You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
U19 वर्ल्ड कप: वर्ल्ड कप गाजवणारे टीम इंडियाचे शिलेदार
बांगलादेशने गतविजेत्या टीम इंडियाला पराभवाचा धक्का देत पहिल्यावहिल्या U19 वर्ल्ड कप जेतेपदावर नाव कोरलं. परंतु टीम इंडियाच्या शिलेदारांनी दमदार परफॉर्मन्ससह हा वर्ल्ड कप गाजवला.
1. यशस्वी जैस्वाल
सेमी फायनलच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध यशस्वी जैस्वालने दिमाखदार शतकी खेळी साकारली होती. या खेळीच्या बळावरच भारतीय संघाने पाकिस्तानला नमवत वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली.
गेल्या वर्षी झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत यशस्वीने द्विशतकी खेळी रचली होती. या द्विशतकाने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष यशस्वीकडे वेधलं. मात्र इथपर्यंतचा यशस्वीचा प्रवास संघर्षमय होता.
यशस्वी मूळचा उत्तर प्रदेशातील भद्रोही जिल्ह्यातील. यशस्वीचे वडील रंगविक्रीचा व्यवसाय करतात. यशस्वीसह चार मुलं, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. 2011 मध्ये यशस्वी मुंबईत आला त्यावेळी परिस्थिती बेताचीच होती. त्याने काही दिवस आझाद मैदानातल्या तंबूत राहून काढले. पाणीपुरी विकण्याचंही काम केलं. मात्र यशस्वीची क्रिकेट आवड जराही कमी झाली नाही.
प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी यशस्वीमधलं नैपुण्य हेरलं आणि त्याला मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशात झालेल्या आशियाई U19 स्पर्धेत यशस्वीने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
यशस्वीच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत यंदाच्या आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने यशस्वीला 2 कोटी 40 लाखांची बोली लावत ताफ्यात समाविष्ट करून घेतलं. आयपीएल 2020 स्पर्धेत यशस्वीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तसंच भारतीय दिग्गज खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळेल.
वर्ल्ड कप स्पर्धेत ओपनर या नात्याने यशस्वीवर मोठी जबाबदारी होती. 5 मॅचेसमध्ये 312 धावांसह यशस्वी स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. एक शतक, 3 अर्धशतकं आणि सर्वाधिक धावा यामुळे यशस्वी मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारासाठी प्रमुख दावेदार आहे.
2. प्रियम गर्ग
प्रियम गर्गची बॅट वर्ल्ड कप स्पर्धेत तळपली नसली तरी प्रियमच्या सक्षम नेतृत्वामुळेच टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे.
प्रियमने U14 आणि U16 संघांसाठी खेळताना खोऱ्याने धावा केल्या. उत्तर प्रदेशसाठी खेळतानाही प्रियमची कामगिरी दमदार अशी आहे.
मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मुक्त चंद आणि पृथ्वी शॉ यांच्या नेतृत्वाप्रमाणे भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याची संधी प्रियमकडे आहे.
आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने 1.9 कोटी रुपये खर्च करत प्रियमला संघात समाविष्ट केलं.
3. रवी बिश्नोई
जयपूरच्या रवी बिश्नोईने आपल्या जादूई फिरकीच्या बळावर वर्ल्ड कप स्पर्धेत भलाभल्या बॅट्समनला तंबूची वाट दाखवली आहे. U14, U15, U16 अशा विविध टप्प्यांवर रवीने गुणकौशल्य सिद्ध केलं. मात्र राजस्थान संघात निवड होत नसल्याने रवी आणि त्याचे कुटुंबीय नाराज झाले होते. प्रशिक्षक शाहरुख पठाण आणि माजी खेळाडू दिशांत याग्निक यांच्या प्रयत्नांमुळे रवीला अखेर संधी मिळाली.
वर्ल्ड कप स्पर्धेत रवीने आपल्या फिरकीच्या बळावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दडपणाच्या अंतिम लढतीत जेमतेम 177 धावांचा बचाव करताना रवीने बांगलादेशच्या बॅट्समनना जाळ्यात फसवलं.
4. अथर्व अंकोलेकर
वडिलांकडून क्रिकेटचा वारसा मिळालेल्या अथर्वने संघर्षमय वाटचाल करत हा टप्पा गाठला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या U19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत अथर्वने पाच विकेट्स पटकावत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला होता.
