You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस संसर्ग: जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं गाठला 3 कोटींचा टप्पा, टॉप-3 देशात भारताचा नंबर
कोरोना रुग्णांच्या जगभरातील संख्येनं तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केलीय.
जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 9 लाख 40 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रसार अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन देशात झाला आहे. मात्र, युरोपमध्ये कोरोनाची पुन्हा लाट येण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूकेमध्ये पुन्हा काटेकोर नियमांसाठी पावलं उचलली जात आहेत. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी कमी कालावधीसाठी बंधनं घातली जातील.
दुसरीकडे, इस्रायलमध्ये पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. विकसित देशांपैकी इस्रायल पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणारा दुसरा देश ठरलाय.
कुठल्या देशाला सर्वाधिक फटका?
कोरोनाची जगभरातील सध्याची आकडेवारी पाहता, अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत. 60 लाखांपेक्षा अधिक रुग्ण एकट्या अमेरिकेत असून, 1 लाख 97 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील जुलैपर्यंतची आकडेवारी पाहात, गेल्या दीड महिन्यात तुलनेने रुग्णसंख्या कमी होत आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
भारतात मात्र रुग्णसंख्या वाढीची रोजची आकडेवारी लाखाच्या जवळ पोहोचलीय. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचलाय.
तिसऱ्या स्थानी ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये 44 लाखांहून अधिक रुग्णसंख्या असून, सुमारे 1 लाख 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 50 लाखांहून अधिक
भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 51 लाख 18 हजार 253 एवढी झाली आहे. ही आकडेवारी 17 सप्टेंबर 2020 च्या सकाळी 8 वाजेपर्यंतची आहे. 17 सप्टेंबरच्या या आकडेवारीत तब्बल 97 हजार 894 रुग्णसंख्येनं वाढ झाली.
भारतात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. आजवर 40,25,079 रुग्ण बरे झाले आहेत, तर 10,09,976 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 83 हजार 198 रुग्ण दगावले.
भारतातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले पाच राज्य :
- महाराष्ट्र - 11,21,221
- आंध्र प्रदेश - 5,92,760
- तामिळनाडू - 5,19,860
- कर्नाटक - 4,84,990
- उत्तर प्रदेश - 3,30,265
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)