आणखी बिघडेल असं कोणतंच पाऊल उचलू नये. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) जैसे थे स्थिती कायम राखण्यावर भर द्यावा," असं लष्करी कमांडर पातळीवर बातचीत झाल्यानंतर संयुक्त पत्रकात सांगितलं होतं.

याशिवाय LAC वर कोणतीही बांधकामं करण्यात येऊ नयेत, असंही चर्चेदरम्यान सांगण्यात आलं. पण द हिंदूच्या संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनपर्यंत सैनिक मागे हटवण्याबाबत एकमत होऊ शकलेलं नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)