अथर्व मुंबईत अंधेरी परिसरात राहतो. पार्ले टिळक इंग्रजी माध्यम शाळेत आणि आता रिझवी महाविद्यालयातर्फे क्रिकेट खेळतो.
दहा वर्षांपूर्वी अथर्वचे बाबा गेले, मात्र त्यांचा क्रिकेटचा वारसा या परिसरात नॉट आऊट आहेच. वाडीतल्या या मुलांनी एकत्र येऊन काही दिवसांपूर्वी आमच्या परिसरात क्रिकेट स्पर्धा भरवली होती. अथर्वच्या बाबांच्या स्मरणार्थ करंडक देण्यात आला. अथर्वच्या घरीच ती ट्रॉफी ठेवली आहे. भारतीय संघाचा भाग असल्याने अथर्व त्यावेळी घरी येऊ शकला नाही.
अथर्वचे बाबा गेले तेव्हा वैदेही अंकोलेकर या घरीच ट्यूशन्स घ्यायच्या. मात्र त्यानंतर घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. त्या मरोळ डेपोत कंडक्टर म्हणून रुजू झाल्या. मरोळ डेपोचा व्याप मोठा आहे. इंडस्ट्रिअल भाग आहे, त्यामुळे जॉब करणं सोपं नाही. त्यातूनच तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. त्यांनी सकाळची ड्युटी घेतली आहे, जेणेकरून दुपारनंतरचा वेळ घरच्यांसाठी देता येतो.
सुरेन अहिरे आणि दिवाकर शेट्टी सरांनी मदत केली. निलेश पटवर्धन, चंदू भाटकर, प्रशांत शेट्टी यांचं मार्गदर्शन मिळालं. अरू पै सरांचं योगदान मोलाचं आहे. त्यांनी स्वत:च्या मुलासारखी अथर्वची काळजी घेतली असं अथर्वच्या आईने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
5. ध्रुव जुरेल
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल मूळचा ताजमहाल नगरी आग्र्याचा. परंतु चांगल्या संधीच्या शोधात ध्रुव नोएडात आला. सेक्टर 34 मधल्या वंडर्स क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षक फूलचंद शर्मा यांनी ध्रुवच्या गुणकौशल्यांना पैलू पाडण्याचं काम केलं. उत्तम विकेटकीपिंग आणि आक्रमक बॅटिंग यामुळे ध्रुव टीम इंडियाचा अविभाज्य घटक आहे.
नियमित कर्णधार प्रियम दुखापतीमुळे उपलब्ध नसताना ध्रुवकडे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुराही सोपवण्यात आली होती. U14, U16, U19 संघांसाठी खेळताना सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच मधल्या फळीत बॅटिंग आणि कीपिंग अशा दुहेरी आघाड्यांवर ध्रुवने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
6. आकाश सिंग
राजस्थानमधील भरतपूर इथलं नंगला रामरतन हे टीम इंडियाचा फास्ट बॉलर आकाश सिंग याचं गाव. वडील शेतकरी आणि आई गृहिणी आणि चार भावंडं असं कुटुंब.
2012 पासून आकाशने व्यावसायिक पातळीवर क्रिकेट खेळायला बिकानेर इथून सुरुवात केली. प्रशिक्षक विवेक यादव यांनी आकाश यांनी बॉलिंगमधील खाचाखोचा शिकवल्या. फिटनेसबाबत अतिशय जागरुक असणारा आकाश जंक फूडच्या आहारी जात नाही.
वर्ल्ड कपमध्ये फास्ट बॉलिंगसाठी पोषक अशा खेळपट्ट्यांवर आकाशने सातत्याने विकेट्स मिळवत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
7. सुशांत मिश्रा
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुशांतने वर्ल्ड कप स्पर्धेत मोक्याच्या क्षणी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
दहावीच्या परीक्षेत 88 टक्के मिळूनही सुशांतने क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. सततच्या स्पर्धा आणि सरावामुळे सुशांतला बारावीची परीक्षा देता आलेली नाही.
सत्यम कुमार यांच्याकडून सुशांतने क्रिकेटचे बारकावे समजून घेतले. राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा किताब सुशांतने पटकावला. दोन वर्षांपूर्वी सुशांतच्या खांद्याला दुखापत झाली. ऑपरेशन करावं लागल्यामुळे सुशांत साधारण 8 महिने क्रिकेटपासून दूर होता. मात्र त्याने जिद्दीने पुनरागमन केलं.
