You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना टेस्ट : आता फक्त दीड तासात करा चाचणी
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
आता कोणत्याही विशिष्ट प्रयोगशाळेत न जाता कोरोनाची अचूक चाचणी करणं शक्य होणार आहे. शिवाय, नव्या रॅपिड टेस्टच्या मदतीने कोरोना व्हायरसची लागण झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी आता फक्त दीड तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लंडनमधील इंपिरियल कॉलेजमध्ये याबाबत एक संशोधन करण्यात आलं आहे. यामध्ये सध्याच्या परंपरागत कोरोना चाचणीसारखेच निष्कर्ष दिसून आले.
कोरोनाच्या नव्या दीड तासांच्या चाचणीसाठी नवीन उपकरणाची गरज आहे. हे उपकरण लंडनच्या आठ सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवून देण्यात आलं आहे.
पण, या टेस्टची विश्वासार्हता किती, याबाबत काही तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
नवं उपकरण डीएनए नज या कंपनीने तयार केलेलं आहे. याचा वापर करून कोणीही कोरोना चाचणी करू शकतो. यासाठी फक्त नाकातून किंवा घशातून द्रव (स्वॅब) काढता येणं आवश्यक आहे.
या छोट्याशा उपकरणाचा आकार एका बुटाच्या बॉक्सइतका आहे. यामध्ये स्वॅब एका निळ्या डिस्पोझेबल आवरणाच्या आत ठेवावं लागतं. यामध्ये परीक्षणासाठी आवश्यक असे रसायन असतात.
त्यानंतर हे आवरण बॉक्समध्ये आवश्यक ठिकाणी ठेवल्यानंतर चाचणीची प्रक्रिया सुरू होते.
लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय प्रकाशनामध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.
डीएनए नजने आणि प्रयोगशाळेने केलेल्या 386 चाचण्यांचे निष्कर्ष यादरम्यान जुळवण्यात आले. ते समान असल्याचं आढळल्यानंतर हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं.
"उपकरणाची कामगिरी चांगली होती. आम्ही तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेने नवं काहीतरी करण्यासाठी करत आहोत, याची आता खात्री पटली आहे," असं इंपिरियल कॉलेजचे प्राध्यापक ग्रॅहम कूक म्हणाले.
इतर बऱ्याच चाचण्यांमध्ये वेग आणि अचूकता यांच्यापैकी एकाची निवड करणं आवश्यक होतं. पण आम्ही दोन्ही गोष्टी एकत्रितपणे प्राप्त केल्या, असंही ते सांगतात.
प्रयोगशाळेत केलेलं परीक्षण आणि रॅपिड टेस्टमध्ये केलेलं परीक्षण जवळपास सारखंच होतं, असं त्यांनी सांगितलं.
युके सरकारने पाच हजार नजबॉक्स उपकरणांची ऑर्डर दिली आहे. तसंच 58 लाख डिस्पोझेबल आवरणंही त्यांनी मागवले आहेत.
पण या उपकरणाच्या मदतीने एका वेळी एकच चाचणी होऊ शकते, ही एक प्रकारे त्याची कमकुवत बाजू म्हणावी लागेल.
कारण दिवसभरात एका मशीनच्या मदतीने जास्तीत जास्त 16 चाचण्या केल्या जाऊ शकतात.
एखाद्या विशिष्ट वैद्यकीय कारणामुळे तुम्हाला अत्यंत तातडीने चाचणी करणं आवश्यक असेल, तर हे उपकरण तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतं, असं कुक सांगतात.
गेल्या आठवड्यात एका रुग्णाची अशीत तातडीची चाचणी करण्यात आली. तो पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्यावर आता उपचार करण्यात येत आहेत. त्याला डेक्सामेथासोन आणि रेमडेसिवीर यांच्यासारखी औषधं द्यावी लागली, असंही त्यांनी सांगितलं.
भविष्यात रुग्णालयांना या उपकरणाचा चांगला उपयोग होणार आहे. ते रुग्णाला कोणत्या विषाणूची बाधा झाली, याची माहिती तत्काळ मिळवू शकतात.
चाचण्यांच्या संख्येबाबत थोड्याफार मर्यादा असू शकतात. सध्याच्या काळात एकाच दिवशी लाखो चाचण्या करण्याची गरज आहे. अशा स्थितीत या उपकरणांची मदत तोकडी पडण्याचीही शक्यता आहे.
प्रा. लॉरेन्स यंग युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविकमध्ये कार्यरत आहेत. ते या संशोधनाचा भाव नव्हते. पण नव्या उपकरणात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.
"कमीत कमी वेळेत चाचणी करण्यासाठी कोव्हीडनज चाचणी अत्यंत फायदेशीर ठरेल. कोरोनाचा प्रसार होत असताना तातडीने रुग्णांची ओळख पटवून त्यांना रुग्णालयापर्यंत आणण्यासाठी ही चाचणी उपयोगाची ठरेल, पण मोठ्या संख्येने चाचण्या घेण्यासाठी ही पद्धत थोडी कमी पडेल," असं लॉरेन्स यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)