You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
योशिहिदे सुगा: शेतकऱ्याचा मुलगा झाला जपानचा पंतप्रधान
योशिहिदे सुगा जपानचे नवे पंतप्रधान असणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शिंजो आबे यांनी राजीनामा दिला होता. जपानमधील सत्ताधारी पक्षाने शिंजो यांच्या जागी योशिहिदे यांची निवड केली.
71 वर्षीय योशिहिदे हे आबे यांचे निकटवर्तीय मानले जातात. आबे यांचीच ध्येयधोरणं ते पुढे कायम सुरू ठेवतील असा होरा आहे.
सुगा यांना 534 पैकी 377 मतं मिळाली आणि त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली.
बुधवारी संसदेत मतदान होईल. मात्र सत्ताधारी पक्षाचं बहुमत लक्षात घेता योशिहिदे यांचं पंतप्रधानपदी विराजमान होणं औपचारिकता मानलं जात आहे.
जपानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पुढच्या वर्षी अर्थात सप्टेंबर 2021मध्ये होणार आहेत.
कोण आहेत सुगा?
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याचा मुलगा असलेले सुगा हे राजकारणात प्रदीर्घ काळ वावरणाऱ्या कुटुंबीयांच्या तुलनेत वेगळे ठरतात.
टोकियोमधल्या होसेई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर सुगा यांनी लगेचच संसदीय निवडणुकीच्या प्रचाराचं काम हाती घेतलं.
लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदाराचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
1987 मध्ये त्यांची योकोहामा सिटी काऊन्सिलसाठी निवड झाली. 1996 मध्ये पहिल्यांदा जपानच्या संसदेत खासदार म्हणून निवडून गेले.
2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जुनिचिरो कोइजुमी यांच्या मंत्रिमंडळात अंतर्गत प्रकरणं आणि दूरसंचार खात्याचे ते वरिष्ठ उपमंत्री होते.
शिंजो आबे यांनी सुगा यांना तीन कॅबिनेट पोस्ट देऊन वरिष्ठ मंत्रीपद दिलं. 2007 पर्यंत सुगा ही जबाबदारी हाताळत होते.
शिंजो आबे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. 2012 मध्ये आबे पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी सुगा यांच्याकडे मुख्य कॅबिनेट सचिव हे पद सोपवलं.
गेल्या आठ वर्षात शिंजो यांचा उजवा हात असल्याप्रमाणे ते कार्यरत होते. दिवसातून दोनदा मीडिया ब्रीफिंगच्या निमित्ताने ते चर्चेत असत. जपानच्या जटिल नोकरशाहीच्या नियमनाची धुराही त्यांच्याच खांद्यावर होती.
प्रशासनाचा चेहरा म्हणून सुगा यांची जपानमध्ये ओळख निर्माण झाली. सम्राट अकिहितो यांच्यानंतर 2019 मध्ये नव्या राजघराण्याचं नाव काय असावं याचा निर्णयही सुगा यांनी घेतला होता. नवे सम्राट नरुहितो यांच्या नेतृत्वाखालील राजघराण्याला सुगा यांनी रिवा असं नाव दिलं. रिवा याचा अर्थ सुंदर सद्भभाव.
सुगा यांनी यासंदर्भात घोषणा केली आणि यामुळे त्यांना 'अंकल रिवा' असं म्हटलं जाऊ लागलं.
28 ऑगस्ट रोजी शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव राजीनामा दिला तेव्हाच सुगा त्यांचे उत्तराधिकारी असतील असं मानलं जात होतं.
2 सप्टेंबरला सुगा यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. मात्र त्याआधीच पक्षातील बहुतांश नेत्यांनी सुगा यांना समर्थन दिलं होतं.
14 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत सुगा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पक्षातल्या विशिष्ट अशा गटाचे ते नेते नाहीत, त्यांना राजकीय वारसा मिळालेला नाही.
शिंजो आबे यांनी प्रदीर्घ काळ स्थिर सरकार दिलं. त्यांच्या धर्तीवर सुगा हेही जपानला मिळालेलं स्थिर सरकार पुढे नेतील.
आबे यांचं आर्थिक धोरण जे आबेनॉमिक्स या नावाने ओळखलं जातं तेच पुढेही राबवलं जाईल असं सुगा यांनी स्पष्ट केलं. आबे यांनी हे धोरण खुलं वातावरण, संघटनात्मक सुधारणा आणि राजकोषाकडून प्रोत्साहन या बळावर बनवलं होतं.
युद्धानंतर जपानच्या संविधानात शांतीसंदर्भातील बदल हे आबे यांच्याप्रमाणे सुगा यांचेही उद्दिष्ट असणार आहे. सेल्फ डिफेन्स फोर्सला वैधता मिळू शकेल.
तूर्तास कोरोना संकटामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणणं हे सुगा यांच्यासमोरचं आव्हान आहे.
कोरोना चाचणी वाढवण्यावर त्यांचा भर आहे आणि जून 2021पर्यंत लस उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.
कृषी क्षेत्राला चालना आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विदेश नीतीसंदर्भात अमेरिका-जपान सहकार्यावर भर देणं हेच त्यांचं प्राधान्य असणार आहे. स्वतंत्र इंडो-पॅसिफिक असावं असाही त्यांचा विचार आहे.
चीनबरोबर स्थिर संबंध ठेवणं हेही त्यांचं उद्दिष्ट आहे.
1970 आणि 1980च्या दशकात उत्तर कोरियाकडून जपानच्या नागरिकांचं अपहरणाचं प्रकरण मार्गी लावण्याचा त्यांचा मनोदय आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्याबरोबर अटींविना बैठक करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)