दक्षिण आफ्रिकेतल्या फास्ट बॉलिंगसाठी अनुकूल अशा खेळपट्यांवर सुशांतने इनस्विंग आणि आऊटस्विंग बॉलिंग करत बॅट्समननला अडचणीत टाकलं आहे.
8. शाश्वत रावत
देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील हरिद्वार हे शाश्वतचं मूळ गाव. डेहराडूनमध्ये महाराणा प्रताप महाविद्यालयात शाश्वतचं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं.
प्रशिक्षक पवन पाल यांच्या मार्गदर्शनाखाली शाश्वतने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. काही काळानंतर शाश्वत बडोदा संघाकडून खेळला.
9. तिलक वर्मा
हैदराबादचा उंचपुरा तिलक वर्मा दिमाखदार बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. वयोगट स्पर्धांमध्ये खोऱ्याने धावा करत तिलकने वर्ल्ड कप संघात स्थान पटकावलं. लिंगमपल्ली परिसरात प्रशिक्षक सलाम बयाश यांच्या मार्गदर्शनाखाली तिलकने बॅटिंग कौशल्यं अधिक धारदार केली. हाय बॅकलिफ्टसह खेळणाऱ्या तिलकने गेल्या हंगामात रणजी पदार्पणही केलं आहे. सुरेश रैना हा तिलक वर्माचा आवडता खेळाडू आहे. क्रिकेटच्या बरोबरीने अभ्यासावरही लक्ष केंद्रित कर हा रैनाचा सल्ला प्रमाण मानून तिलक वाटचाल करत आहे.
10. सिद्धेश वीर
वर्ल्ड कप पूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या चौरंगी मालिकेदरम्यान दिव्यांश जोशीला दुखापत झाल्याने सिद्धेश वीरचा टीम इंडियात समावेश करण्यात आला. सिद्धेश ऑलराऊंडर असून वर्ल्ड कपदरम्यान त्याने वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
सिद्धेश पुणे जिल्ह्यातल्या नऱ्हे गावचा असून, सध्या तो सिंहगड कॉलेजमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेत आहे. सिद्धेशने महाराष्ट्र संघाचं U14, U16, U19 पातळीवर प्रतिनिधित्व केलं असून बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाड्यांवर चमक दाखवली आहे.
वडील अशोक यांनी वकिली बाजू ठेवत सिद्धेशच्या क्रिकेट करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. नेहरू स्टेडियम, केडन्स अकादमी आणि आता सिद्धेश पीवायसी हिंदू जिमखाना इथे सिद्धेश सराव करतो. निरंजन गोडबोले हे सिद्धेशचे प्रशिक्षक आहेत.
11. कार्तिक त्यागी
उत्तर प्रदेशातल्या हापूर जिल्ह्यातल्या धनौरा गावातील शेतकरी योगेंद्र त्यागी यांचा कार्तिक हा मुलगा. योगेंद्र यांचं गहू, बटाटे आणि फ्लॉवरच्या शेतीकडे लक्ष असतं. आपली नेमकी जमीन किती याची कार्तिकला कल्पनाही नाही हे योगेंद्र यांना माहिती आहे मात्र त्याची त्यांना चिंता वाटत नाही. कारण कार्तिकचं संपूर्ण लक्ष क्रिकेटवर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट्स घेत कार्तिकने आपली योग्यता सिद्ध केली. आपल्या मुलाने शेती करू नये, फास्ट बॉलरच व्हावं असं योगेंद्र यांना वाटतं. मेरठमधल्या सिटी व्होकशनल पब्लिक स्कूल इथे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत विपीन वत्स यांनी कार्तिकची गुणवत्ता हेरली. शिकत असलेल्या गुणकौशल्यांचा शिताफीने उपयोग करत कार्तिकने वयोगट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. दोन वर्षांपूर्वी त्याने उत्तर प्रदेश रणजी संघात पदार्पण केलं.
