You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी: 'संयुक्त राष्ट्राच्या निर्णयप्रक्रियेपासून भारताला कधीपर्यंत दूर ठेवणार?'
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना बदलांची गरज व्यक्त केली आहे.
मोदी म्हणाले, "गेल्या 8-9 महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य संकटाशी झुंज देत आहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न होत असताना संयुक्त राष्ट्रसंघ काय करत आहे? प्रभावपूर्ण प्रतिसाद कुठे आहे?"
"जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश या नात्याने मी संपूर्ण जागतिक समुदायाला आणखी एक आश्वासन देतो की, भारताची लस उत्पादन आणि लस वितरण क्षमता संपूर्ण मानवतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काम करेल," असं म्हणत मोदींनी इतर देशांना आश्वस्त केलं.
साथीच्या रोगाच्या या कठीण काळातही भारतातील औषध उद्योगाने 150 हून अधिक देशांना जीवनावश्यक औषधे पाठवली आहेत, असंही मोदी म्हणाले.
पाकिस्तानचा उल्लेख टाळला
शुक्रवारी (25 सप्टेंबर) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा उल्लेख केला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात पाकिस्तानवर भाष्य करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मोदींनी पाकिस्तानचा कुठेही उल्लेख केला नाही.
दहशतवादाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, "भारताचा आवाज मानवता, मानव आणि मानवी मूल्यांचे शत्रू असलेल्या दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थ, मनी लाँडरिंग याविरोधात उठेल."
संयुक्त राष्ट्रसंघात मोठ्या भूमिकेसाठी भारताचे समर्थन
संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, "संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुधारणेसाठी सुरू असलेली प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतिक्षा भारतातील जनता अनेक वर्षांपासून करत आहे. ही प्रक्रिया तर्कशुद्ध टोकापर्यंत पोहोचेल की नाही याची भारतातील लोकांना चिंता आहे. भारताला कधीपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णय प्रक्रियेपासून बाजूला ठेवले जाईल?"
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- "जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश, जगाची 18 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेला देश, शेकडो भाषा, शेकडो बोलीभाषा, अनेक पंथ, अनेक विचारधारा असलेला देश."
- "भारताने धाडसी सैनिकांना 50 शांतता मोहिमांमध्ये पाठवले. भारताने आपल्या बहुसंख्य शूर जवानांना गमावले आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील योगदान पाहता भारत त्याच्या भूमिकांकडेही लक्ष देत आहे."
- "ज्या देशाने अनेक वर्षांपर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेचे नेतृत्व आणि अनेक वर्षांची गुलामी असे दोन्ही पाहिले आहे. ज्या देशातील बदलांचा परिणाम जगाच्या मोठ्या भागांमध्ये होतो, त्या देशाला अखेर कधीपर्यंत वाट पाहावी लागणार?"
- "जगातील सर्वात मोठी लोकशाही बनण्याच्या प्रतिष्ठेचा आणि अनुभवाचा उपयोग आम्ही जागतिक हितासाठी करू. आमचा मार्ग जनकल्याणापासून जगकल्याणाचा आहे. शांतता, सुरक्षितता आणि समृद्धीसाठी भारताचा आवाज कायम उठेल."
मोदींनी कामगिरीचा पाढा वाचला
पंतप्रधान मोदींनी सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर भारताच्या कामगिरींचाही पाढा वाचला. ते म्हणाले, "40 कोटी लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडून भारताने करून दाखवले. 60 कोटी लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त केले. अवघ्या 4-5 वर्षांत 40 कोटींहून अधिक लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडणं सोपं नव्हतं. पण भारताने हे करून दाखवलं. केवळ 4-5 वर्षांत 60 कोटी लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त करणेही सोपे नव्हते. पण भारताने करून दाखवले."
"आज भारत आपल्या गावांतील 15 कोटी कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने आपल्या सहा लाख गावांना ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबरशी जोडण्यासाठी एक मोठी योजना सुरू केली," असं मोदी म्हणाले.
तसंच, "महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भारत हा असा देश आहे जिथे महिलांना प्रसूतीसाठी 26 आठवड्यांची पगारी रजा दिली जात आहे," असंही मोदींनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)