कोरोना व्हायरस : मिस इंग्लंडचा मुकूट उतरवून 'ती' परतली डॉक्टरी पेशात

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भाषा मुखर्जी...2019 ची मिस इंग्लंड. पण कोरोनाचं वाढतं संकट पाहून भाषा मुखर्जीनं काही काळासाठी आपला 'मिस इंग्लंड'चा मुकुट बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मूळची डॉक्टर असलेली भाषा काही काळ पुन्हा रुग्णसेवा करताना दिसेल.

भारतीय वंशाची भाषा मुखर्जी ब्रिटिश नागरिक आहे. तिचं बालपण कोलकात्यात गेलं. ती 9 वर्षांची असताना तिचे कुटुंबीय ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऑगस्ट 2019 ला भाषाने 'मिस इंग्लंड'चा किताब जिंकला.

मिस इंग्लंड निवडण्यात आल्यानंतर भाषा जगभरात ठिकठिकाणी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत आहे. मागच्या आठवड्यातच ब्रिटनला परतल्याचं तिने सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.

मिस इंग्लंडचा किताब जिंकण्यापूर्वी भाषा बोस्टनच्या पिलग्रिम हॉस्पिटलमध्ये ज्युनियर डॉक्टर होती. ती श्वसनरोग तज्ज्ञ आहे.

इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे तिने पुन्हा डॉक्टरकीच्या सेवेत परतण्याचा निर्णय घेतला. देशाला तिची गरज असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं भाषाने मुलाखतीत सांगितलं.

भाषाने फॉक्स न्यूजशीही संवाद साधला होता.

तिनं म्हटलं, "हा काही कठीण निर्णय नव्हता. मी आफ्रिका, टर्कीला गेले होते. भारतासह इतर आशियाई देशांमध्ये फिरले. आणखी काही देशांना भेट देण्याचंही नियोजन होतं. पण कोरोना व्हायरसमुळे माझा प्रवास मला थांबवावा लागला. मला माहीत होतं, की माझ्यासाठी सर्वात चांगली जागा आता हॉस्पिटलच असेल."

भाषा मुखर्जी जगभरातील विविध देशांचा प्रवास करत असताना इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरस हात-पाय पसरत होता.

भाषा सांगते, "मला मित्र-मैत्रिणींकडून व्हायरसबाबत माहिती मिळत होती. देशात परतल्यानंतर सर्वप्रथम पूर्वी काम करत असलेल्या हॉस्पिटलशी संपर्क साधला. तिथं डॉक्टर म्हणून पुन्हा आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली."

सध्यातरी परदेश प्रवास करून आल्यामुळे भाषा मुखर्जी 15 दिवसांसाठी क्वारंटाईन कक्षात आहे. हे संपल्यानंतर ती आपलं काम सुरू करू शकेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)