12. शुभांग हेगडे
वडील समर्थ हेगडे यांच्याकडून क्रिकेटचा वारसा मिळालेला शुभांग मूळचा कर्नाटकचा. फिरकीपटू, अफलातून फिल्डर आणि संकटसमयी कामी येणारा खेळाडू अशी शुभांगची ओळख आहे. सध्या तो बेंगळुरूमधल्या सेंट जोसेफ कॉमर्स कॉलेजमध्ये शिकतो आहे. इरफान सैट यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांग सराव करतो.
फास्ट बॉलर म्हणून सुरुवात करणाऱ्या शुभांगने नंतर स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शुभांगने कर्नाटकसाठी पदार्पण केलं. डॅनियल व्हेटोरी आणि नॅथन लियॉन यांच्या बॉलिंगमधून शुभांग शिकत असतो.
13. कुमार कुशाग्रा
झारखंडचा कुमार कुशाग्रा टीम इंडियाचा सगळ्यात लहान वयाचा सदस्य आहे. 15 वर्षांचा कुशाग्रा टीम इंडियाचा बॅकअप विकेटकीपर बॅट्समन आहे.
14. विद्याधर पाटील
कर्नाटकचा
15. दिव्यांश सक्सेना
अभ्यासात अतिशय हुशार असा दिव्यांश मैदानातही आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहे. दहावीत 80 टक्के तर बारावीत डिस्क्टिंशन मिळवल्यानंतरही दिव्यांशच्या पालकांनी त्याला क्रिकेट खेळू दिलं आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे टीम इंडियाला दमदार ओपनर मिळाला. दिव्यांशचे बाबा अजय सक्सेना भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करतात. दिव्यांश आणि यशस्वी हे दोघेही दिलीप वेंगसरकर अकादमीचे विद्यार्थी.
टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ
पारस म्हांब्रे-मुख्य प्रशिक्षक
टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले पारस म्हांब्रे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. पारस यांनी 2 टेस्ट आणि 3 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
मुंबई संघाला रणजी जेतेपद मिळवून देण्यात पारस यांचा कर्णधार आणि प्रमुख बॉलर म्हणून निर्णायक भूमिका बजावली आहे.
पारस यांनी बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीमधून लेव्हल3 कोचिंग पूर्ण केलं. बंगाल रणजी संघाला 16 वर्षांनंतर जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका. महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भ संघांनाही प्रशिक्षण.
हृषिकेश कानिटकर-बॅटिंग कोच
1998 साली भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील ढाका इथे इंडिपेंडन्स चषकाच्या अंतिम लढतीत हृषिकेश कानिटकर यांनी लगावलेला विजय चौकार सच्च्या क्रिकेटरसिकांच्या आजही लक्षात आहे.
कानिटकर यांनी 2 टेस्ट, 34 वनडेंमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10,000 हून जास्त धावा कानिटकर यांच्या नावावर आहेत.
कानिटकर यांच्या नेतृत्वात राजस्थान संघाने 2010-11 हंगामात रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं.
आयपीएल स्पर्धेत कोची टस्कर्स केरळ संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. गोवा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही कानिटकर यांनी हाताळली. राहुल द्रविड यांच्या कोचिंग टीमचा कानिटकर अविभाज्य भाग होते.
अभय शर्मा- फिल्डिंग कोच
युवा संघाची फिल्डिंग अव्वल दर्जाची करण्यात अभय शर्मा यांचा मोलाचा वाटा आहे. काही दिवसांपूर्वी वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी फिल्डिंग कोचची निवड होणार होती. त्यावेळी अभय शर्मा यांचं नाव चर्चेत होतं. राहुल द्रविड यांच्या कोअर टीममध्ये अभय शर्मा यांचा समावेश आहे.
अनिल पटेल-मॅनेजर
दक्षिण आफ्रिकेत युवा संघाला सर्व सोयीसुविधा मिळवून देण्यात अनिल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. भारतीय संघाचे सामने पॉचशेफ्ट्सरुम इथे होत आहेत. टीम इंडियाला घरचं जेवण मिळावं याकरता त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील स्थानिकांशी संपर्क केला. टीम इंडियाकरता 300 ठेपल्यांची व्यवस्था केली. याव्यतिरिक्त खेळाडूंना भारतीय पद्धतीचं जेवण मिळेल अशी व्यवस्था केली.
अनंत दाते-स्ट्रेंथ एंड कंडिशनिंग कोच
फिजिओ-अरुण दुबे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)